पिंपरी : तुम्हाला गॅस सिलेंडर हवा आहे का?..पण...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

गॅस वितरकांकडून काही ठिकाणी डिलिव्हरी बॉईज दरमहा 15 ते 16 हजार रुपयांच्या मानधनावर नियुक्त केले आहेत. तर काही ठिकाणी त्यांना प्रति सिलेंडर मागे 15 रुपये दिले जातात. बहुतेक डिलिव्हरी बॉईज हे राजस्थान, उस्मानाबाद, बीड भागांतील आहेत.

पिंपरी ः शहर परिसरात गॅस वितरकांकडील डिलिव्हरी बॉईज घरापासून दूर असलेल्या ठिकाणी ग्राहकांना गॅस सिलेंडर नेण्यासाठी बोलावत आहेत. तसेच त्याचवेळेस "डिलिव्हरी चार्जेस'ही उकळत असल्याचे प्रकार घडत आहेत. यामधून, ज्येष्ठ नागरिकही सुटलेले नाहीत. त्यामुळे, नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे. 

आणखी वाचा - पुण्यात कोथरूड संदर्भात महापौर मोहोळ यांचा मोठा खुलासा

शहरात भारत, एचपी आणि आयओसी कंपन्यांशी संबंधित गॅस वितरक एजन्सीज आहेत. त्यांच्याकडील डिलिव्हरी बॉईजकडून घरपोच गॅस सिलेंडर दिले जातात. मात्र, लॉकडाऊनमुळे अनेक गॅस एजन्सीजचे काही डिलिव्हरी बॉईज गावी गेले आहेत. त्यामुळे, थोड्या मनुष्यबळाच्या जोरावर गॅस एजन्सीजला कामकाज चालवावे लागत आहे. महापालिकेने ठिकठिकाणचे भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. त्याचा फायदा घेत डिलिव्हरी बॉईज घेत आहेत. तसेच ग्राहकांना निम्म्या वाटेवर बोलावून त्यांना गॅस सिलेंडर देऊन डिलिव्हरी चार्जेसही उकळत आहेत. 

आणखी वाचा - पुण्यात परप्रांतीय मजुरांकडे दुर्लक्ष का?

चिखली येथील नेवाळे वस्तीमधील रोहित जाधव म्हणाले,""माझ्या सोसायटीतील दोन रहिवाशांना डिलिव्हरी बॉईजने अडवून पैसे घेतल्याचा अनुभव आला आहे. आमचे एक सदस्य ज्येष्ठ नागरिक आहेत. मात्र, त्यांनाही निम्म्या रस्त्यापर्यंत बोलावून 50 रुपये डिलिव्हरी चार्जेस घेतले आहेत. मी देखील गॅसची नोंदणी केली होती. मलाही डिलिव्हरी बॉईजने पैसे, कार्ड घेऊन तसाच निरोप दिला होता. मात्र, मी त्यास नकार दिला. तसेच त्याबद्दल तक्रार करणार असल्याचे सांगितल्यावर संबंधित डिलिव्हरी बॉईजने 20 रुपये जादा वसूल केले.''

 शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे म्हणाल्या,""प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करण्यास बंदी आहे. केवळ दिव्यांग अथवा ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सिलेंडर देण्याच्या सूचना आहेत. डिलिव्हरी बॉईजने पावतीपेक्षा जास्त पैसे मागणे चुकीचे आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा गॅस समन्वयक चित्रा नायर म्हणाल्या,""प्रत्येक गॅसच्या पावतीतच डिलिव्हरी चार्जेसचा अंतर्भाव असतो. एखाद्या ग्राहकाने स्वखुशीने डिलिव्हरी बॉईजला पैसे देणे वेगळी गोष्ट आहे. परंतु, पैसे अडवून मागणे अयोग्य आहे. गॅस एजन्सीचे दुकान असो वा गोदाम तेथे जाऊन एखाद्या ग्राहकाने समक्ष गॅस सिलेंडर घेऊन गेला असेल तर त्याला संबंधित वितरकाने सिलेंडर मागे परतावा (रिबेट) दिला पाहिजे.'' 

डिलिव्हरी बॉईजला मिळतात पैसे... 
गॅस वितरकांकडून काही ठिकाणी डिलिव्हरी बॉईज दरमहा 15 ते 16 हजार रुपयांच्या मानधनावर नियुक्त केले आहेत. तर काही ठिकाणी त्यांना प्रति सिलेंडर मागे 15 रुपये दिले जातात. बहुतेक डिलिव्हरी बॉईज हे राजस्थान, उस्मानाबाद, बीड भागांतील आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delivery boys charge more for gas cylinders