तुमचे प्रेम कधीही विसरू शकत नाही : उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

माझ्यासाठी पद शून्य आहे. त्याची माझ्या लेखी काहीही किंमत नाही. मी जे काही करतो ते मनापासून करतो. ते तुमच्यासाठी करतो. पदाला काहीही किंमत नाही. माणसाची नक्की आहे.
- उदयनराजे भोसले, माजी खासदार 

 

कऱ्हाड ः कोणता हिरवा गुलाल, कोणता मिनी पाकिस्तान... असं काही नसते. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी अशी काही वक्तव्ये विधानसभेच्या प्रचाराच्या सांगता सभेत केली. त्याचा मी निषेध करतो. मी जर त्या व्यासपीठावर असतो, तर विक्रम पावसकरांना खाली खेचून फेकून दिले असते. अशी वक्तव्ये करणाऱ्यांना व्यासपीठावरून खाली खेचून ठेचले पाहिजे, असे मत माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथे व्यक्त केले. या वेळी उदयनराजेंनी पावसकरांनी केलेल्या वक्तव्याबद्दल मुस्लिम समाजाची माफी मागितली.
 
विधानसभा व सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर उदयनराजेंनी येथे मुस्लिम समाजातील नागरिकांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादव, मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते इसाक मुजावर, पालिकेचे नियोजन सभापती विजय वाटेगावकर, बांधकाम सभापती हणमंत पवार, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, आदिल मोमीन व अन्य नगरसवेक उपस्थित होते.

समाज एकत्रित राहिला पाहिजे - उदयनराजे

मला माफी मागतानाही लाज वाटते. जे मी केले नाही. त्याची माफी मागतो आहे. समाज एकत्रित राहिला पाहिजे, ही त्यामागची भावना आहे. माझी काहीही चूक नाही. प्रचाराच्या सांगता सभेत बालिश लोकांनी जी काही वक्तव्ये केली. त्याचा निषेध आहे. कोण कुणाचा आहे, याच्याशी मला काहीही देणे-घेणं नाही असे उदयनराजेंनी नमूद केले.

उदयनराजे म्हणाले, ""सोशल मीडियामुळे अनेक मोठे परिणाम होत आहेत. त्यामुळे प्रचाराची धुरा जपून हाती घेतली होती. मला जो काही संपर्क साधायचा होता. तो साधला होता. जे काही बोलायचे होते, ते बोलूनही झाले होते. करायची कामेही मी सांगितली होती. मात्र, त्यानंतर जे काही झाले ते योग्य नाही. आता मिनी पाकिस्तान, हिरवा गुलाल या सगळ्यांची किव येते. अशी वक्तव्य करणे योग्य नाही. हिरवा गुलाल काय नि पाकिस्तान काय, सगळं सारखेच आहे. इंद्रधनुष्यात सगळेच रंग असतात. तसाच हिंदुस्थानचा झेंडा आहे. हिरवा रंग म्हणजे निसर्ग, पांढरा रंग शांतत व भगवा रंग हा त्यागाचे प्रतीक आहे. त्याचा विचार होण्याची गरज आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण हृदयात ठेवतो.''

ते वादग्रस्त वक्तव्य मी बोललेलो नाही

उदयनराजे म्हणाले, ""आपण खुन्नसमध्ये निवडणुकीत जे काही केले ते ठीक आहे. जे काही वादग्रस्त बोलले ते मी बोललेलो नाही. आपण ते आपल्या मनातून काढून टाका. कारण मी त्या व्यासपीठावर असतो, तर पावसकरांना खाली खेचून फेकून दिले असते. अशी वक्तव्य करणे साफ चुकीचे आहे.

हेही वाचा -  यांना खाली खेचा आणि ठेचा 

समजूतदारपणाचा प्रश्न महत्त्वाचा असतो. तो पावसकर यांच्याकडे निश्‍चित नाही. त्यामुळे तुमची माफी मागण्यासाठी आलो आहे. तुम्ही काहीही म्हणू शकता, शिव्याही देऊ शकता. मात्र, तुमच्या सगळ्यांबद्दल माझ्या मनात प्रेम आहे. ते कधीही विसरू शकत नाही.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Your Love Can Never Be Forgotten Says Udayanaraje