Pune News : बत्तीस वर्षांनंतर घडवून आणली माय लेकरांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

After thirty-two years meeting by Poonam Sankaran in Sangvi

Pune News : बत्तीस वर्षांनंतर घडवून आणली माय लेकरांची भेट

जुनी सांगवी : एखाद्या सिनेमातील कथेप्रमाणे बालपणीच हरवलेली आई लेकरांना सिनेमाच्या शेवटी भेटते असेच प्रत्यक्षात तब्बल बत्तीस वर्षांनंतर जुनी सांगवी येथे बत्तीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर माय लेकरांची भेट घडली या भेटीनंतर माय लेकरांसह उपस्थितांचे डोळेही पाणावले.

या माय लेकरांची भेट घडवून आणणा-या जुनी सांगवीतील पुनम विनोद शंकरन या सहृदयी महिलेमुळे हे शक्य झाले आहे.यामुळे पुनम यांनी धकाधकीच्या या युगात माणुसकीचे आदर्शवत दर्शन समाजासमोर उभे केले आहे.

जुनी सांगवी प्रियदर्शनी नगर भागात पुनम विनोद शंकरन या रहिवासी आहेत. त्या हिंजवडी आयटी पार्क क्षेत्रात नोकरीस आहेत. रोज कामासाठी त्या जुनी सांगवी येथून बसने ये जा करतात.त्यांना गेली आठ दहा दिवसांपासून एक वयोवृद्ध महिला सांगवी बसथांबा परिसरात भटकत असल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी सुरूवातीला दोन तीन दिवस सकाळी व सायंकाळी त्या महिलेला चहा व नाश्ता दिला.पण त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते.त्यांनी ही गोष्ट पती व मित्रपरिवाराला सांगितली. पुनम व त्यांचे पती विनोद यांनी त्या महिलेची आपुलकीने विचारपूस केली असता.तिने फक्त बेल पिंपळगाव या गावाचे नाव सांगितले.

या दाम्पत्याने गावाची चौकशी सुरू केली असता एका नागरिकाने नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात बेल पिंपळगाव हे गाव असल्याचे सांगताच पुनम यांनी तेथील पोलिस पाटील यांना वॉटसॲपवरून या महिलेचा फोटो व वर्णन पाठवले.

पोलिस पाटील संजय साठे यांनी ही महिला आपल्याच गावातील जनाबाई साहेबराव सुरसे ही ती गेली तीस वर्षांपूर्वी तिचा लहान मुलगा ज्ञानदेव साहेबराव सुरसे सध्याचे वय ३५ व मुलगी अलकाबाई राजेंद्र माळी वय ४० यांना तीस वर्षांपूर्वी सोडून घरातून निघून गेल्याची माहिती सांगितली. व महिलेचा मुलगा व मुलगी याच गावात राहत असल्याचे सांगितले.

आणि शोध संपून घडली माय लेकरांची भेट - आई बत्तीस वर्षांनंतर भेटणार याची ओढ व आनंद भाऊ बहिणीला लागली.तात्काळ त्यांनी बेल पिंपळगाव येथून रुग्णवाहिका घेऊन पिंपरी चिंचवड गाठले.दुपारच्या सुमारास जुनी सांगवीत येवून आईला पाहाताच अश्रू अनावर झाले.

या प्रसंगाने उपस्थितही ही गहिवरले. शेतकरी आदिवासी कुटूंबातील बहिण भावाला तब्बल तीस वर्षांनंतर आईची भेट घडून आली.गेली तीस बत्तीस वर्ष आईचा फोटो समोर डोळ्यासमोर होता.प्रत्यक्षात आई भेटल्याने त्या भाऊ बहिणीचे अश्रू अनावर झाले होते.

अशी आहे कैफियत -

यातील मुलांचे वडील १५ वर्षांपूर्वीच वारले. आई ३२ वर्षांपूर्वी मुलगा तीन वर्षांचा असताना घर सोडून आजी (तिच्या आईकडे), मामाकडे निघून गेली. आजी लगेच वारल्यानंतर. मामाने माझ्या आईचा सांभाळ केला नाही. त्यामुळे ती तिथूनही भरकटत निघून गेली. ज्ञानदेव सुरसे मुलगा.

सांगवी पोलिसांनी बजावली महत्वपूर्ण भुमिका- गेली सात आठ दिवसांपासून सांगवी पोलिसांनी पुनम यांना मदत करून त्या वयोवृद्ध महिलेच्या कुटूंबियांचा शोध घेण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी करत सहकार्य केले.

सांगवी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मिनिनाथ वरूडे, काळू गवारी,जी.एस.ढगे,विजय शेलार किरण खडक उमरगे यांनी मोलाचे सहकार्य करून शहानिशा प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून सापडलेल्या आईला मुलांच्या स्वाधीन केले.

मानवतेच्या भावनेतून आपण समाजाला काही तरी देणे लागतो हीच भावना मनात ठेऊन हरवलेल्या आईची मुलांना भेट घालून दिली.याचा मनस्वी आनंद होत आहे.

पूनम शंकरन, प्रियदर्शनी नगर, जुनी सांगवी.