...म्हणून अतिक्रमण विभागाच्या कारवाईचं भोसरीत होतयं हासू

bhosari.jpg
bhosari.jpg

भोसरी : कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी महापालिकेद्वारे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून रस्त्यावर बसणाऱ्या भाजी-फळे विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात येते. मात्र, ही कारवाई निव्वळ फार्स ठरत आहे. अतिक्रमण विरोधी पथकाची गाडी पुढे गेल्यावर भाजी-फळे विक्रेत्यांद्वारे पुन्हा रस्त्यावर दुकाने थाटण्यात येतात. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारे होणाऱ्या या कारवाईचे भोसरी परिसरात हसे होत आहे. त्याचप्रमाणे भाजी-फळे विक्रेते व ग्राहक यांच्याद्वारे कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्यामुळे कोरोनाचा संसर्ग भोसरी परिसरात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 
कोरोना व्हायरसच्या संसर्गपासून बचावासाठी महापालिकेने भोसरीतील धावडेवस्तीजवळील रिकाम्या जागेत तात्पुरती भाजी मंडई सुरू केली होती. मात्र, पावसामुळे या भाजी मंडईतील चिखल झाल्याने एक महिन्यापूर्वी ही भाजी मंडई बंद करण्यात आली. त्यातच लॅाकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने भोसरीतील गावाठाणातील नव्याने बांधण्यात येत असलेल्या संत ज्ञानेश्वर भाजी मंडईशेजारी उभारण्यात आलेल्या पत्राशेड त्याप्रमाणे आळंदी रस्त्यावरील भाजी मंडईत भाजी-फळे विक्रेते बसतात. त्याचप्रमाणे पुणे-नाशिक महामार्गाच्या धावडेवस्तीजवळील सेवा रस्ता, दिघी रस्ता, पीएमटी चौक आदी भागातील रस्त्यावरही भाजी-फळे विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.

कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका असतानाही महापालिकेद्वारे संत ज्ञानेश्वर भाजी मंडई शेजारील उभरण्यात आलेल्या पत्राशेड भाजी मंडईत येणाऱ्या ग्राहकांची नोंद ठेवली जात नाही. या ठिकाणी सॅनिटाझिंग केले जात नाही. त्याचप्रमाणे भाजी विक्रेत्यांद्वारेही खबरदारी घेण्यात येत नसल्याचे दिसते.  त्याचप्रमाणे भाजी-फळे खरेदी करण्यासाठी येत असलेल्या ग्राहकांद्वारे सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करण्यात येत नाही. अशीच परिस्थिती आळंदी रस्त्यावरील खासगी भाजी मंडईची आहे. भोसरीमध्ये कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महापालिकेद्वारे योग्य खबरदारी घेतली न गेल्यास कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढणार असल्याचे काही नागरिकांनी बोलून दाखविले.  
 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या विषयी एका नागरिकाने सांगितले, लॅाकडाऊनच्या काळात नोकरी गेलेल्या काही नागरिकांनी भाजी-फळे त्याचबरोबर इतर वस्तू विकण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे भोसरीतील प्रत्येक रस्त्यावर विविध वस्तू, भाजी-फळे विक्रेत्यांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र, त्यांनी कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. निष्काळजीपणे वस्तू विकणारे विक्रेते स्वतःच्या जीवासह इतर नागरिकांचा जीवही धोक्यात आणत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता गजबजलेलाच
पुणे-नाशिक महामार्गाच्या भोसरी-आळंदी रस्ता ते धावडे वस्तीपर्यंतच्या सेवा रस्त्यावर विविध वस्तू विक्रेत्यांद्वारे पदपथावर दुकाने थाटली आहेत. संध्याकाळच्या वेळेस या सेवा रस्त्यावर खेरदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी असलेली दिसते. या ठिकाणी कोरोना व्हायरस पसरवू नये यासाठी देण्यात आलेल्या नियमांचे पालन न केले गेल्यास भोसरीत कोरोना पॅाझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
         
पुन्हा थाटली जातात दुकाने... 
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारे भोसरी परिसरातील रस्त्यावर बसणाऱ्या भाजी-फळे विक्रेत्यांविरुद्ध शनिवारी (ता. ४) सकाळी साडेदहाच्या सुमारास कारवाई करण्यात आली. मात्र अतिक्रमण विभागाचे वाहन पुढे गेल्यावर पाठीमागे पुन्हा भाजी-फळे विक्रेत्यांनी दुकाने थाटली. असे नेहमीच होत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. त्यामुळे महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई म्हणजे निव्वळ फार्स असल्याचे नागरिकांचे  म्हणणे आहे. याविषयी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com