
‘काही नाही. मीटिंग शांततेत झाली. सर्व विषयांवर साधक-बाधक चर्चा झाली.’ ‘निवडणूक अवघी वर्षावर आलीय, हे वर्ष तर कोरोनामुळे असंच वाया गेलंय. आता कामं करावी लागतील.’ ‘अरे, तुमच्या भागातली काही नवीन कामं असतील सुचवा. येत्या मीटिंगमध्ये मंजूर करून टाकू.’ ‘आम्हाला भुयारी मार्ग करायचाय. आठवडाभरात त्याचं सर्वेक्षण होईल व पुढच्या डिसेंबरपर्यंत तो पूर्ण होईल.’ ही वक्तव्यं आहेत.
पिंपरी - ‘काही नाही. मीटिंग शांततेत झाली. सर्व विषयांवर साधक-बाधक चर्चा झाली.’ ‘निवडणूक अवघी वर्षावर आलीय, हे वर्ष तर कोरोनामुळे असंच वाया गेलंय. आता कामं करावी लागतील.’ ‘अरे, तुमच्या भागातली काही नवीन कामं असतील सुचवा. येत्या मीटिंगमध्ये मंजूर करून टाकू.’ ‘आम्हाला भुयारी मार्ग करायचाय. आठवडाभरात त्याचं सर्वेक्षण होईल व पुढच्या डिसेंबरपर्यंत तो पूर्ण होईल.’ ही वक्तव्यं आहेत, विद्यमान नगरसेवकांची. महापालिका निवडणूक अवघी वर्षभरावर आल्याने आपापल्या प्रभागातील प्रलंबित, अपूर्ण व नवीन कामे करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे विद्यमान व माजी नगरसेवकांसह अन्य इच्छुकांच्यासुद्धा महापालिकेत चकरा वाढल्या आहेत.
सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झालाय. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून होऊ न शकलेल्या महापालिका विषय समित्यांच्या बैठकी प्रत्यक्ष उपस्थित राहून सुरू झाल्या आहेत. नगरसेवकांसह प्रशासनाने सुचविलेल्या विषयांसह ऐनवेळचे विषय उपसूचनांसह मंजूर करून घेतले जात आहेत. कारण, महापालिका निवडणूक अवघी वर्षभरावर आली आहे. त्यामुळे बहुतांश नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील रस्ते, सांडपाणी वाहिन्या दुरुस्तीची कामे काढली आहेत. त्यानिमित्ताने अर्धवट व प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
विषय समित्याही गजबजल्या
महापालिका विषय समित्यांच्या अर्थात विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, क्रीडा- साहित्य- सांस्कृतिक आणि शिक्षण या समित्यांच्या सभा होऊ शकल्या नाहीत. त्यांच्याही सभा आता होऊ लागल्या आहेत. शहर सुधारणा (ता. १५), शिक्षण (ता. १७) आणि महिला व बालकल्याण (ता. २४) यांच्या सभा झाल्या आहेत. क्रीडा-साहित्य व सांस्कृतिक समिती सभा सोमवारी (ता. २८) व विधी समिती सभा शुक्रवारी (ता. १) होणार आहे.
दापोडीत जुगार अड्ड्यावर छापा; दहा जणांवर गुन्हा
स्थायी सभा शांततेत
स्थायी समितीत सर्वच विषयांवर चर्चा होते. एका पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यासह ग्लास फोडणे, अजेंडा फाडणे, फायली भिरकावणे, प्रसंगी सभा तहकूब करणे असे प्रकार वारंवार घडले आहेत. गेल्या दोन सभांपासून मात्र सर्वकाही अलबेल सुरू आहे. नेहमी वादग्रस्त ठरणारी स्थायी समितीची साप्ताहिक सभा गोडी-गुलाबी व शांततेत होऊ लागली आहे. बुधवारची (ता. २३) सभा अवघ्या दीड तासांत आटोपली. नियोजित ५३ विषयांसह ६२ विषयांवर चर्चा झाली. ऐनवेळचे विषय व उपसूचना मंजूर झाल्या. यावरून ‘निवडणूक आली रे!’चा संदेश मिळत आहे.
लोणावळा गजबजले, हॉटेल, रिसॉर्ट हाउसफुल्ल!
Edited By - Prashant Patil