सैराटचा बोगस 'परश्या' पोलिसांच्या तावडीत

Crime
Crime

पिंपरी - बनावट फेसबुक अकाउंटवरून आपण सैराट फेम आकाश ठोसर (परश्या ) बोलत असल्याचे सांगितले. वडिलांना अर्धांग वायूचा झटका आला असून तातडीने उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे खोटे सांगून महिलेला लाखो रुपयांचा गंडा घातला. मात्र, त्याची ही बनावटगिरी जास्त वेळ टिकू शकली नाही. अखेर तो बोगस 'परश्या' पोलिसांच्या जाळ्यात सापडलाच. यातील आरोपी पिंपरी-चिंचवडच्या एका माजी दिवंगत नगरसेवकाचा मुलगा आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवदर्शन उर्फ शिवतेज नेताजी चव्हाण (वय 25 राहणार मोहननगर , चिंचवड स्टेशन) असे अटक आरोपीचे नाव आहे.  शिवदर्शन याने सैराट चित्रपटाचा अभिनेता आकाश ठोसर (परश्या) यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. त्याद्वारे अहमदनगर येथील एका महिलेसोबत मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. आपण आकाश म्हणजेच सैराटचा परश्या असल्याचे सांगितले. संबंधित महिला परश्याची फॅन असल्याने तिने परश्याची जन्मतारीख, तो शिकलेल्या शाळेचे नाव, आवडीनिवडी आदी गोष्टी फेसबुकद्वारे त्याला विचारल्या. दरम्यान, आरोपी शिवदर्शन याने त्यापुर्वीच परश्याची सर्व माहिती घेतली असल्याने त्यानेही महिलेच्या सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली. त्यामुळे महिलेला खात्री पटली. तसेच महिलेने तू आता कुठे आहेस, असे विचारले असताना आरोपी त्यांना आपण शुटिंगमध्ये असल्याचे सांगायचा. महिलेला खात्री पटण्यासाठी आकाश ठोसरचे इंटरनेटवरील शूटिंगचे फोटो त्यांना पाठवायचा.

त्यामुळे महिलेला अधिकच विश्वास बसला. दरम्यान, काही दिवसांनी शिवदर्शन याने फेसबुकवरून आकाश  ठोसरच्या नावाने महिलेकडे पैशांची मागणी केली. वडिलांना अर्धांग वायूचा झटका आला असून त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. तसेच उपचारासाठी तातडीने पैशांची आवश्यकता असल्याचे तो म्हणाला. 

त्यावर महिला म्हणाली, '' तू एवढा मोठा अभिनेता असताना माझ्याकडे पैसे मागण्याची कशी काय गरज भासली''. त्यावर आरोपी शिवदर्शन म्हणाला , ''असे काही नाही, मला मिळालेल्या पैशात गाडी, बांगला घेतला. त्यामुळे सध्या पैशांची खूप गरज आहे''. 

दरम्यान, तातडीची गरज लक्षात घेऊन संबंधित महिलेने पैसे देण्याचे कबूल केले. 

त्यानुसार शिवदर्शन काही दिवसांनी अहमदनगरला गेला. आकाशाचा मित्र असल्याचे सांगत त्याने पैसे घेण्यासाठी पाठविले असल्याचे म्हणाला. त्यावेळी, संबंधित महिलेने मंगळसूत्र व सोन्याची अंगठी असा एक लाख 40 हजार रुपयांचा ऐवज आरोपीकडे दिला. मात्र, त्यानंतर त्याने फेसबुकद्वारे अथवा प्रत्यक्ष कसलाही संपर्क ठेवला नाही.

काही दिवसांनी आपली  फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने अहमदनगर पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तांत्रिक तपास केला असता आरोपी पिंपरी चिंचवड येथील असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलीस पथकाने चिंचवड येथून शिवदर्शन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ऐवज हस्तगत केला.
शिवदर्शन याचे बारावी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्याने आयटीआय केला. दोन, तीन ठिकाणी नोकरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही दिवसातच नोकरी सोडून द्यायचा. दरम्यान, मौज मजा करण्यासाठी जवळ पैसे नसल्याने अशा प्रकारे बनावट फेसबुकद्वारे गंडा घालण्याचा मार्ग निवडला. मात्र, काही दिवसातच तो पोलिसांच्या तावडीत सापडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com