शिवसेनेचा 'धनुष्यबाण' परत आणण्यासाठी काँग्रेस, NCPचा निर्धार; चिंचवडच्या मेळाव्यात मांडली भूमिका : Chinchwad By Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena Uddhav Thackeray

Chinchwad By Election : 'धनुष्यबाण' परत आणण्यासाठी काँग्रेस, NCPचा निर्धार; चिंचवडच्या मेळाव्यात मांडली भूमिका

चिंचवड : शिवसेनेचं पक्ष चिन्ह धनुष्यबाण पुन्हा खेचून आणण्यासाठी काँग्रेससह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निर्धार केला आहे. नाना काटे यांच्या प्रचारासाठी चिंचवड इथं पार पडलेल्या मेळाव्यात महाविकास आघाडीकडून हा निर्धार करण्यात आला. (Chinchwad By Election NCP and Congress determined to bring back Shiv Sena bow)

यावेळी नाना पटोले म्हणाले, नाना काटे हे बहुमतानं निवडून यावेत अशी आमची इच्छा आहे. याबाबत आम्ही चिंचवड मतदारसंघात सर्व्हे केला असून यात त्यांचा विजय निश्चित असल्याचं स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर शिवसेनेनं गमावलेलं चिन्ह धनुष्यबाण पुन्हा परत आणण्यासाठी प्लॅन सुरु असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

कसब्यात रविंद्र धंगेकर आणि चिंचवडमध्ये नाना काटे यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी वज्रमूठ बांधावी असं अवाहन करताना नाना पटोले म्हणाले की, धनुष्यबाण वापरण्यासाठी मूठ गरजेची असते. मूठ बांधताना हाताचा पंजा आणि मनगटावर घड्याळही येतं. घड्याळ आणि पंजा आता आपल्याकडं आहेत त्यामुळं धनुष्यबाण परत आणण्यासाठी महाविकास आघाडी प्लॅन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बेईमानीनं ज्या महाशक्तीच्या जोरावर महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, त्याचं शक्तीच्या जीवावर जोर दाखवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आता आली आहे, असंही नाना पटोले यावेळी म्हणाले.