mahavitaran
mahavitaranesakal

Mahavitaran : वर्षभरात महावितरणकडून एकाही एजन्सीवर कारवाई नाही

वीज मीटर रीडिंगचे फोटो अस्पष्ट असणे, फोटो व प्रत्यक्ष रीडिंगमध्ये तफावत असणे, रीडिंग न घेता ‘डोअर लॉक’चा हेतु पुरस्सर शेरा देणे आदी तक्रारी ग्राहकांकडून केल्या जातात.

पिंपरी - वीज मीटर रीडिंगचे फोटो अस्पष्ट असणे, फोटो व प्रत्यक्ष रीडिंगमध्ये तफावत असणे, रीडिंग न घेता ‘डोअर लॉक’चा हेतु पुरस्सर शेरा देणे आदी तक्रारी ग्राहकांकडून केल्या जातात. त्यामुळे, प्रत्यक्षात चुकीच्या रीडिंगचे प्रमाण अधिक असतानादेखील वर्षभरात एकाही एजन्सीवर अद्याप कारवाई केलेली नसल्याचे दिसून येत आहे.

वीज मीटरचे फोटो रीडिंग घेण्याची प्रक्रिया स्वतंत्र मोबाइल ॲपद्वारे सोपी व वेगवान झालेली आहे. एजन्सीने नेमलेल्या कर्मचाऱ्याकडे (मीटर रीडर) मीटरचे केवळ अचूक रीडिंग घेण्याचे काम आहे. मात्र, ते ग्राहकांना वीजबिल कमी करून देण्याचे आमिष दाखवत असल्याचे अनेकदा दिसून येते. यातून ग्राहक व महावितरणची आर्थिक फसवणूक होत आहे. ग्राहक चुकीच्या रीडिंगची तक्रार करतात, मात्र एजन्सीविरुद्ध तक्रार करीत नाहीत.

mahavitaran
Pune Metro : पुणे-हिंजवडी मेट्रोचे काम प्रगतिपथावर; दीड वर्षात काम होणार पूर्ण

चुकीचे रीडिंग तपासून ग्राहकांचे निरसन महावितरणकडून केले जाते. मात्र, संबंधित कर्मचारी व एजन्सीच्या यंत्रणेवर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे महावितरणने नागरिकांनी केलेल्या तक्रारींनंतर संबंधित एजन्सींवर काय कारवाई केली ?, ही माहिती देण्यासाठीही असमर्थता दर्शवली आहे. तक्रारी वेळीच सोडवल्या गेल्या; तर ग्राहक आपले प्रश्न संबंधित विभागाकडे मांडू शकतात. पण, तसे होत नसल्याने तक्रारींचे प्रमाण हे तुलनेने कमी दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइलवरूनच रीडिंग पाठविण्याबाबत जनजागृतीचा अभाव
महावितरण कंपनीने मोबाइलवरून रीडिंग पाठवण्याची सुविधा सुरू केली आहे. नोंदणीकृत मोबाइलवरून मीटर रीडिंग पाठवण्याबाबतचा मेसेज प्राप्त झाल्यानंतर चार दिवसांपर्यंत ‘एसएमएस’द्वारे मीटर रीडिंग पाठवणे आवश्यक आहे. मात्र, या संदर्भातही पुरेशी जनजागृती करण्यात आलेली नाही. त्यामुळे, या सेवेचा लाभ अतिशय नगण्य घेतला जात आहे.

तथ्य आढळल्यास रीडरवर कारवाई
कोणत्या एजन्सीकडे किती मीटर रीडर आहेत, यासह वर्षभरात चुकीच्या रीडिंग संबंधी ग्राहकांकडून आलेल्या तक्रारींची संख्या व वर्षभरात कुठल्याही एजन्सीवर झालेल्या कारवाईची माहिती व नोंद महावितरणकडे नाही. ग्राहकांकडून तक्रारी वाढल्यास व त्यात तथ्य आढळून आल्यास संबंधित रीडरवर कारवाई होते, असे महावितरणचे म्हणणे आहे.

अचूक बिलिंगसाठी केंद्रीय व ऑनलाइन प्रक्रिया आहे. त्यामुळे, चुकीचे रीडिंग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा व मीटर नादुरुस्त असल्याचा शेरा देणे, असे हेतुपुरस्सर केलेले प्रकार लपून राहत नाहीत. एजन्सीने काढलेल्या मीटर रीडिंगच्या फोटोंची खातरजमा व पडताळणीसाठी मुख्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केलेला आहे.

'‘त्रुटींबाबत तक्रारी आलेल्या रीडिंग एजन्सीवर वर्षभरात कारवाई नाही. अचूक बिलांचे प्रमाण हे वाढत आहे. ग्राहकांच्या माहितीच्या अभावातून दोषपूर्ण तक्रारी होतात. एजन्सीने काढलेल्या मीटर रीडिंगच्या फोटोंची खातरजमा व पडताळणी केली जाते.’'
- निशीकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी महावितरण


वीज ग्राहकांनी ही घ्यावी काळजी....
- रीडिंग घेताना त्यावेळेसच नोंद करून घ्या.
- रीडिंग व बिलाची पडताळणी करून घ्यावी
- घर बंद असल्यास मीटर रीडरला सूचना द्या
- रीडिंगचा फोटो काढून ठेवला तर चांगलेच
- मोबाइल ॲपवरून रीडिंग ऑनलाइन पाठवा
- चुकीचे रीडिंगची संकेतस्थळावर तक्रार करा
- ग्राहकांनी अडचण असेल तर तज्ज्ञांची मदत घ्यावी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com