'महापालिका सभागृहातील वाघ गेला', आठवणींना उजाळा देत राजकीय पदाधिकाऱ्यांची दत्ता साने यांना श्रद्धांजली 

'महापालिका सभागृहातील वाघ गेला', आठवणींना उजाळा देत राजकीय पदाधिकाऱ्यांची दत्ता साने यांना श्रद्धांजली 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक दत्ता (काका) साने यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे राजकीय पोकळीक निर्माण झाली असून सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. अगदी मोजक्‍याच राजकीय पदाधिकारी व नातेवाइकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर निगडीतील स्मशानभूमीत अंत्यंसंस्कार करण्यात आले. साने दिलदार, खुल्या आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते. नेहमी प्रवाहाच्या विरोधात वाहणारा, कर्तव्यतत्पर नेता होता. कायम लोकांसाठी झटणारा महापालिका सभागृहातील वाघ गेला, अशा शब्दांत आठवणींना उजाळा देत राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

झुंजार कार्यकर्ता, चांगला सहकारी गमावला 

"दत्ता साने यांच्या निधनाने जनतेच्या प्रश्‍नांसाठी तळमळीने काम करणारा झुंजार कार्यकर्ता, चांगला सहकारी गमावला आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने धडाडीचा कार्यकर्ता गमावला आहे. संघटनेची ध्येयधोरणे तडफेने राबविणाऱ्या या झुंजार कार्यकर्त्याची, सहकार्याची उणीव कायमच जाणवेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. 

सभागृहातील वाघ गेला 

"मनमिळाऊ स्वभावाचे होते. कधी कोणाला तोडून बोलले नाहीत. नागरिकांचा प्रश्‍नांसाठी सभागृहात नेहमी आवाज उठवीत होते. विरोधात असले तरी आपला मुद्दा पटवून देत तो प्रश्‍न सोडवून घेत असत. प्रभागात त्यांचे बारीक लक्ष होते. सभागृहातील वाघ गेला, अशा शब्दात महापौर उषा ढोरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

त्यांच्या निधनाने निःशब्द झाले 

"पक्ष कुठलाही असो, पण व्यक्ती म्हणून ते उत्तम होते. नगरसेवक म्हणून उत्तम कामगिरी त्यांनी केलेली आहे. पक्षाची निष्ठावंत होते, परंतु विरोधकांना त्रास दिला नाही. त्यांच्या निधनाने निःशब्द झाले, शॉक झाले आहे. अजूनही मनाला मान्य होत नाहीये, ईश्‍वर त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करो, अशा शब्दात भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी भावना व्यक्त केली. 

मार्गदर्शक मित्र हरपला 

"राजकारणातील एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व तसेच, विश्‍वासू आणि मार्गदर्शक मित्र हरपला आहे. मी राजकारणात येण्यापूर्वीपासून माझे आणि त्यांचे जवळचे संबंध होते. मित्रत्वाच्या नात्याने मी कधीही त्यांना फोन केला, तर ते मदतीला धावून यायचे. साने यांचे अचानक जाणे माझ्यासाठी मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. 

दिलदार मित्र गमावला 

"महापालिका सभागृहात आम्ही सोबत काम केले. स्पष्ट वक्ता, मनमिळाऊ स्वभावाचा दिलदार मित्र गमावला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर माझे तीनवेळा बोलणे झाले होते. ते घाबरले, खचले होते. चांगला मित्र हरपल्याचे दुःख प्रतिक्रिया खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली. 

25 वर्षांची साथ संपली 

"दिलदार मित्र, खुल्या मनाचा होता. दिवंगत महापौर मधुकर पवळे यांच्यापासून तो माझ्याबरोबर असायचा. 25 वर्ष आम्ही बरोबर होतो. काही महिन्यांपूर्वी आम्ही एकत्र 15 दिवस परदेशात गेलो होतो. उमद्या मनाचा दिलदार मित्र अकाली आघात करून जायला नको होता, अशी भावनिक प्रतिक्रिया आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केली. 

अभ्यासू व्यक्तीमत्व हरवले 

"राष्ट्रवादी पक्षातील हरहुन्नरी, अभ्यासू व्यक्तीमत्व हरवले. अगदी पोटतिडकीने ते प्रश्‍न मांडायचे, नागरीकांच्या प्रश्‍नांसाठी झटायचे म्हणून ते लोकप्रिय होते. विरोधीपक्ष नेते म्हणून स्वत:चा ठसा उमटवला. चिखली, सानेवस्ती, भोसरीकरांचे मोठे नुकसान झाले आहे. बनसोडे कुटूंबियांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात आमदार अण्णा बनसोडे यांनी सांत्वन केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी हानी 

"महापालिका सभागृहात लोकांच्या प्रश्‍नांसाठी भांडून प्रश्‍न सोडून घेण्याची त्यांची वेगळी कला होती. नेहमी लोकांसाठी झटत राहणारा कार्यकर्ता होता. काकाच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली असून ढाण्या वाघ गेल्याचे प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी व्यक्त केली. 

राष्ट्रवादीचे नुकसान 

"शरद पवार साहेबांवर मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता होता. अजितदादांचे त्याला मार्गदर्शन असत. ज्यावेळी ग्रामीण भागातील गावे महापालिकेत समाविष्टगावांचा घरांच्या कराचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यावेळी अजितदादांच्या माध्यमातून रात्री साडेबारा वाजता मंत्रालयात बसून नगरविकास विभागाचा आदेश काढून घेतला होता. त्यावेळी आम्ही सोबत होतो. काकांच्या निधनाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे फार मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया माजी आमदार विलास लांडे यांनी व्यक्त केली. 

मनस्वी कार्यकर्ता हरपला 

"दत्ताकाका आणि मी बजाज ऑटो सोबत कामाला होतो. एखादी गोष्ट नाही पटली, तर वेळप्रसंगी पक्षाच्या विरोधात भूमिका घेत असत. पण जे मनाला पटेल तेच करत असत. कोणाची भीड बाळगत नव्हते. आमदारकीची निवडणूक लढविण्याची इच्छा होती. परंतु, संधी मिळाली नाही. सर्वांना सहकार्य करणारा कर्तबगार नेता गमावल्याची प्रतिक्रिया माजी महापौर योगेश बहल यांनी व्यक्त केली. 

कुटुंबातील सदस्य गेल्याचे दुःख 

"कुटुंबातील सदस्य गेल्यासारखे वाटत आहे. अनेकदा एखादी गोष्ट करू नको, म्हटले तरी काका मनाला वाटेल तेच करत असे. कधी कोणाचे ऐकले नाही. काका नेहमी प्रवाहाच्या विरोधात पोहत असत. नेहमी लोकांमध्ये राहणारा काका कोरोनाच्या काळातही लोकांमध्ये मिसळला. स्वभावाप्रमाणेच कोरोनाच्या काळातही प्रवाहाच्या विरोधात गेल्याने अकाली निधन झाले, अशा शब्दात शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी भावना व्यक्त केल्या. 

तीव्र दु:ख झाले 

लॉकडाउन कालावधीत नागरिकांची सेवा करताना त्यांना लागण झाली होती. त्यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख झाल्याची भावना आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com