पिंपळे गुरवमधील कोरोना तपासणी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

रमेश मोरे
Tuesday, 8 September 2020

पिंपळे गुरवची स्थिती; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, सुविधांचा अभाव 

जुनी सांगवी : कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी उपाययोजना करीत असताना एकीकडे पालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या तपासणी केंद्रावरच गर्दी व सोशल डिस्टन्सिंगचा अभाव आहे. ऍडमिट होण्यासाठी लागणारा वेळ, असुविधा अशा बाबींमुळे येथील व्यवस्था कुचकामी ठरत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरात अनेक ठिकाणी कोरोना तपासणी केंद्र सुरू केली आहेत. अशा केंद्रांवर गर्दी वाढतच चालल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. पिंपळे गुरव येथील बॅडमिंटन हॉलच्या कोरोना तपासणी केंद्रावर दिवसेंदिवस गर्दी वाढू लागल्याने रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. 

पिंपरी-चिंचवडकरांनो महत्त्वाची बातमी; गुरुवारी राहणार पाणीपुरवठा बंद 

सुरुवातीला तपासणी केल्यावर बाधित रुग्णाला दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून घरी रुग्णवाहिका पाठविली जायची. मात्र, आता तपासणीनंतर पंधरा मिनिटात रिपोर्ट कळत असल्याने बाधित रुग्णांना थांबवून त्यांना अँडमिट होण्यासाठी सांगितले जात आहे. मात्र, बाधितांची संख्या व वाहनांची संख्या कमी पडत आहे. रुग्णांना दाखल होण्यासाठी तासनतास थांबावे लागत आहे. यात तेथे शौचालय नाही. त्यामुळे रुग्ण बाहेर पडतात. सध्या दिवसभरात येथे दररोज साधारण पन्नास ते साठच्या जवळपास बाधितांचा आकडा येत असल्याचे समजते. अशा बाधितांसाठी याच केंद्राच्या ठिकाणी रुग्णवाहिका व खासगी वाहने महापालिकेने भाडेतत्त्वावर घेतलेली आहेत. ही वाहने रुग्णांना घेऊन वायसीएम, भोसरी आदी ठिकाणी पाठविली जातात. मात्र, येथील संख्या वाढल्याने अशा वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक जणांना बसवून वाहतूक करण्यात येते. तर कमी वाहनांमुळे रुग्णांना ताटकळत थांबावे लागत असल्याने असे रुग्ण परिसरात भटकंती करतात. 

लोणावळेकरांनो खबरदार ! बंगले भाड्याने देणार असाल, तर ही बातमी वाचा

तपासणी केंद्रावर शौचालयाची सुविधा नाही. तसेच, गर्दीमुळे त्रास होतो. 
- नागरिक, दापोडी 

रुग्णवाहिका व खासगी वाहनांद्वारे रुग्णांना दवाखान्यात भरती केले जाते. काही जण नियम पाळतात, तर काही नागरिक नियम पाळत नाहीत. त्याचा इतरांना त्रास होतो. 
- नागरिक, पिंपळे गुरव 

आमच्या सर्व स्टाफकडून योग्य ती काळजी घेण्यात येते. मात्र, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सांगवी पोलिसांची मदत मिळावी, यासाठी वरिष्ठांना कळविले आहे. शौचालयाची सोय करण्यासाठी आरोग्य विभागास कळविले आहे. बाधित रुग्णांना आमच्याकडून सूचना देण्यात येतात, त्याचे नागरिकांनी पालन करायला हवे. 
- डॉ. विजया आंबेडकर, वैद्यकीय अधिकारी सांगवी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no social distance at corona inspection center in pimple gurav