
पाचशेहून अधिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून (ता. 12) बेमुदत उपोषण पुकारले आहे.
पिंपरी : 'गरज सरो, वैद्य मरो', 'देशाने वाजविले आमच्यासाठी ताट मात्र, महापालिकेने दिली पोटावर लाथ', 'योद्ध्याना न्याय मिळालाच पाहिजे', अशा घोषणा देत तडकाफडकी कामावरून कमी केल्याप्रकरणी पाचशेहून अधिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून (ता. 12) बेमुदत उपोषण पुकारले आहे. मानधनावर कायमस्वरूपी ठेवण्याची आंदोलकांनी मागणी केली आहे.
Breaking : राजेश पाटील पिंपरी-चिंचवडचे नवे महापालिका आयुक्त; हर्डीकर यांची बदली
महापालिका भवनासमोर विविध महापालिका रुग्णालय, कोविड सेंटरमधील डॉक्टर्स, नर्स आणि वॉर्ड बॉय असे पाचशेहून वैद्यकीय कर्मचारी उपोषणास बसले आहेत. त्यांनी पीपीई किट घालून हातात मागणी फलक घेऊन प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. मात्र, दिवसभरात प्रशासनाकडून कोणीही दखल घेतली नाही. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष देवेंद्र तायडे, राजन नायर, सम्यक आंदोलनाचे अध्यक्ष संतोष जोगदंड यांनी आंदोलकांची भेट घेतली.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वायसीएममधील वॉर्ड बॉय सागर येल्लाळे म्हणाले, "मे 2020 ते 31 जानेवारी 2021पर्यंत आठ महिने काम करून घेतले. नोकरीवर कायम ठेवण्याचे आमिष दाखविले. अनेकांनी हातातील काम सोडली. आता नोकरी नसल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना योद्धा म्हणून मान मिळत नसताना तडकाफडकी कामावरून कमी केले आहे. भारती कांबळे म्हणाल्या, "कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये काम केले. आयसीयुमध्ये रात्रंदिवस काम केल्यामुळे अनेक नातेवाइकांनी तोंड फिरवले. प्रशासनाने आमच्याविषयी असा कठोर निर्णय घेऊ नये.''
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गणेश आठवाल म्हणाले, "कोरोनात प्रत्येक जण स्वत:चा जीव वाचवीत होते. तेव्हा आम्ही कोरोनाबाधितांची सेवा केली. आमच्या सेवेचे हे फळ मिळाले आहे.'' माऊली पवार म्हणाले, "कोविड सेंटरमध्ये काम केले आहे, याची फक्त जाणीव महापालिकेने ठेवावी.'' विनोद साहू म्हणाले, "मानधनावर कायमस्वरूपी कामावर ठेवा. वेळोवेळी अधिकारी, लोकप्रतिनिधींना भेटलो, तरी न्याय मिळाला नाही.'' इब्राहिम तांबोळी म्हणाले,"नोकरीवरून कमी करून आमचे भविष्य अंधारात टाकले आहे.''