Voting
Voting

भाऊ, पंधरा तारखेला मतदानाला यायचंच...

पिंपरी - ‘भाऊ, आपल्या ग्रामपंचायतीचं पंधरा तारखेला मतदान आहे. तुझी वहिनी उभी आहे. मतदानाला यायचं बरं. नाही निवडणूक जरा चुरशीची होतेयं म्हणून म्हणतोय. आणि तू आपला घरचा माणूस आहे, म्हणून एवढा आग्रह करतोय. गावाचा विकास आपल्याला करायचाय...’ हे शब्द आहेत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार, त्यांचे भाऊ, वडील, सासरे, दीर अन्‌ समर्थकांची. त्यामुळे निवडणूक ग्रामपंचायतींची असली, तरी त्याचा फीव्हर मात्र शहरात अर्थात महापालिका क्षेत्रातही बघायला मिळत आहे. 

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराला जोर आला आहे. जुन्या पिढीसह तरुणाईही निवडणूक रिंगणात उतरली आहे. अनेक ठिकाणी भावकीतील कुटुंबे, शेजारी-शेजारी एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. गावातील मतदारांसह नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात आलेल्यांनासुद्धा मतदानासाठी साकडे घातले जात आहे. उमेदवारांसह त्यांचे नातेवाईक व समर्थक फोन करून मतदानाला येण्याबाबत आग्रह करीत आहेत. 

सोशल मीडियाचा वापर
ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार, त्यांचे पॅनेल, अनुक्रमांक व निवडणूक चिन्ह असलेली पत्रके मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी फोनप्रमाणेच व्हॉटस्‌ॲप, ई-मेल, फेसबुक आदी साधनांचा वापर केला जात आहे. ‘अमूक अमूक जण गाडी करून येतो आहे, त्याच्याशी बोलून घे. वाटल्यास त्याच्या सोबत ये. पण, मतदानाला ये बरं...’ अशी गळही घातली जात आहे. 

जोडून सुटीचा मुहूर्त
ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. १५) मतदान आहे. गुरुवार (ता. १४) औद्योगिक सुटीचा दिवस आहे. शिवाय, या दिवशी मकरसंक्रांत आहे. त्यामुळे सणही साजरा होईल आणि मतदानही करता येईल, या हेतूने काही जण गावी जाण्याच्या तयारीत आहेत. शनिवार व रविवार सार्वजनिक सुटीचे दिवस आहेत. त्यामुळे शुक्रवारी रजा टाकून तीन दिवस सुटी घेऊनही काही गावी जाण्याची तयारी केली आहे. 

मतदार म्हणतात...
‘माझा चुलत भाऊ निवडणुकीसाठी उभा आहे. त्यामुळे मी गुरुवारी रात्रीस मतदानासाठी निघणार आहे. शिवाय, शनिवार, रविवार सुटीच आहे,’ खासगी कंपनीत आर्किटेक्‍चर असलेले किशोर सांगत होते. ‘माझ्या वर्गमित्राची बायको निवडणुकीला उभी आहे. त्याने खूपच आग्रह केला. त्यामुळे जावचं लागणार आहे,’ तळवडे ज्योतिबानगरमधील कंपनीतील कामगार नीलेश सांगत होते. पेट्रोल पंपावर ऑपरेटर असलेले अनिल म्हणाले, ‘मतदानासाठी मलाही फोन आला होता. पण, पंधरा दिवसांपूर्वीच मी गावाहून आलो. मेहुण्याचं लग्न होतं. त्यामुळे आता काही जाणार नाही.’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

७५ टक्के बाहेरील लोक
पिंपरी-चिंचवड शहर अनेक गावांचे मिळून बनलेले आहे. सुमारे ७५ टक्के लोकसंख्या नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात स्थायिक झाली आहे. अनेक जण इथले मतदारही आहेत. पण, अनेकांचे मतदान आजही गावात 
आहे. त्यामुळे विदर्भ, खानदेश, मराठवाडा, कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांश जण मतदानासाठी मूळगावी जाण्याच्या तयारीत आहेत.

कशाळमध्ये सव्वाशे नावे अनोळखी
कामशेत - मावळातील ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्डातील मतदारांच्या नावासह बोगस मतदारांची नोंदणी झाल्याचे आढळून आले आहे. मतदानाच्या दोन दिवस अगोदर कशाळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या किवळे वॉर्ड क्रमांक दोनमध्ये एकशेसव्वीस बोगस मतदारांच्या नोंदीवर गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. किवळे गावाच्या मतदार यादीत वॉर्डात वास्तव्य करीत नसलेल्या मतदाराची नावे आली कशी, असा प्रश्‍न तानाजी पिचड, रोशन पिंगळे, गोरख पिंगळे, राजेंद्र पिंगळे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी उपस्थितीत केला आहे. 

या वॉर्डात बोगस नावे असलेल्या मतदारांची यादीच ग्रामस्थांनी तहसीलदार मधुसूदन बर्गे आणि तहसील कार्यालयात निवडणूक विभागाला दिली आहे. निवडणूक विभागाने या बोगस मतदारांना योग्य ती समज द्यावी, अन्यथा वादविवाद होण्याची शक्‍यता ग्रामस्थांनी बोलून दाखवली.

किवळेत गावात पिढ्यान्‌पिढ्या पिचड, चिमटे, मदगे, पिंगळे, वायकर, लोटे, गवारी, खामकर, मोरमारे, अंकुश, दळवी, गोडे या आडनावाचे मतदार राहत आहेत. यापूर्वी झालेल्या सर्व निवडणुका गुण्यागोविंदाने वादविवाद रहित झाल्या आहेत. स्थानिकांची ५२९ इतकीच मतदार संख्या आहे.पण आज मितीस मतदार यादीत नव्याने मेहबूब, बासा, पेट्रो, निरपळ, सय्यद, चुरगुस्ती, अग्रवाल, भट्ट, सिह, दिन्नी, मोंहतो, जांभूळकर, पंडित, बंभानिया, दरोडे, कुंभार अशा वेगवेगळ्या आडनावाच्या एकशे सव्वीस मताची भर पडली आहे.

खेडोपाडी होणाऱ्या या निवडणुकीत स्थानिक मतदारांना कोणाचा हस्तक्षेप नाही, पण ही एकशे सव्वीस मतदार वॉर्डातील नसतील तर त्यांनी मतदान का करावे, असा सूर ग्रामस्थ आळवीत आहेत. हे एकशे सव्वीस मतदारांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, अशी अपेक्षा पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अनिता चिमटे यांनी व्यक्त केली. आमच्या गावातील बोगस मतदानाविषयी तहसील कार्यालयात हरकत नोंदवली आहे. मात्र, त्याची दखल घेतली नसल्याचे गोरख पिंगळे यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदारांनी आपली ओळख पटवून दिली, तर त्याच्या मतदानाचा हक्क नाकारता येत नाही. आजच्या घडीला ही नावे मतदार यादीतून कमी करणे अशक्‍य आहे. - रावसाहेब चाटे, नायब तहसीलदार

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com