esakal | समाज घडविण्यात यशवंतरावांचे योगदान : शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar Top Breaking Stories In Marathi

यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्काराने कऱ्हाड येथे प्रा. एन. डी. पाटील यांना शरद पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यावेळी पवार यांनी यशवंतरावांच्या आठवणी सांगितल्या.

समाज घडविण्यात यशवंतरावांचे योगदान : शरद पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : स्वातंत्र्याचा खरा अर्थ समाजाला समजावा, या दृष्टीने ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी काम केले. राज्याचे, देशाचे नेतृत्व करून त्यांनी समाज घडविण्यात दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 
 
ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार आज श्री. पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ अणुवैज्ञानिक डॉ. अनिल काकेडकर, सरोजताई पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी, रयत शिक्षक संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल पाटील, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, आमदार बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ लेखक राम खांडेकर, शरद काळे उपस्थित होते.

यावेळी प्रा. पाटील यांना शाल, श्रीफळ, मानपत्र व रोख दोन लाख रुपये देवून सन्मानित करण्यात आले. प्रा. पाटील यांनी त्यातील एक लाख रुपये रुपये संस्थेला व एक लाख रुपये इचलकरंजी येथील एका शैक्षणिक संस्थेला देणार असल्याचे जाहीर करून तो धनादेशही सुपूर्त केला. यावेळी ज्येष्ठ लेखक राम खांडेकर यांनी लिहिलेल्या "सत्तेच्या पडछायेत' पुस्तकाचेही प्रकाशन श्री. पवार यांच्या हस्ते झाले.
 

श्री. पवार म्हणाले, ""भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सातारा जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. त्यात ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे नाव प्रकर्षाने घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सहाजिकच त्यांच्याबद्दल कायमच कृतज्ञतेची भावना मनात आहे. स्वातंत्र्य लोकांत रूजावे, त्याचा अर्थ लोकांना समजावा, यासाठी त्यांनी काम केले. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर त्यांनी काही लोकांवर जबाबदारी टाकली होती. त्यांच्या निधनानंतर पत्नीचे दागिने व काही रक्कमच त्यांच्या खात्यावर होती. मात्र, त्यांच्याकडे होते हजारो ग्रंथ. त्यांनी जेवढी आयुष्यभरात कमाई केली, ती सारी ग्रंथात घातली. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती.

यशवंतराव चव्हाण देशाचे नेतृत्व करणारे आंतरराष्ट्रीय विचारसणीचे नेते 

एकदा ब्रिटनच्या संसदेत मी भेट दिली. त्यावेळी तेथे कोपऱ्यात एक व्यक्ती वाचनात मग्न दिसली. त्या व्यक्तीला कोठेतरी पाहिल्याची जाणीव मला झाली. न राहवून मी त्यांची चौकशी केली. त्यावेळी ते ब्रिटनचे माजी पंतप्रधान होते. मला आश्‍चर्य वाटले. मी त्यांना ओळख करून दिली. त्यावेळी त्यांनी तुम्ही मुंबईतून आला आहात. तर तेथे माझे मित्र वाय. बी. चव्हाण आहेत ते माहिती आहेत का, असे विचारले. त्यावेळी मला धक्का बसला. त्यानंतर त्यांनी सांगितले की, ते आणि मी आम्ही दोघे एकाच वेळी परराष्ट्रमंत्री होतो. त्यामुळे जी मैत्री झाली ती कायमची राहिली व टिकली होती. अशाच गुण वैशिष्ट्यांमुळे यशवंतराव चव्हाण देशाचे नेतृत्व करणारे आंतरराष्ट्रीय विचारसणीचे नेते होते.
 
यशवंतराव चव्हाण यांनी दाखविलाला सच्चा मार्ग

सत्काराला उत्तर देताना प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, तत्त्ववादी वाद असावा. मात्र, निखळ मित्रत्वही असावे, असा विचार करून देशाच्या व राज्याच्या विकासाचा विचार करणारे ज्येष्ठे नेते यशवंतराव चव्हाण द्रष्टे नेते होते. त्यांनी नेहमीच आधुनिक विकासाचा विचार केला. त्यांची जडणघडण कृष्णेच्या काठावर झाली. माझी जडणघडण वारणेच्या काठावर झाली. सामान्य कुटुंबातून आलेल्या आम्हा दोघांमध्ये समस्या हीच मुख्य अडचण होती. त्यावर मात करत आम्ही प्रवास केला. आयुष्याच्या वाटेवर अनेकदा वेगवेगळे प्रसंग आले. मात्र, त्या प्रसंगात नेहमीच यशवंतराव चव्हाण यांनी दाखवलेला मार्ग सच्चा वाटला. अनेकदा आमच्यात खटके उडत. मात्र, ते तात्त्विक होते. ज्या प्रसंगातून आम्ही प्रवास केला, त्या प्रसंगानुरूप घडलेले यशवंतराव चव्हाण खऱ्या अर्थाने राज्याच्या विकासाचे अविभाज्य घटक आहेत. 

हेही वाचा - या आमदाराला मंत्रीपद देण्याचे पवारांचे संकेत

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. सदानंद बोरसे व दिलीप माजगावकर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी लेखक राम खांडेकर यांचाही शाल, श्रीफळ देवून सत्कार झाला. श्री. खांडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. शरद काळे यांनी मानपत्राचे वाचन केले.