Video : पिंपरीतील जम्बो रुग्णालयात फॅसिलिटीही 'जम्बोच' 

पीतांबर लोहार
Saturday, 5 September 2020

 • नेहरूनगर रुग्णालयात 171 रुग्णांवर उपचार
 • ऑटो क्‍लस्टर रुग्णालयात सहा रुग्ण दाखल 

पिंपरी : "पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये एकाच दिवशी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तशी परिस्थिती आपल्यावर ओढवणार नाही, याची काळजी घ्या.' "रुग्णांना चांगली सेवा द्या. मनुष्यबळ वाढवा.' "आपल्याकडे सर्व सुविधा आहेत. रुग्णांवर वैयक्तिक लक्ष आहे.' हे संवाद आहेत, महापालिकेतील दोन वरिष्ठ अधिकारी आणि अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या जम्बो फॅसिलिटी रुग्णालयातील डॉक्‍टरांमधील. यावरून रुग्णांची वैयक्तिकपणे काळजी घेतली जात असल्याचे दिसले. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपका

शिक्षकदिनाच्या पुरस्कारांनाही कोरोनाचा 'संसर्ग'

पुणे व पिंपरी-चिंचवडसह परिसरातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत आहे. महापालिका व शहरातील खासगी रुग्णालयांतील बेड कमी पडू लागले आहेत. त्यांची संख्या वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने जम्बो फॅसिलिटी रुग्णालये उभारले आहेत. यातील नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे उभारलेले रुग्णालय तीन दिवसांपासून सुरू झाले आहे. चिंचवड स्टेशन येथील ऑटोक्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर येथील जम्बो रुग्णालय शुक्रवारपासून (ता. 4) सुरू झाले. पहिल्याच दिवशी दुपारी तीनपर्यंत सहा रुग्ण दाखल झाले होते. या रुग्णालयाचा सर्व खर्च महापालिकेने केला आहे. 

अशा आहेत सुविधा 
जम्बो रुग्णालयात जनरल, ऑक्‍सिजन, आयसीयू (अतिदक्षता विभाग), व्हेंटिलेटर सुविधा (एचडीयू) आहेत. रुग्णांवर मोफत उपचाराची सुविधा असून, सकस आहार, पाण्याची सोय आहे. आपत्कालीन स्थितीसाठी अग्निरोधक यंत्रणा बसविली आहे. प्रत्येक विभागात डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष आहेत. स्ट्रेचरसह व्हिलचेअरही आहेत. रुग्णालयाच्या (स्टेडियम) संरक्षण भिंतीलगतचे गवत, अनावश्‍यक झाडेझुडपे काढण्याचे काम शुक्रवारी सुरू होते. सध्या ऑक्‍सिजन, आयसीयू व एचडीयू असे तीन वॉर्ड कार्यान्वित झाले आहेत. 

कोरोना तपासणी नाही 
रुग्णालय आवाराच्या प्रवेशद्वारावर मोशीतील दोन तरुण आले होते. एकाच्या तोंडाला रुमाल तर, दुसऱ्याने मास्क लावले होते. मास्कवाल्याला कोरोनाची तपासणी करून घ्यायची होती. मात्र, या ठिकाणी तपासणी होत नसल्याचे त्याला सांगण्यात आले. त्याचा मित्र, "चल जिजामाताला जाऊ', म्हणाला आणि दोघेही निघून गेले. 

वस्तुस्थिती 
रुग्णालयाच्या परिसरात काही लोखंडी साहित्य पडून आहे. तसेच एका प्रवेशद्वाराच्या समोर भंगार साहित्य पडलेले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने जप्त केलेले हे सर्व साहित्य आहे. 

जम्बो फॅसिलिटी रुग्णालये 

 • मगर स्टेडियम : 800 (रुग्णसेवा सुरू) 
 • ऑटोक्‍लस्टर : 200 (काम पूर्ण) 
 • बालनगरी पिंपरी : 425 (उद्‌घाटन बाकी) 

मगर स्टेडियम सद्यःस्थिती 

 • एकूण बेड : 800 
 • ऑक्‍सिजन बेड : 600 
 • आयसीयू बेड : 200 

दृष्टिक्षेपात आयसीयू बेड 

 • आयसीयू : 60 
 • एचडीयू बेड : 140 
 • व्हेंटिलेटर : 30 

शुक्रवारची रुग्णसंख्या (दुपारी बारापर्यंत) 

 • एकूण रुग्ण : 171 
 • आयसीयूमध्ये : 20 
 • जनरल वॉर्ड : 151 

दृष्टिक्षेपात मनुष्यबळ 

 • डॉक्‍टर : 50 
 • नर्स : 80 
 • एकूण युनिट : 3 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वायसीएम, नवीन भोसरी, जिजामाता, ससून व पुणे महापालिका रुग्णालयातून पाठविलेले पॉझिटिव्ह रुग्ण जम्बो फॅसिलिटी रुग्णालयात दाखल करून घेतो. आयसीयू, एचडीयूसह एक्‍स-रे, पॅथॉलॉजी लॅब, डायलिसिसची सुविधा येथे आहे. डॉक्‍टर्स, नर्ससह स्वच्छता कर्मचारी, वॉर्डबॉय पुरेसे आहेत. भविष्यात कोविड टेस्ट इथेच करण्याचे नियोजन आहे. 
- डॉ. प्रीती व्हिक्‍टर, प्रमुख, जम्बो फॅसिलिटी रुग्णालय, मगर स्टेडियम, पिंपरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: facility of jumbo hospital in pimpri chinchwad