esakal | पिंपरी : कोरोना मृताचे दागिने चोरीचा आणखी एक प्रकार उघड
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

पिंपरी : कोरोना मृताचे दागिने चोरीचा आणखी एक प्रकार उघड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - नेहरूनगर येथील जम्बो कोविड रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याच्या दोन घटना ताज्या असतानाच येथे असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका महिलेच्या अंगावरील चाळीस हजारांचे सोने -चांदीचे दागिने चोरीला गेल्याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

रणवीर जवाहर ठाकूर (वय ३३, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी रविवारी (ता. ९) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या आईला नेहरूनगर येथील जम्बो कोविड रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान फिर्यादी यांच्या आईचा मृत्यू झाला. दरम्यान, फिर्यादी यांच्या आईच्या अंगावर असलेले चाळीस हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे समोर आले.

दरम्यान, अशाच प्रकारे नेहरूनगर कोविड रुग्णालयातून दोन मृत व्यक्तींचा ऐवज चोरीला गेल्याप्रकरणी सहा दिवसांपुर्वी पिंपरी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एका रुग्णाचे ४१ हजारांचे दागिने तर दुसऱ्या रुग्णाचा दहा हजारांचा मोबाईल चोरीला गेला. वारंवार घडत असलेल्या या घटनांमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.