आंद्राचे पाणी दिवाळीपर्यंत मिळेल; महापालिका अधिकाऱ्यांचा दावा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

पिंपरी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी बैठक झाली. त्यात आंद्रा व भामा-आसखेड प्रकल्प, वाघोली प्रकल्प, रावेत अशुद्ध जलउपसा केंद्र व निगडी जलशुद्धीकरण केंद्र क्षमता वाढ यावर चर्चा झाली.

आंद्राचे पाणी दिवाळीपर्यंत मिळेल 

पाणीपुरवठ्याबाबतच्या आढावा बैठकीत महापालिका अधिकाऱ्यांचा दावा 

पिंपरी - शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी बैठक झाली. त्यात आंद्रा व भामा-आसखेड प्रकल्प, वाघोली प्रकल्प, रावेत अशुद्ध जलउपसा केंद्र व निगडी जलशुद्धीकरण केंद्र क्षमता वाढ यावर चर्चा झाली. आंद्रा प्रकल्पाचे पाणी दिवाळीपर्यंत मिळेल, असे नियोजन केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी इंद्रायणी नदीवरील तळवडे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलले जाणार आहे. तेथील अशुद्ध जलउपसा व चिखलीत जलशुद्धीकरण केंद्र उभारणीचे आणि जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. हे सर्व काम दिवाळीपर्यंत संपवून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या योजनेतून तळवडे, चिखली, जाधववाडी, स्पाइन रस्ता, कुदळवाडी, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव, वडमुखवाडी, चोविसावाडी आदी भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे. महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सहशहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता प्रविण लडकत आदी बैठकीला उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"वाघोली'तून 30 एमएलडी 
पवना नदीवरील रावेत बंधारा येथे 30 एमएलडी क्षमतेचे वाघोली पाणीपुरवठा योजनेचे अशुद्ध जलउपसा केंद्र आहे. वाघोलीसाठी भामा-आसखेड प्रकल्पाचे पाणी मिळाल्यास रावेत केंद्राचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्याबाबत पुणे महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी गेल्या वर्षी तत्वतः मान्यता दिली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून भामा-आसखेडचे पाणी वाघोलीला मिळत आहे. त्यांची काही कामे बाकी आहेत, ती पूर्ण झाल्यानंतर पवना नदीवरील वाघोली योजनेचे 30 एमएलडी पाणी पुण्याने दिले तर, शहराला लगेच ते पाणी उपलब्ध होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

प्रेयसीच्या पतीवर प्रियकरानेच केला प्राणघातक हल्ला

एमआयडीसीकडून 10 एमएलडी 
महापालिका एमआयडीसीकडून रोज तीस एमएलडी पाणी विकत घेत आहे. तसेच, महापालिका रोज दहा एमएलडी पाणी एमआयडीसीला देत आहे. ते दहा एमएलडी पाणी पुन्हा महापालिकेला उपलब्ध करून घेण्यासाठीही प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. 

"अमृत'चे 75 टक्के काम 
केंद्र सरकारच्या "अमृत' व "चोवीस 24 बाय सात' योजनेअंतर्गत जलवाहिन्या बदलणे, अनधिकृत नळजोड शोधून ते नियमित करणे आदी कामे सुरू आहेत. शहराच्या साठ व चाळीस टक्के भागात कामे सुरू आहेत. दोन्ही योजनांची कामे 75 टक्के झाली असल्याचे रामदास तांबे यांनी सांगितले.

मीटरप्रमाणे धावणार रिक्षा; शहर पोलिसांचे नियोजन 

दरमहा आढावा बैठक 
दिवाळीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी येथून पुढे दरमहिन्याला संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येणार आहे. अमृत, चोवीस बाय सात, आंद्रा व भामा-आसखेड प्रकल्प, वाघोली प्रकल्प, रावेत अशुद्ध जलउपसा व निगडी जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या क्षमता वाढीच्या कामांबाबत दरमहा आढावा घेण्यात येणार असल्याचे नामदेव ढाके यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal officers claim that Andhra water available till Diwali