Video : आता मेट्रोच्या कामाचे होणार काय?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

लॉकडाउन चार जाहीर झाल्यानंतर परराज्यातील कामगारांचे घरी जाण्याचे प्रमाण वाढू लागले आहे, त्यामुळे आठवडाभरापूर्वी शहरात सुरु झालेल्या मेट्रोच्या कामाला त्यामुळे खो बसला आहे. 

पिंपरी : लॉकडाउन चार जाहीर झाल्यानंतर परराज्यातील कामगारांचे घरी जाण्याचे प्रमाण वाढू लागले आहे, त्यामुळे आठवडाभरापूर्वी शहरात सुरु झालेल्या मेट्रोच्या कामाला त्यामुळे खो बसला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुणे आणि पिंपरीमध्ये सुरु असणाऱ्या मेट्रो मार्गाचे काम करण्यासाठी दोन हजार 843 कामगार होते. मात्र, त्यापैकी बरेचजण आपल्या गावी रवाना झाले आहेत. सध्या कामावर असणारे काहीजण येत्या काही दिवसांत गावाला जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे शहरात कासारवाडी आणि हॅरिस पूलाच्या परिसरात सुरु झालेले मेट्रोचे काम ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर 24 मार्चपासून लावण्यात आलेल्या लॉकडाउनपासून आतापर्यंत पिंपरी ते स्वारगेट दरम्यानच्या मेट्रोचे काम बंद ठेवण्यात आले होते. या प्रकल्पावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शहरातल्या विविध भागातील लेबर कॅम्पमध्ये ठेवण्यात आले होते. मेट्रोला काम सुरु करण्याची परवानगी मिळाल्यानंतर हे कामगार रुजू झाले. सरकारने परराज्यातील कामगारांसाठी श्रमिक रेल्वे सोडण्याची घोषणा केल्यानंतर यापैकी अनेक कामगारांनी घरी जाण्याची तयारी सुरु केली, त्याचा परिणाम थेट मेट्रोच्या कामावर झाला आहे. गावी गेलेले हे कामगार कधी परततील याचे उत्तर तूर्तात तरी कोणाकडेच नसल्यामुळे तूर्तात सुरु असणारे काम बंद होणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

आता मोलकरणींना कामावर जाता येणार पण...

दरम्यान, मेट्रो प्रशासनाने लॉकडाउनमुळे झालेले कामाचे नुकसान भरुन काढण्यासाठी कंत्राटदाराला पुरेसे मनुष्यबळ वापरून दोन शिफ्टमध्ये काम करण्याची सूचना केली होती. मात्र, आता कामगारच घरी निघून गेल्यामुळे हे काम कसे पूर्ण करायचे हा प्रश्‍न मेट्रो प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. 

ऑक्‍टोबरचा मुहूर्त हुकणार
मेट्रोच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत वल्लभनगर ते फुगेवाडी दरम्यानचे काम पूर्ण करुन या मार्गावर मेट्रो चालवण्याचे नियोजन मेट्रोकडून करण्यात येत होते. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ऑक्‍टोबर महिन्याचा मुहूर्त हुकणार आहे. वल्लभनगर स्टेशनचे काम अर्धवट अवस्थेत असून कासारवाडी, फुगेवाडी या स्टेशन्सच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. याखेरीज इलेक्‍ट्रीफिकेशन आणि रुळ टाकण्याचे काम पूर्ण झालेले नाही, त्यामुळे यावर्षाअखेर पर्यंत या मार्गावर मेट्रो धावण्याची शक्‍यता नाही. 

कोथरुड-कर्वेनगरकर, आता स्वत:ला, कुटुंबाला जपणार अन् कोरोनाला हरविणारSakal, SakalNews, SakalMedia, Pune, PuneLockDown, Covid19, CoronavirusInPune

मेट्रोच्या प्रकल्पावर काम करणारे कर्मचारी गावी गेल्यामुळे कामगारांची अडचण निर्माण झाली आहे. लॉकडाउनची नियमावली हळूहळू शिथिल होत आहे. त्यामुळे आता गावी गेलेले कर्मचारी काही दिवसांनी परत कामावर रुजू होतील, अशी अपेक्षा आहे. सध्या दररोज परिस्थिती बदलत आहे, त्यामुळे महिन्याभरानी काय स्थिती राहिल हे आता सांगणे कठीण आहे. लॉकडाउन संपल्यानंतर मेट्रोच्या कामाचा वेग पुन्हा वाढू शकतो. - डॉ. हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक, जनसंपर्क विभाग, महामेट्रो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro work will stop due to lack of workers