esakal | त्या’ बापलेकांसमोर व्हिलनही फिका!
sakal

बोलून बातमी शोधा

pune

‘त्या’ बापलेकांसमोर व्हिलनही फिका!

sakal_logo
By
मंगेश पांडे

पिंपरी : पैशांसाठी अपहरण करायचे, जंगलात नेऊन पिस्तुलातून गोळीबार करत जंगली प्राण्यांची भीती दाखवायची... अशी दृश्ये आजपर्यंत आपण दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पाहत आलो आहोत. मात्र, अशा चित्रपटांतील व्हिलनपेक्षाही विकृत वृत्तीच्या औंधमधील बाप-लेकाचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. ते ऐकल्यानंतर यापुढे दाक्षिणात्य सिनेमातील व्हिलनही फिका पडेल, अशी स्थिती आहे. आता ‘नाना’ नामक या व्हिलनसह त्याच्या मुलाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून दोघेही तुरुंगाची हवा खात आहेत.

औंधसह पुणे परिसरातील अनेकांच्या जमिनी बळकावल्या. धाक-दपटशा करत सह्या करण्यास भाग पडून जमिनी नावावर करून घेत मोठी माया जमवली. यातून मिळालेल्या पैशांतून व्याजाचा धंदा सुरु केला. चक्रवाढ व्याज लावायचे आणि व्याज थकल्यास पैसे घेतलेल्या व्यक्तीची पिळवणूक करायची. मानसिक, शारीरिक त्रास देत त्याची मालमत्ता बळकावून मुद्दल व व्याजाचे पैसेही घ्यायचे...यासारखे अनेक उद्योग या बाप-लोकांनी केले. मात्र, त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यास कोणी धजावत नव्हते.

तक्रार देण्यासाठी गेले तरी पोलिस प्रशासन अथवा संबंधित यंत्रणा त्याची दाखल घेत नव्हती. आता या बाप-लेकाचे गंभीर स्वरूपाचे कारनामे पुढे येऊ लागले असून त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड व पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. दोन्ही ठिकाणी त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाईही केली असून पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या बाप-लेकाचे आणखी कारनामे समोर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: जिल्हा परिषद देणार गुणवंत मुलींना शाबासकी

गंभीर गुन्हे दाखल

या बाप-लेकावर सांगवी, हिंजवडी, चिखली, चतुःशृंगी आदी पोलिस ठाण्यात कट रचून कागदपत्रावर फसवणूक करणे, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, विवाहितेचा छळ असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या बाप लेकासह त्यांच्या टोळीवर पिंपरी- चिंचवड व पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई केली आहे.

राजकीय वरदहस्त

‘नाना’चा सख्खा मावसभाऊ एका विधानसभेचा विद्यमान आमदार आहे. या आमदाराच्या निवडणुकीत नाना मोठ्याप्रमाणात पैसे लावतो. दरम्यान, नाना व त्याच्या मुलालाही राजकारणाचे डोहाळे लागले. एका राष्ट्रीय पक्षाच्या गोटातही गेले.

हेही वाचा: पुणे जिल्हा परिषद बळीराजाच्या पाठीशी; 'या'साठी देणार अनुदान!

मगरींसमोर समोर लटकविले

व्याजाने घेतलेले पैसे न दिल्यास, कागदपत्रावर सह्या न केल्यास संबंधित व्यक्तीचे अपहरण करायचे, नानाच्या फार्म हाउसवर नेऊन गोळीबार करीत धमकावायचे. एवढ्यावर न ऐकल्यास तळ्यातील मगरींपुढे लटकविण्याची धमकी द्यायचे.

सुनेलाही सोडले नाही

सामान्य नागरिकांच्या जमिनी लुबाडून, पैशांसाठी त्यांना त्रास देणाऱ्या नाना व त्याच्या मुलाने सुनेलाही सोडले नाही. नानाने त्याच्या सुनेचा छळ केला. ही सूनही एका मोठ्या राजकीय घरातील आहे.

हेही वाचा: झारखंडमधल्या 50 मुलींना सोनु सुद देणार नोकरी

जाओ उसको उठा के लाओ

‘जाओ उसको उठा के लाओ’ हा डायलॉग शक्यतो सिनेमात व्हिलनच्या तोंडी ऐकायला मिळतो. मात्र, नाना त्याच्या बागडबिल्ल्यांना असाच आदेश द्यायचा. त्यानुसार पैसे वसुलीसह दमदाटी करण्यासाठी त्याने काही जणांची नेमणूकच केली होती.

आलिशान गाड्यांचा शौक

कोट्यवधी रुपये किमतीच्या गाड्यांचा तो शौकीन असून परदेशातून इम्पोर्ट केलेल्या गाड्या तो वापरतो. त्याच्या गाड्यांचा ताफा शहरभर फिरत असतो.

loading image
go to top