कोरोनानंतर अनुदानवाटप सुरळीत; मावळातील ३९०० जणांना विविध योजनांचा लाभ 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 February 2021

 • विविध योजनांचा मावळातील ३९०० लाभार्थ्यांना मिळतोय लाभ

कामशेत (ता. मावळ) : संजय गांधी दिव्यांग पेन्शन योजनेचा मी लाभार्थी आहे, पूर्वी सहाशे रुपये पेन्शन मिळायची. आता एक हजार रुपये मिळते. ही रक्कम पुरेशी नसली तरी यातून किमान  घराला हातभार मिळतो. थोडीफार का होईना खर्चात मदत मिळते, यात मी समाधानी आहे. वराळेतील गणेश रोहमारे या दिव्यांग बांधवांनीही समाधान व्यक्त केले. कोरोनाच्या काळात काहीशी विस्कळीत झालेली ही योजना सध्याच्या काळात सुरळीतपणे सुरू आहे. त्याचा लाभ लाभार्थ्यांना वेळेवर मिळत आहे.

Success Story : मावळातील आदिवासी मुलगा बनला 'पीएसआय' 

मावळात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे सुमारे तीन हजार नऊशे त्र्याहत्तर लाभार्थी आहेत. ज्यांना या योजनेअंतर्गत दरमहा एक हजार ते बाराशे रुपये अनुदान बॅंक खात्यावर जमा होते. दिव्यांग, विधवा, परित्यक्‍त्या, घटस्फोटित, पॅरॅलिसिसचे रुग्ण, कुष्ठरोगी, एड्‌सबाधित, दुर्गंधीव्याधीग्रस्त, तृतीयपंथी यांना या योजनेचा लाभ मिळतो. पण त्यासाठी आर्थिक उत्पन्न आणि अल्पभूधारक असल्याची अट आहे. अशीच दरमहा पेन्शन घेणाऱ्या जांबवडेतील शोभा घोजगे म्हणाल्या, ‘‘दोन वर्षांपासून मी या योजनेची लाभार्थी आहे. या अनुदानामुळे काहीसा आधार मिळतोच, यात मी समाधानी आहे. दरमहा हे अनुदान मिळावे. कोरोना काळात काहीसे अनुदान लांबणीवर पडले होते.

मावळ : वणव्याच्या आगीत होरपळली पठारे

नेसावेचे गबळू शिरसट म्हणाले, ‘‘गेल्या तीन वर्षांपासून पॅरालेसिससारख्या भयंकर आजाराशी झगडत आहे. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो याची मला कल्पना नाही. माझे वय ऐशीवर पोचले आहे. या मदतीचा निश्‍चित माझ्यासारख्या अनेक दुर्धर आजाराने त्रस्त झालेल्यांना मिळेल. 
संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार नंदकुमार धनगर म्हणाले, ‘‘तालुक्‍यातील दुर्धर व्याधींनी त्रस्त असलेल्या व्यक्तीसह दिव्यांग, विधवा, तृतीयपंथी, एड्‌सग्रस्त, कुष्ठरोगी, पॅरॅलिसिस झालेल्या नागरिकांनी या योजनेच्या लाभासाठी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. एकवीस हजार रुपये उत्पन्न असलेले व अल्पभूधारक शेतकऱ्यांना योजनेतून लाभ देता येईल. तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनीही या योजनेत जास्तीत लाभार्थींनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंदिरा गांधी योजनेसाठी केंद्राचे अनुदान तीस टक्के असून, राज्य सरकारचे अनुदान सत्तर टक्के आहे. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी केंद्र सरकारचे प्रती लाभार्थी वीस हजारांपर्यंत अनुदान अजून एकाच लाभार्थींचा प्रस्ताव यासाठी अजून त्यावर येणाऱ्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती या कार्यालयाकडून देण्यात आली.

योजना नाव : तालुक्‍यातील लाभार्थी 

 • संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण) : 2710 
 • संजय गांधी निराधार योजना (अनुसूचित जाती) : 110 
 • संजय गांधी निराधार योजना (अनुसूचित जमाती) : 28 
 • श्रावणबाळ सेवा योजना (सर्वसाधारण) : 828 
 • श्रावणबाळ सेवा योजना (अनुसूचित) : 35 
 • श्रावणबाळ सेवा योजना (अनुसूचित जमाती) : 33 
 • इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना : 19 
 • इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन : 208 
 • इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना : 2 
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3900 people's benefit of various schemes after corona at maval