esakal | Akurdi : बाजारपेठांत विद्युतमाळांचा झगमगाट
sakal

बोलून बातमी शोधा

akurdi

Akurdi : बाजारपेठांत विद्युतमाळांचा झगमगाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आकुर्डी : गणेशोत्सवात सर्वाधिक महत्त्व असतं ते सजावटीला. आपला बाप्पा इतरांपेक्षा सुंदर कसा दिसेल? याकडे सर्वांचेच लक्ष असतं. त्यासाठी आकर्षक सजावट करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो.

अवघ्या चार दिवसांनी गणरायाचं आगमन होणार आहे. त्यामुळे सजावटीचा बाजारही जोरात आहे. यामध्ये विद्युत माळा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. चिनी माळांपेक्षा भारतीय बनावटीच्या माळा विकत घेण्याकडे ग्राहकांचा जास्त कल आहे. भारतीय बनावटीच्या माळांचे विविध प्रकारही बाजारपेठांमध्ये दाखल झाले आहेत.

कॉपरच्या किमती वाढल्याने माळांच्या किमतीही थोड्याफार वाढल्या आहेत, असे दुकानदारांनी सांगितले. वीस रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंतच्या माळा विक्रीस आहेत. माळांबरोबरच मोठ्या दिव्यांनादेखील जास्त मागणी आहे.

हेही वाचा: गणेशोत्सवाआधी दोन दिवस सुरू होणारा उत्सव

कोरोनामुळे कित्येक दिवसांपासून व्यवसाय चालत नव्हता, त्यामुळे बल्ब व्यावसायिकांनी दुकाने सोडली होती. मात्र, आता गणेशोत्सवानिमित्ताने व्यावसायासाठी आशेचा किरण दिसत असल्याने अनेक व्यावसायिकांनी दुकाने भाड्याने घेतली आहेत. सुरुवातीला विद्युत माळा या बल्ब लावून तयार करण्यात येत होत्या.

मात्र, आता या माळांमध्येही एलईडी बल्बचा वापर करून अधिक टिकाऊ आणि आकर्षक तयार केल्या आहेत. चायनीज माळांपेक्षाही जास्त चांगल्या प्रमाणामध्ये या वापरता येऊ शकतात, असे दुकानदारांनी सांगितले आहे. यामध्ये मल्टी, सिंगल आणि ट्रीपल कलर अशा प्रकारांत उपलब्ध आहेत. त्यांची किंमत सुमारे ३०० ते ८५० रुपयांपर्यंत आहे. याशिवाय वेगवेगळ्या लायटिंग कँडलचा पर्यायही उपलब्ध आहे.

पूजेच्या साहित्याचा चौफेर दरवळ

गणरायाचं आगमन म्हटलं, तर पूजेचं साहित्यही आलंच. त्यात धूप, अत्तर, कापूस, तेल, कापूर, कापसाच्या वाती, अगरबत्ती हे साहित्य बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे. यंदा पूजेच्या साहित्यांच्या किमतीत वाढ न झाल्याने ग्राहकांचा खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. कोरोनामुळे ही दुकाने बंद होती; त्यामुळे ती कधी उघडतील, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले होते. पूजेचे साहित्य व सुगंधी द्रव्य हे बंगळूरहून जास्त प्रमाणात आणले जातात.

सुगंधित द्रव्यांमध्ये नैसर्गिक आणि सिंथेटिक प्रकारचे अत्तर सध्या उपलब्ध आहेत. दोन्ही प्रकारचे अत्तर आणि अगरबत्ती घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. दरम्यान, कापूर बर्नरलाही मागणी आहे, हे वेगवेगळे आकार व उंचीमध्ये मिळते. यात बर्नरवर कापूर ठेवल्यास संपूर्ण कापूर घरभर पसरतो.

हेही वाचा: गणेश चित्रशाळांमध्ये लगबग

साहित्यामध्ये काय?

स्वच्छ हळकुंडे दळून केलेली हळद पूड, उत्तम सुवासिक कुंकू (पंढरपुरी), अष्टगंध, शेंदूर, बुक्का, गुलाल, रांगोळी, फुले (गुलाब, चाफा, जाई-जुई, शेवंती, कमळ, इ.), निवडलेल्या दूर्वांची जुडी, पत्री पूजेसाठी वृक्षवल्लींची पाने, जानवी जोड, विड्याची पाने, सुपारी, बदाम-खारीक, रुपयाची नाणी, खोबरे वाटी, गूळ, खोबरे बारीक किसून खसखस, खडीसाखर, खजूर-बेदाण्यासह पंचखाद्य उपलब्ध आहे.

दुकानदार म्हणतात

महेश नागर : सध्या ग्राहकांचा कमी-अधिक प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे. पण, गतवर्षीपेक्षा यंदा ग्राहकांची मागणी जास्त आहे.

लक्ष्मण माने: भारतीय बनावटीचे दिव्यांना ग्राहकांची पसंती आहे. सध्या मिळणारा प्रतिसाद असाच राहिल्यास व्यवसायाची घडी बसण्यास मदत होईल.

माळांचे प्रकार

  • हनी बी लाइट

  • फ्लावर शेप

  • डिस्को लॅम्प

  • बॉटल शेप

  • गणपती ओम,

  • रांगोळीचे नवीन प्लेट्स

विक्रेते म्हणतात

कन्हैया मगनानी : यावर्षी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अनेक दिवस आम्ही घरात बसून होतो. परंतु, आता दुकानाबाहेर पडायला वेळ नाही. या गणेशोत्सवात व्यवसाय उत्तम पद्धतीने चालू आहे.

ग्राहक म्हणतात

ईश्‍वरी परांजपे : गणेशोत्सव म्हटलं की घरामध्ये प्रसन्न वातावरण ठेवणे गरजेचं असतं. हे काम कापूर आणि सुगंधी द्रव्य करतात. यावर्षी मी अनेक ठिकाणी फिरून वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधी द्रव्य घेतलेले आहेत.

loading image
go to top