esakal | कोरोनाच्या उपाययोजनांसाठी राज्य सरकारकडून लवकरच पॅकेज!
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या उपाययोजनांसाठी राज्य सरकारकडून लवकरच पॅकेज!

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

कोरोनाच्या उपाययोजनांसाठी राज्य सरकारकडून लवकरच पॅकेज!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : "लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. व्यवसाय, व्यवहार बंद आहेत. संपूर्ण कामकाज ठप्प आहे. सर्वांपुढे आर्थिक संकट आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार पॅकेज देण्याचा विचार करीत आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल,'' अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे औंध ते रावेत बीआरटी मार्गावर पिंपळे सौदागर येथील साई चौकात (जगताप डेअरी चौक) उभारलेल्या पुलाचे त्यांच्या हस्ते शुक्रवारी उद्‌घाटन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, "केंद्र सरकारने 21 लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. त्यातून वेगवेगळ्या राज्यातील जनतेच्या हातामध्ये किती पैसा जाणार आहे. त्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. केवळ मोठ-मोठे आकडे पहायला मिळाले. पण, गरिबांच्या हाती काय मिळाले. दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी ज्याची चूल पेटते अशा माणसाला खऱ्या अर्थाने मदत करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. पत्रव्यवहार केला आहे. व्हिडीओ कॉंन्फरन्सद्वारे पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, तेव्हाही मागणी केली आहे.'' 

हेही वाचा- एकाच पुलाचं दोन वेळा उद्घाटन; भाजप-राष्ट्रवादीत रंगलाय श्रेयवाद

राज्यातून खूप मोठ्या प्रमाणावर मजूर वर्ग बाहेर जात आहे. पश्‍चिम बंगाल, उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, राजस्थान आदी भागातील हे कामगार आहेत. त्यांच्या मूळगावी परत गेले आहेत. त्यांची वाट बघत असताना आपल्या राज्यातील मागासलेल्या भागातील नागरिकांनी काम मिळविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करून अजित पवार म्हणाले, "कामगारांना कौशल्य अथवा प्रशिक्षण घ्यायचे असेल, तर सरकार देईल. पण, राज्यातील मजुरालाच काम मिळायला हवे, याकडे कटाक्षाने पाहिले जाईल. यामुळे बेरोजगारी कमी होऊन संसार चालविण्यासाठी त्यांना मदत होईल.'' 

हेही वाचा- पिंपरीतील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार आयुक्तांना म्हणाले...

पुणे, पिंपरी-चिंचवड शहराची कोरोनासंदर्भात पवार म्हणाले, "पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व अधिकाऱ्यांशी आमचा दररोज संपर्क होत असतो. त्यांच्याकडून आम्ही माहिती घेत असतो. म्हणूनच पुण्यासारख्या ठिकाणी जादा अधिकारी दिले आहेत.'' कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागात सुरवातीला कमी दिसत होते. परंतु, आता शहरातील नागरिक गावाला जायला लागल्याने ग्रामीण भागातही रुग्ण वाढू लागले आहेत. असे असले तरी, खबरदारी घ्यायला हवी. कोरोना हा बरा होणारा आजार असल्यामुळे घाबरून जाऊ नये, असे आवाहनही पवार यांनी केले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image