चोरीला गेलेले दागिने पुन्हा मिळाल्याचा विश्‍वासच बसत नाही

Police
Police

पिंपरी - चोरीला गेलेले माझे दागिने मला परत मिळाले यावर माझा अजूनही विश्‍वास बसत नाहिये. मात्र, दिवस-रात्र एक करून पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे आज शक्‍य झाले आहे. आनंद व्यक्त करायला शब्दही नाहीत, पोलिसांचे आभार कसे व्यक्त करू, तेच सुचत नाही, अशी भावना चोरीला गेलेले दागिने परत मिळालेल्या जया कुरील यांनी व्यक्त केली. पोलिसांवियषी कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. कुरील यांच्याप्रमाणेच चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळाल्याच्या आनंदाने अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे पहायला मिळाले. एरव्ही पोलिस ठाण्याच्या पायरीही चढायला नको असे म्हणणाऱ्या सामान्य नागरिकांमध्ये यावेळी मात्र आनंदाचे वातावरण होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाकड पोलिस विभागांतर्गत असलेल्या वाकड, हिंजवडी व सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीला गेलेले सोन्याचे दागिने, मोबाईल, वाहने व रोख रक्कम यांचा पोलिसांनी शोध घेऊन तक्रारदारांना परत देण्यात आले. यामध्ये मागील वीस वर्षांपासून दाखल असलेल्या गुन्ह्यातील ऐवजाचा समावेश होता. गुरूवारी (ता.21) वाकड पोलिस ठाण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते नागरिकांना त्यांचा ऐवज प्रदान करण्यात आला. यावेळी अतिरिक्‍त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त गणेश बिरादार उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ निरिक्षक डॉ. विवेक मुगळीकर, बाळकृष्ण सावंत, रंगनाथ उंडे यांच्यासह उल्लेखणीय कामगिरी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या उपक्रमांतर्गत तिन्ही पोलिस ठाणे मिळून 49 गुन्ह्यातील एक कोटी 48 हजार 596 रूपयांचा ऐवज परत देण्यात आला.

कृष्ण प्रकाश म्हणाले, आम्ही एखाद्या राजा, महाराजांचे पोलिस नाही तर जनतेचे पोलिस आहोत. हे आम्ही कामातून सिद्ध करतोय. लोककल्याणकारी राज्यात आम्हाला जनताभिमुख होणे आवश्‍यक असून तेच काम पोलिस दल करीत आहेत. पीडित मोठा असो की छोटा, श्रीमंत असो की गरीब, आम्ही त्याच्याबरोबर आहोत. काहीजण पद, पैसा या जोरावर पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. मात्र, कायदा सर्वांसाठी सारखा आहे. पोलिसांकडून मोठी अपेक्षा केली जाते. चांगले काम केले तरी काहीजण त्यांच्याविरोधात आंदोलन करतात. नाही केले तरी त्यांच्यावर टीकाच केली जाते. पोलिसांनी मुद्देमाल केवळ शोधला नाही तर फिर्यादीपर्यंत पोहोचविला. सेवाभावाची प्रक्रिया सतत सुरू राहिली.''. 

आमचेही चिमुकले घरी वाट पाहत असतात 
तुमच्याप्रमाणे आमच्या घरीही आमचे चिमुकले वाट पाहत असतात. आमचे कुटुंबीयही घरी काळजी करतात. मात्र, पोलिस कर्तव्याशी एकनिष्ठ राहून कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी झटत असतो. स्वत:पेक्षाही नागरिकांची काळजी करतात. चांगल्या कामासाठी समाजाचे सहकार्यदेखील अपेक्षित आहे. पोलिसांची मानसिकताही जाणून घ्या, भावनिक उद्गारही पोलिस आयुक्तांनी काढले. 

या कायद्याचा आधार घेत दिला मुद्देमाल 
गुन्ह्यातील सापडलेला फिर्यादीचा मुद्देमाल ठेवण्यास सुरक्षित जागा उपलब्ध नसल्यास सीआरपीसी 102 अंतर्गत तो मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मूळ मालकांना देण्याचा अधिकार पोलिसांना आहे. या कायद्याचा आधार घेत मागील वीस वर्षांपासूनचा मुद्देमाल परत देण्यात आला. वाकड विभागाने केलेला आयुक्तालयातील हा पहिलाच उपक्रम ठरला आहे. 

पोलिस ठाणेनिहाय मुद्‌देमाल परत केल्याची माहिती 
पोलिस ठाणे     दागिने किंमत       मोबाईल किंमत     वाहने किंमत        रोकड 

वाकड           37,95,100            7,05, 200                ----              6,09,997 
हिंजवडी        19,37,383            1,00,000              4,21,700             ------ 
सांगवी           23,84,416              15,000                  60,000           20,000
एकुण            81,16,899            8,20,000              4,81,700          6,29,997

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com