Rahul Mahiwal
Rahul Mahiwalsakal

Pune Metro : पुणे-हिंजवडी मेट्रोचे काम प्रगतिपथावर; दीड वर्षात काम होणार पूर्ण

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाच्यावतीने (पीएमआरडीए) पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाबरोबर सुरु असलेल्या पुणे ते हिंजवडी-माण मेट्रो प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे.

पिंपरी - पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाच्यावतीने (पीएमआरडीए) पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाबरोबर सुरु असलेल्या पुणे ते हिंजवडी-माण मेट्रो प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत ४६ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या १६-१७ महिन्यांत ५४ टक्के काम पूर्ण करणार आहोत, अशी माहिती ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल यांनी दिली.

‘कॉफी विथ सकाळ’ कार्यक्रमांतर्गत महिवाल ‘सकाळ’च्या पिंपरी कार्यालयात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ‘पीएमआरडीए’च्या विविध विकास कामांबाबत त्यांनी ‘सकाळ’च्या प्रतिनिधींशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘पीएमआरडीए’च्या येऊ घातलेल्या प्रकल्प व योजनांबाबतही त्यांनी माहिती दिली.

हडपसर ते लोणी काळभोर मेट्रो होणार
महिवाल म्हणाले, ‘‘पुणे-हिंजवडी मेट्रोचे २०१७ पासून काम सुरू आहे. परंतु २०१९ ला प्रत्यक्षात काम सुरु झाले. कोरोनामुळे थोडे काम थंडावले होते. परंतु; आता पुन्हा कामाने वेग घेतला आहे. मेट्रोची लांबी २३ किलोमीटर असून, २३ थांबे आहेत. ३५ वर्षांनंतर हा प्रकल्प टाटा समूहाकडून ‘पीएमआरडीए’ला हस्तांतरित केला जाणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील आचार्य आनंदऋषीजी चौकातील वैशिष्ट्यपूर्ण एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे काम १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. पुलाखालून तळमजल्यावरुन व पहिल्या मजल्यावरुन वाहने धावणार असून, दुसऱ्या मजल्यावरून मेट्रो धावणार आहे. भविष्यात हडपसर ते लोणी काळभोर मेट्रो होणार असून, महामेट्रोच त्यासाठी इच्छुक आहे.

Rahul Mahiwal
Mahavitaran : वर्षभरात महावितरणकडून एकाही एजन्सीवर कारवाई नाही


अंतर्गत रिंग रोडचे काम सुरु
खेड, हवेली, मुळशी व मावळ या चार तालुक्यातून जाणारा ६५ मीटर रुंदीचा ‘पीएमआरडीए’ अंतर्गत रिंग रोडचा प्रकल्प १४ हजार ५०० कोटी रुपयांचा आहे. सोलू, निरगुडी व वडगाव शिंदे या भागातील पहिल्या टप्प्यातील ४.७ किलोमीटरच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुरु झाली आहे. वन विभागाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेऊन हे काम वेगाने करण्यात येणार आहे. या कामासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद केलेली आहे, असे त्यांनी सांगितले.

‘इंद्रायणी’साठी १५ हजार कोटी
इंद्रायणी नदी सुधार हा प्रकल्प १५ हजार कोटी रुपयांचा असून, तो तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून, पर्यावरण विभागाची ‘ना हरकत’ घेण्यात येणार आहे. सीओपीकडून नदीच्या जल नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, केंद्र सरकारकडून परवानगी आल्यानंतर ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे.

आमच्या क्षेत्रात नदीची रुंदी जादा असून, चढ उतार असल्यामुळे आम्ही आमचे डिझाईन वेगळे करणार आहोत. याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेशीही चर्चा झाली असून, अभियांत्रिकीचे काम त्यांच्या समन्वयाने करणार आहोत. पहिल्या टप्प्यात पाण्याची गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नदीच्या घाट सुशोभीकरणावर भर देणार आहोत, असे महिवाल यांनी सांगितले.

माण-म्हाळुंगे टीपी स्किमला वेग देणार
सुमारे २५०. ५० हेक्टरवरील माण-म्हाळुंगे टीपी स्किममधील काही शेतकरी न्यायालयात गेले होते. सुनावणी नंतर त्यांच्या भूखंडात थोडाफार बदल करून, येत्या एक-दीड महिन्यात राज्य सरकारची परवानगी घेऊन काम पूर्ण वेगाने सुरु करणार आहोत. तोपर्यंत जे रस्ते ताब्यात आहेत, त्यांचे काम सुरु करणार आहोत. आगामी काळात वडाची वाडी, अैताडे, हांडेवाडी, मांजरी व कोलवडी येथे टिपी स्कीम सुरु करणार असून, प्राथमिक बोलणी सुरु केली आहेत, असे त्यांनी सांगितले.

अतिक्रमण विरोधी कारवाई वाढवू
अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार आल्यावर आम्ही कारवाई करतो. गुन्हा दाखल करणे, हाही पर्याय असतो. काही जागांवर फलक लावले आहेत, काही ठिकाणी लावावे लागतील. जिथे अतिक्रमण असेल, तेथे नोटीस देवून बांधकाम पाडलेही जाते. सध्या मनुष्यबळ कमी आहे.

पीएमआरडीए आकृतिबंधाला मंजुरी मिळाली असून, नोकर भरतीला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर कायम ४०७ कर्मचारी, अधिकारी भरले जातील. मनुष्यबळ वाढले की अतिक्रमण व बेकायदा बांधकामाविरुद्ध कारवाई वाढवू, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

सरकारने अहवाल मागविला
प्रतिनियुक्तीवरील येणाऱ्या अधिकाऱ्यांना पुण्याचे आकर्षण आहे. प्रतिनियुक्तीवर येऊन अनेक वर्षे मुदतवाढ घेऊन ‘पीएमआरडीए’तच विविध विभागात राहिलेल्या अधिकाऱ्यांची माहिती राज्य सरकारने मागवली आहे. ‘सकाळ’च्या बातम्या आम्ही गांभीर्याने घेतल्या असून, त्यावर अभ्यास करून अहवाल सादर करण्यात येणार आहे. हे अधिकारी येथे ठेवायचे की परत आलेल्या जागेवर ठेवायचे याबाबत राज्य सरकारच्या सूचनेनुसार लवकरच निर्णय होणार आहे, असे महिवाल यांनी सांगितले.

औंध कार्यालयाचे स्थलांतर होणार
‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यालय सात मजली आहे. पुणे-हिंजवडी मेट्रोचे काम सुरु असल्याने औंध येथील कार्यालय कार्यरत आहे. मेट्रोचे काम संपले की मुख्य कार्यालयात ते शिफ्ट केले जाईल.

विकास आराखडा अंतिम टप्प्यात
‘पीएमआरडीए’च्या विकास आराखड्याचे काम उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २० डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करून, न्यायालयाला दाखवायचे आहे. विकास आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर विकास आराखडा पूर्ण होताच जिल्ह्यातील विकासाचे द्वार उघडणार आहे. विकास आराखडा अंतिम झाल्यावर पुणे महापालिकेतील २३ गावे तिकडे जाणार आहेत, असे महिवाल यांनी सांगितले.

आर्किटेक्ट यावेत; एजंटांना थारा नाही
‘पीएमआरडीए’ ही नियोजन करणारी संस्था असल्याने विविध प्रकल्पांचे, गृह प्रकल्पांची मंजुरी घेण्यासाठी आर्किटेक्ट येत असतात. परंतु; त्याला ६० दिवसांची मुदत असते. या कामासाठी त्यांचे काही लोक कार्यालयात येतात. काही लोक गैरप्रकार करतात, त्यामुळे एजंटांची चर्चा होते. आर्किटेक्ट यांनी यावे, एजंटांना आम्ही थारा देणार नाही, असेही स्पष्टीकरण महिवाल यांनी केले.

प्रलंबित गृह प्रकल्पांबाबत कारवाई करणार
राडारोडा विल्हेवाट लावण्याबाबत आम्ही धोरण ठरवत आहोत. सेक्टर १२ मधील पंतप्रधान आवास योजनेतील कामांचा दर पंधरवड्याला तेथे जाऊन आढावा घेतला जातो. सेक्टर ३० व ३२ मधील आर्थिक दुर्बल घटकांसाठी व कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी केलेल्या ७८० सदनिकांच्या गृह प्रकल्पाबाबत लवकरच राज्य सरकारची मंजुरी घेऊन पाणी, वीज देऊन लोकांना घरांचा ताबा देऊ. त्यानंतर संबंधित प्रकल्पाला उशीर का लागला व भाववाढ का दिली, याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे महिवाल यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांच्या अनुभवाला प्राधान्य
कंत्राटी कर्मचारी व अधिकारी यांच्या अनुभवाला प्राधान्य देऊन, त्यांना नोकर भरती करताना झुकते माप देणार आहोत. तशी राज्य सरकारकडेही विनंती केली आहे. वर्ग तीन व वर्ग चारचे कर्मचारी भरताना जिल्हा निवड समितीमार्फत भरती केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com