भोसरी : दिघीकरांना विजजोड भूमिगत होण्याची प्रतीक्षाच 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

एकाच खांबावर अधिकचे जोड; स्पार्क होऊन आग लागण्याची भीती 

भोसरी : "अनेक घरांना एकाच खांबावरून विजजोड दिल्याने पावसाळ्यात काही वेळी भिंतीमध्ये वीज प्रवाह उतरतो. तसेच, स्पार्क होऊन आग लागण्याचीही भीती असते. वीज खंडित होण्याचे प्रकारही घडत आहेत,'' असे दिघी-आदर्शनगरमधील गिरणीचालक सरजू जयस्वाल सांगत होते. 

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा राजकीय 'बॉम्ब'

दिघी परिसरात घरगुती वीजजोड भूमिगत न देता वीजखांबावरून दिले आहेत. काही ठिकाणी एकाच खांबावर पन्नास ते साठ वीजजोड दिसून येतात. त्यामुळे खांबावर केबलचे जाळे तयार झाले आहे. एकाच खांबावरून अधिक जोड दिल्याने वाऱ्यामुळे शॉर्ट सर्किट होतो. परिणाम वीज खंडित होते. दिघीतील हिंदू कॉलनीकडे जाताना वीजतारा अचानक तुटल्याने शॉर्ट सर्किट झाला होता. याविषयी रहिवाशांनी तक्रार दिली होती. पण, तात्पुरता वीजपुरवठा सुरळीत करून समस्या सोडविण्यात आली. 

पिंपरी-चिंचवड शहरात आज 22 मृत्यूंची नोंद 

दिघी-आदर्शनगरातील सावंतनगरपासून छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंतच्या सुमारे एक किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर वीजखांब रस्त्यामध्ये आलेले आहेत. या रस्त्यावर मुख्य बाजारपेठ असल्याने नेहमीच वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या कडेला भाजी व्यावसायिक ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झालेली आहे. त्यात रस्त्यावरील वीजखांबामुळे वाहनचालकांना अपघात होण्याची शक्‍यता आहे. याशिवाय खांबांच्या अडथळ्यामुळे काहीवेळा वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागतो. याविषयी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. 

दिघीतील भूमिगत केबलचे रखडले काम : 

आदर्शनगर, शिवनगरी, समर्थनगर, गजानन महाराजनगर 

दिघीतील सावंतनगर ते आळंदी रस्त्यापर्यंतच्या रस्त्यावरील केबल भूमिगत करण्यात येणार आहेत. अत्यावश्‍यक काम म्हणून महापालिकेने या कामासाठी 96 लाखांची तरतूद केली आहे. वीजखांबावरील जोड भूमिगत करण्याचेही काम सुरू आहे. खांबावरील जोड भूमिगत केल्यावर रस्त्यामध्ये येणारे खांबही काढण्यात येतील. यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागेल. 
- विकास डोळस, नगरसेवक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dighi's citizens is waiting for underground power supply