नाशिकचा हाच तो 'बुलेटराजा', जो फेसबुकवरून विकायचा चोरलेल्या गाड्या 

मंगेश पांडे
Thursday, 17 September 2020

  • फेसबुकवरून विकायचा चोरलेल्या महागड्या दुचाकी 

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह पुणे परिसरातून नवीन महागड्या दुचाकी चोरायच्या. त्या विकण्यासाठी फेसबुक मेसेंजरवरून ग्राहकाशी संपर्क साधायचा. कागदपत्रे नंतर देतो असं सांगत दोन लाख किमतीच्या दुचाकी अवघ्या दहा ते पंधरा हजारात विकायचा. नाशिकमध्ये 'बुलेटराजा' अशी ओळख असलेल्या सराईत दुचाकी चोरट्याला अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केलं. त्याच्याकडून चोरीच्या 14 दुचाकी जप्त केल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हेमंत राजेंद्र भदाणे (वय 24, रा. भोरवाडा, सातपूर, नाशिक) असं दुचाकी चोरट्याचं नाव आहे. भदाणे हा 11 सप्टेंबरला (शुक्रवार) अंकुशराव लांडगे सभागृहासमोर येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केल्यावर त्यानं भोसरीतून दुचाकी चोरल्याचा प्रकार उघडकीस आला. तपासादरम्यान त्यानं पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातून बुलेटसह इतर कंपनीच्या महागड्या दुचाकी चोरायच्या. त्या बीड, नगर, धुळे या भागातील नागरिकांना कागदपत्रे नंतर देतो, असं सांगून विक्री केल्याचं उघडकीस आलं.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

त्यानुसार पोलिसांनी सलग चार दिवस धुळे, बीड, नाशिक, औरंगाबाद व नगर या परिसरात थांबून 17 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या दहा बुलेट व इतर चार, अशा एकूण 14 दुचाकी हस्तगत केल्या. यामध्ये चाकण पोलिस ठाण्यातील तीन, भोसरी, वाकड, एमआयडीसी भोसरी ठाण्यातील प्रत्येकी एक; तर पुण्यातील सहकारनगर, चतु:श्रृंगी, हडपसर या ठाण्यातील प्रत्येकी एक व नाशिकमधील सरकारवाडा, अंबड या ठाण्यातील प्रत्येकी एक, असे एकूण बारा दुचाकीचोरीचे गुन्हे उघडकीस आले. दरम्यान, भदाणे याने चोरलेल्या दुचाकी विकत घेणारा व विक्रीसाठी मदत करणारा त्याचा साथीदार योगेश सुनील भामरे (वय 24, रा. गरताड, ता.जि. धुळे) यालाही पोलिसांनी अटक केलीय. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नाशिकमध्ये तब्बल 35 गुन्हे 

भदाणे हा मूळ नाशिकचा असून, वाहनचोरीत रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर नाशिक जिल्ह्यात 35 व ठाणे शहराच्या हद्दीत दोन, असे एकूण 37 वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. नाशिकमध्ये तो "बुलेटराजा' म्हणून ओळखला जातो. लॉकडाउनच्या काळात तो नाशिकवरून ट्रक, टेम्पो अशा वाहनाने पुण्यात यायचा. पार्किंगमधील महागड्या दुचाकींचे लॉक तोडून चोरलेली दुचाकी बीड, धुळे, नाशिकला घेऊन जायचा. 

अशी करायचा वाहनाची विक्री 

चोरलेल्या वाहनविक्रीबाबत सोशल मीडियावर जाहिरात द्यायची. त्यानंतर फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून ग्राहकाशी संपर्क साधायचा. ग्राहकाने तयारी दर्शविल्यानंतर फायनान्सची गाडी आहे, कागदपत्रे नंतर देतो, असं सांगत पंधरा ते वीस हजार घेऊन दुचाकीची विक्री करायची. त्यानंतर मेसेंजरवरून ग्राहकाशी झालेले संभाषण डिलीट करायचा. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik's bike thief arrested in pimpri chinchwad pune