Mohan Bhagwat : भारतवर्ष व्हावे ही 'श्रीं'ची इच्छा!

'सर्व जगाला विनाशापासून वाचवण्याचे काम भारताला करायचे आहे. त्यामुळे भारतवर्ष व्हावे ही श्रींची इच्छा आहे,'
Mohan Bhagwat
Mohan BhagwatSakal

पिंपरी - 'सर्व जगाला विनाशापासून वाचवण्याचे काम भारताला करायचे आहे. त्यामुळे भारतवर्ष व्हावे ही श्रींची इच्छा आहे,' असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. अयोध्येत उभारलेल्या श्रीराम मंदिराच्या माध्यमातून भारतवर्षचे काम सुरू झाले आहे. हा संयोग नसून नियतीची योजना आहे. भगवंताची कृपा आहे, अशा शब्दांत त्यांनी श्रद्धाभाव व्यक्त केला.

अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त गीता परिवार, श्रीकृष्ण सेवा समिती, संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान यांच्यातर्फे आळंदी येथे आयोजित गीताभक्ती अमृत महोत्सवांतर्गत सोमवारी मिरवणूक काढण्यात आली.

त्यानंतर वेदघोषात अमृत महोत्सवास सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.

स्वामी गोविंददेव गिरी, जैन मुनी लोकेश महाराज, वारकरी शिक्षण संस्थेचे मारुती महाराज कुऱ्हेकर, राजेंद्रदास महाराज आदी उपस्थित होते.

भागवत म्हणाले, 'श्रद्धा, भक्ती आणि समर्पण हे भारतवर्षाचे सद्भाग्य आहे. या भारतवर्षामध्ये सध्या जे घडतंय, ते केले जात नसून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा सांगितले होते की, राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. शिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनीसुद्धा आपल्या स्वयंसेवकांना सांगितले होते की, हे ईश्वरीय कार्य आहे. ते करत रहा. त्यानुसारच आजही कार्य सुरू आहे.‌ यातच त्या कार्याचे यश आहे.

सतत प्रयत्न करणे आपले काम आहे. श्रद्धा, भक्ती, समर्पण हे सर्वसामान्यांमध्ये सतत राहणारे गुण आहेत. म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज यांनी विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले आहे. त्यामुळेच आमच्यापासून श्रद्धा, भक्ती, समर्पण विभक्त होऊ शकत नाही. कारण, कोणी झोपले तर त्याला जागवणारी ईश्वरी शक्ती आहे. त्या शक्तीची ईच्छाही अशी आहे की, कोणी राहो न राहो, भारतवर्ष रहायला हवे.''

महाभारतकालीन पुनरावृत्ती...

महाभारत काळातील युद्धात संहार होणार हे सर्वांना कळत होते. पण, त्यांना त्यांच्याकडील ज्ञान वाचवायचे होते. ते ज्ञान नष्ट व्हायला नको, असे सर्वांचे मत होते. त्यासाठी सर्व ज्ञानवंतांनी एकत्र येऊन शास्रांचे चिंतन केले. प्रत्येक झोपडीत ज्ञान पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहचले आहे. तशाच रितीने आता शास्रांची चर्चा होऊ लागली आहे. अयोध्येत श्रीराम प्राणप्रतिष्ठा व आळंदीतील आताचे गीताभक्ती ज्ञान सत्र हे त्याचेच प्रतिक आहे. हा संयोग नसून नियतीची योजना आहे, असेही मोहन भागवत यांनी सांगितले.

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले...

- विश्वाच्या कल्याणासाठी भारताला जगाचे नेतृत्व करायचे आहे. पण, काही कारणाने भारत समर्थ न झाल्यास जगाला लवकरच विनाशाचा सामना करावा लागेल, अशी स्थिती आहे.

- मनुष्याच्या पुरुषार्थाद्वारे भगवंताच्या संकल्पपूर्तीचा प्रारंभ झाला आहे.

- आमच्याकडे भगवद्गीता, त्रिटक असे ज्ञान आहे. अभ्यास करून नव्या स्वरुपात आम्हाला त्या ग्रंथांचे ज्ञान घ्यायचे आहे.

- प्राचीन ज्ञानाला नवीन परिस्थितीच्या संदर्भात अर्थ लावून आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.

- भारत हा मुळ शासक आहे.

- श्रद्धा, भक्ती व समर्पण आमच्यात पहिल्यापासून आहे. पण, केवळ श्रद्धेने ज्ञान प्राप्त होत नाही. त्यासाठी भक्ती व समर्पण आवश्यक आहे.

गीता शिका, शिकवा आणि प्रचार करा

गोविंददेव गिरी म्हणाले, ''आज माझे अंतःकरण आनंदाने भरलं आहे. याचे कारण, माझा वाढदिवस नसून संपूर्ण गीता परिवाराचा सन्मान आहे. गीता शिका, शिकवा आणि प्रचार करा, असे आवाहन यानिमित्ताने करतो. आपल्या संस्कृतीचे केंद्र भगवद्गीता आहे. आणि तीची वाणी ही संत ज्ञानेश्वर महाराज यांची ज्ञानेश्वरी आहे. त्यामुळे आळंदीपेक्षा मोठे कोणतेही तीर्थस्थान नाही. आळंदीत बसून गीतेचे श्रवण करणे हीच माझी इच्छा होती. शिवाय, राष्ट्रसेवकांचा सन्मान हा माझा सन्मान आहे. देशभक्ती शिकवणारा पाठ म्हणजे संघ आहे.''

देशसे हैं प्रेम तो, ये कहना चाहिए।

मैं रहूं, या न रहूं, भारत रहेना चाहिए।

अशा शब्दांत गोविंददेव गिरी यांनी भावना व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com