काय सांगता, लाखाची बुलेट अवघ्या पाच हजारांना! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातून बुलेट चोरणारी टोळी जेरबंद; आठ बुलेट जप्त 

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह पुणे परिसरातून बुलेट चोरून ही चोरलेली बुलेट उस्मानाबादला अवघ्या पाच ते दहा हजार रुपयांना विकणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून आठ लाख रुपये किमतीच्या आठ बुलेट जप्त केल्या आहेत. 

पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाउन?

सुमीत सुनील सावंत (वय 19, रा. पारखेवस्ती, हिंजवडी), रोहित सुरेश वेताळ (वय 20, रा. कीर्ती गेट मागे, लक्ष्मी चौक, मारूंजी रोड), प्रशांत भीमराव गायकवाड (वय 19, रा. लक्ष्मीबाई कॉलनी, डांगेचौक), चेतन ऊर्फ श्रीपती शिवाजी कातपुरे (वय 19, रा. लक्ष्मीनगर, प्रेरणा शाळेजवळ, थेरगाव), वैजनाथ नागनाथ चौधरी (वय 22, रा. मु. पो. देवगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) यांना अटक केली असून, मर्फी ऊर्फ आशिष भिसे, फ्रान्सिस हे फरारी आहेत. मारुंजी व हिंजवडी परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांपैकी एकजण हिंजवडीतील कोलते-पाटील गेट येथील कट्ट्यावर बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पिंपरी-चिंचवडकरांनो सावधान! थुंकल्यास होणार हजार रुपयांचा दंड 

त्यानुसार सापळा रचून पाठलाग करीत पोलिसांनी रोहित वेताळ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता मारुंजी गावातून दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिले. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे अधिक तपास केला असता इतर आरोपींनी हिंजवडी परिसरातून पाच, चिंचवड, वारजे माळवाडी व इतर परिसरातून प्रत्येकी एक अशा आठ बुलेट चोरून फ्रान्सिस याच्या मदतीने या बुलेट उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा याठिकाणी वैजनाथ चौधरी व इतर नागरिकांना पाच ते दहा हजार रुपयांना विकल्याचे निष्पन्न झाले. 

वाहन चोरीचे सात गुन्हे उघडकीस 

या आरोपींकडून आठ लाख रुपये किमतीच्या आठ बुलेट जप्त करण्यात आल्या असून, वाहनचोरीचे हिंजवडी ठाण्यातील पाच तर वारजे माळवाडी व चिंचवड ठाण्यातील प्रत्येकी एक असे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक आरोपींपैकी सुमीत सावंत हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bullet stealing gang arrested from Pimpri-Chinchwad, Pune area