‘कोरोना बॉडी स्कॉड’च्या कर्मचाऱ्यांची हेळसांड; नातेवाइकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन

Corona_Death
Corona_Death

पिंपरी : गेल्या अकरा महिन्यांपासून कोरोना मृतदेहाची योग्य नियमांचे पालन करून विल्हेवाट लावण्यासाठी ‘कोरोना बॉडी स्कॉड युनिट’ची महापालिकेने स्थापना केली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित केबिन नाही. मृतांचे काही नातेवाईक थेट शव असलेल्या ठिकाणी येऊन कोविड नियमांचे उल्लंघन करतात. कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ, प्रसंगी मारहाणही करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे नातेवाइकांना आवरा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

सध्या शहर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अडकले आहे. दररोज तीन हजारांहून अधिक रुग्ण बाधित होत आहेत. सरासरी १४ मृतदेह युनिटकडे आणले जातात. यासाठी युनिटला १६ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिवाची पर्वा न करता सर्वजण कार्यरत आहेत. परंतु, येथे ‘शव’ ठेवण्यासाठी कार्बन स्टीलमधील योग्य स्ट्रेचर नाही. सुरक्षा साधनांची कमतरता आहे. त्यामुळे अवस्था बिकट आहे. वायसीएमच्या आवारात मंडप टाकून बॉडी युनिट तयार केले आहे. त्याठिकाणी शव घेण्यासाठी दहा ते पंधरा जण गर्दी करतात. गोंधळ घालतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. गेल्या वर्षभरापासून चार खांदेकरीचे काम आम्ही करत आहोत, तरीही आम्हाला दमबाजी आणि शिवीगाळ केली जाते. प्रसंगी मारहाणही होते. 

दररोज जीव धोक्यात घालून हे कर्मचारी प्रामाणिक सेवा बजावत आहेत. योग्य नियोजन न केल्यामुळे या सर्वच कोविड योद्ध्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या मित्राचे शवासंदर्भात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात गेलो असता, त्या ठिकाणी असे विदारक दृश्य नजरेस पडल्याचा अनुभव प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केला.

हे केले पाहिजे 
१) कोविड स्कॉड बॉडी युनिटकडे येणाऱ्या प्रत्येक शवाला ‘फर्स्ट कम’ (प्रथम येणाऱ्या शवास प्राधान्य) पद्धतीने अनुक्रमे क्रमांक असावा. त्यामुळे कोणीही नातेवाईकमध्येच येऊन शव नेण्याची घाई करणार नाही किंवा दमबाजी करणार नाही. त्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असावी. 
२) या युनिटच्या प्रमुख कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र छोटी सुरक्षा केबिन असावी. 
३) मृतदेह देताना जवळच्या दोन व्यक्तींनाच प्रवेश द्यावा. गावजत्रेसारखी गर्दी तंबूत होणार नाही. 
४) लोखंडी स्ट्रेचर मृतदेहाच्या वजनामुळे वाकून जाते. त्याऐवजी स्ट्रेचर ट्रॉली ही कार्बन स्टीलची मजबूत, पण हलक्या वजनाची हवी. 
५) प्रत्येक कर्मचाऱ्यास महापालिकेचा ड्रेस कोड द्यावा.

- पिंपरी-चिंचवडमधील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com