esakal | स्वास्थ्यासाठी शिक्षकांना हवीय ‘धन्वंतरी’; दोन हजार जण योजनेपासून वंचित
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC

स्वास्थ्यासाठी शिक्षकांना हवीय ‘धन्वंतरी’; दोन हजार जण योजनेपासून वंचित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिका सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून ‘धन्वंतरी स्वास्थ्य योजना’ सुरू आहे. मात्र, वारंवार मागणी करूनही या योजनेपासून शेकडो शिक्षक वंचित आहे. परिणामी, शिक्षकांचा आरोग्य सेवेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर ‘आम्हालाही ही योजना लागू करा,’ अशी मागणी शिक्षक करू लागले आहेत.

एक सप्टेंबर २०१५ पासून ‘धन्वंतरी स्वास्थ्य योजना’ सुरू आहे. महापालिकेच्या शाळांमधील सेवेतील, तसेच सेवानिवृत्त शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वैद्यकीय उपचारांसाठी ही योजना लागू करण्याची शिफारस शिक्षण मंडळाने तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली होती. ही स्वास्थ्य योजना लागू केल्यास त्याचा लाभ महापालिका शाळांतील एक हजार दोनशे शिक्षक आणि आठशे सेवानिवृत्त शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार आहे. या योजनेसाठी शिक्षकांच्या मासिक वेतनातून अद्याप कपात केली जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. ही योजना महापालिका प्रशासनाने तातडीने राबविण्याची विनंती मंडळाच्या तत्कालीन सभापती चेतन घुले, उपसभापती नाना शिवले यांच्यासह सर्व सदस्य, तत्कालीन प्रशासन अधिकारी आशा उबाळे, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विजय कुंजीर, राज्य पदवीधर प्राथमिक आणि केंद्र प्रमुख सभेचे अध्यक्ष मनोज मराठे, अनुसूचित जमाती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नाना तिटकारे, राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे अध्यक्ष शरद लावंड केली होती. या बाबत वारंवार बैठका घेतल्या होत्या. महेश लांडगे यांनीदेखील मागणी मान्य केली होती. परंतु गेल्या सहा वर्षांपासून मागणीचा प्रस्ताव पडूनच आहे. नुकतेच निवेदने देण्यात येतात, पण कागदोपत्री आदेश व कार्यवाही शिक्षकांना कधीच मिळाली नसल्याची खंत काही शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: पिंपरी : नगरसेविकेचे संभाषण व्हायरल करणाऱ्या अभियंत्याला ताकीद

महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना धन्वंतरी स्वास्थ्य योजना लागू केल्यास त्याचा लाभ अनेक शिक्षकांना होईल. ही योजना तातडीने राबवावी.

- मनोज मराठे, अध्यक्ष, राज्य पदवीधर प्राथमिक आणि केंद्र प्रमुख सभा

‘धन्वंतरी’च्या अंमलबजावणीसाठी शिक्षक विविध संघटना, शिक्षकांनी मागणी केली आहे. परंतु हा प्रश्‍न सुटला नाही. सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योजना फायदेशीर आहे.

- विजय कुंजीर, अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ

loading image
go to top