परदेशी उद्योगांना हा आहे पर्याय; चाकणमध्येही असेल संधी

Industry
Industry

पिंपरी - कोरोनाच्या संकटामुळे चीनमध्ये असणारे अनेक उद्योग बाहेरच्या देशांची वाट धरण्याच्या तयारीत आहेत. आपल्याकडे गुंतवणूक करण्याचे आमंत्रण भारताने या उद्योगांना दिले असतानाच महाराष्ट्रामध्ये या कंपन्यांनी गुंतवणूक करावी, यासाठी राज्य सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. ऑटोमोबाइल हब म्हणून प्रसिध्द असणाऱ्या चाकण एमआयडीसीमधील टप्पा पाच आणि तळेगाव एमआयडीसीच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे नव्या ठिकाणांच्या शोधात असणाऱ्या चीनमधील परदेशी कंपन्यांना येथे गुंतवणूक करण्याची नामी संधी उपलब्ध होणार आहे.

तळेगाव आणि चाकण एमआयडीसीमधील भूखंडांवर नजिकच्या काळात चीनमधील अनेक उद्योग गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखविण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या उद्योगांना येथे गुंतवणूक करण्याचा चांगला फायदा मिळू शकतो. विदेशातील उद्योग या ठिकाणी आल्यास अर्थव्यवस्थेला चांगल्या प्रकारे गती मिळू शकते. त्यातून रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध होतील. याखेरीज इंजिनिअरिंगपासून विविध प्रकारच्या उत्पादन निर्मितीत उरलेल्या स्टार्टअप कंपन्यांना प्रगती करण्याची चांगली संधी मिळणार आहे. 

उत्तम सुविधा हव्यात
बाहेरच्या उद्योगांना गुंतवणुकीसाठीचे निमंत्रण देत असताना आपल्याकडील औद्योगिक वसाहतींमध्ये त्यांना उत्तम प्रकारच्या पायाभूत सुविधा देण्यास सरकारने प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. या उद्योगांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार असून, रोजगाराबरोबरच व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. या कंपन्याकडून करण्यात येणारी गुंतवणूक त्यांना अपेक्षित असणाऱ्या सोयीसुविधा व सवलती यांचा योग्य अभ्यास करुन सरकारने नियोजन केले तर भविष्यात त्याचा फायदा मिळू शकतो. पुणे आणि परिसरात उद्योगांना पोषक वातावरण आहे, असे मत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजचे माजी महासंचालक अनंत सरदेशमुख यांनी सांगितले. 

लघुउद्योगांना विस्ताराची संधी
चीनमधील उद्योग येथे आले तर मध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योगांचे काम वाढू शकते आणि सूक्ष्म, लघु उद्योगांना विस्तारीकरणाची संधी उपलब्ध होऊ शकते. येथे येणाऱ्या उद्योगांना वीस टक्‍के काम हे स्थानिक उद्योजकांसाठी राखीव ठेवण्याचे धोरण करावे, स्थानिक भूमिपूत्रांना नोकरीत प्राधान्य देण्याचे धोरण सरकारने करण्याची आवश्‍यकता असल्याचे पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले.

उपलब्ध जमीन (हेक्टर)
२.५ - तळेगाव
६३७ - चाकण

उद्योगांसाठी जमेच्या बाजू
पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाची सुविधा
कुशल मनुष्यबळाची उपलब्धता
उत्तम प्रकारच्या शैक्षणिक सुविधा
नव्याने विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com