ललित कला अकादमीमुळे पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवात पडणार भर 

ललित कला अकादमीमुळे पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवात पडणार भर 
Updated on

भोसरी (पिंपरी-चिंचवड) : महापालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्याने ललित कला अकादमी शहरात सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे अकादमीचे महाराष्ट्रातील पहिलेच केंद्र असल्याने शहराच्या सांस्कृतिक वैभवातही भर पडणार आहे. तसेच, राज्यासह शहर परिसरातील कलाकारांना देश पातळीसह आंतरराष्ट्रीय पातळीवर कला सादर करण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. 

अकादमीची विभागीय केंद्रे देशात दिल्ली, ओरिसातील भुवनेश्‍वर, पश्‍चिम बंगालमधील कोलकता, उत्तर प्रदेशातील लखनौ, चेन्नई आदी राज्यात आहेत. मात्र, महाराष्ट्रात अद्यापपर्यंत केंद्र नव्हते. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेली ही संस्था भारतीय संस्कृती, कला व परंपरा यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी अग्रणी आहे. चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला व अन्य उपयोजित कला यांचा अभ्यास, संवर्धन, प्रसार व कला शिक्षण देणाऱ्या संस्थांना उत्तेजन व आर्थिक मदत देणे व इतर कार्यही आहे. याशिवाय राष्ट्रीय स्तरासह आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कलाकारांची कलात्मक प्रदर्शने भरविणे, कलाविषयक साहित्य प्रकाशित करणे, नवीन कलाकारांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे इतर स्वरूपाची महत्त्वपूर्ण कामे केली जातात. 

भोसरी एमआयडीसीतील जे ब्लॉक अंतर्गत मोकळी जागा क्रमांक 29 येथील आरक्षण क्रमांक 45 मधील भूखंडात बालनगरी विकसित करण्याचा प्रकल्प महापालिकेद्वारे हाती घेण्यात आला होता. महापालिकेने सुमारे वीस कोटी रुपये खर्च करून बालनगरीच्या पहिल्या टप्प्यातील पाच हजार चौरस फूट इतके बांधकाम पूर्ण केले. मात्र, दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्‍यक निधी उपलब्ध होत नसल्याने आणि प्रायोगिक तत्त्वावर बालनगरी प्रकल्प चालविण्यास कोणतीच संस्था पुढे न आल्याने हा प्रकल्प थांबविण्यात आला. 

दरम्यान, राज्यातील विविध शहरांमध्ये स्थित असलेल्या चित्रकला महाविद्यालयाकडून तसेच, बॉम्बे आर्ट सोसायटीकडून महाराष्ट्रामधील कला विकासासाठी अकादमीच्या विभागीय केंद्रासाठी बालनगरीची जागा देण्याविषयीची विचारणा झाली. बालनगरीच्या मूळ आरक्षणाच्या संकल्पनेशी निगडित असल्याने जागा देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. 

प्रकल्पाचे फायदे 

  • राज्यात पिंपरी-चिंचवड शहराचे महत्त्व 
  • शहर पर्यटनास चालना 
  • चित्र-शिल्प व इतर कलांचे कायमस्वरूपी प्रदर्शन स्थापन 
  • नागरिकांना कलात्मक, अभिरुची व सांस्कृतिक ठेवा तसेच विविध उपयोजित कलांचा आस्वाद मिळणार 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : शिवनंदन बाविस्कर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com