शिष्यवृत्ती परीक्षा निकालाबाबत संभ्रम कायम

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 August 2020

परीक्षा होऊन उलटले सात महिन्यांचा कालावधी; निकाल जाहीर नाही 

पिंपरी : दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका ऑफलाइन तपासून निकाल जाहीर केला. केंद्राच्या 'एनएमएमएस' परीक्षेचाही निकाल लागला. मात्र, राज्य परीक्षा परिषदेने फेब्रुवारीत घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. परीक्षा होऊन सात महिन्याचा कालावधी उलटला, तरी कुठलाच निकाल न लागल्याने पालकांचा संभ्रम वाढला आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी इंग्रजी शाळांची अशी 'दुकानदारी'

'गौरी'ला यंदा सखींचा गोतावळा नाहीच!

परीक्षा परिषदेकडून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. राज्यभरातून आठ लाखांवरून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्याचा निकाल साधारणपणे जूनच्या अखेरीस जाहीर करण्यात येतो. परंतु यावर्षी अद्याप निकाल जाहीर केला नाही. दुसरीकडे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वीस लाखांहून अधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका 'ऑफलाइन' तपासून निकाल जाहीर केला. मात्र 'ओएमआर' सीटवर परीक्षा घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल परीक्षा परिषदेला जाहीर करता आलेला नाही. स्कॅनिंग केलेले पेपर तपासून झाले नाही. नुकताच एनएमएमएस परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या परीक्षेचे मूल्यांकन सोपे व्हावे या उद्देशाने संगणकीय प्रणालीचा वापर केला जातो. असे असतानाही परीक्षा परिषदेने अद्याप हा निकाल का जाहीर केला नाही, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

उत्तरपत्रिका मूल्यांकन झाले नाही 

काही पालकांनी परिषदेच्या पुण्यातील कार्यालयात फोन केला असता तंत्रज्ञ परगावी गेल्याने उत्तरपत्रिका मूल्यांकन झाले नाही किंवा लवकरच निकाल लागेल अशी विविध प्रकारची उत्तरे मिळत आहेत. तसेच, शाळांमध्येही कोणतीही माहिती नसल्याने मुख्याध्यापकही यावर काहीच सांगू शकत नाहीत. यामुळे पालकांचा संभ्रम वाढल्याचे पालक अमोल नवलपुरे यांनी सांगितले. 

अद्याप नवीन सूचना नाही 

नव्याने सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षात पाचवी व आठवीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या या परीक्षा नेमक्‍या कधी होणार या बाबतही कोणतीही सूचना परीक्षा परिषदेने जाहीर केलेली नाही. यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यांचा संभ्रम वाढला आहे. या बाबत परिषदेचे संचालक तुकाराम सुपे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion about scholarship results