मुलांच्या शाळा प्रवेशाबाबत संभ्रम; प्रतीक्षा यादीतील पालक 'एसएमएस'च्या प्रतीक्षेत

आशा साळवी
Monday, 7 September 2020

मुलांच्या प्रवेशाबाबत संभ्रम; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती 

पिंपरी : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शहरात दोन हजार पाल्यांचे प्रवेश निश्‍चित झाले आहेत, तर तेवढ्याच संख्येने प्रतीक्षा यादीतील पाल्यांची संख्या आहे. शाळा सुरू होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, प्रतीक्षा यादीतील पालकांनी मुलांच्या प्रवेशासाठी शाळेत जाऊ नये, त्यांना आरटीईच्या वेबसाइटवर कळविले जाईल, अशा सूचना प्रशासनाकडून येत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण होत आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब

"आरटीई'अंतर्गत प्रवेश होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी. यासाठी पिंपरी आणि आकुर्डी या विभागवार कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. पालक दिलेल्या तारखेला शाळेत जाऊन प्रवेशनिश्‍चिती करत आहेत. मात्र, प्रवेश प्रक्रियेला चार महिने उशीर झालेला असताना, निवड झालेल्या पाल्यांचाच अद्याप प्रवेश निश्‍चित झालेला नाही. परिणामी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचा नंबर कधी येईल, या प्रतीक्षेत पालक आहेत. 

काय म्हणताहेत पालक... 

  • संदीप पेडणेकर : माझ्या मुलाचा 72 वा प्रतीक्षा यादी क्रमांक आहे. अद्याप काहीच माहिती न मिळाल्याने त्याला प्रवेश मिळेल की नाही याची धास्ती आहे. 
  • मल्लिकार्जुन शिगे : शाळा निवडीचा मेसेज आला आहे, पण 55 वा प्रतीक्षा यादीत क्रमांक आहे. कधी नंबर लागेल सांगता येत नाही. 
  • विनोद पाटील : माझ्या मुलीचा 32 वा क्रमांक आहे. आतापर्यंत प्रवेश होणे आवश्‍यक होते. 
  • बळीराज खांडेकर : एप्रिल महिन्यापासून प्रतीक्षा यादीतच 22 वा क्रमांक आहे. याबाबत वेबसाइटवर काहीच अपडेट नाहीत. 
  • विनोद मोरे : सरकारकडून प्रतीक्षा यादीतील पाल्यांचा सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. आमचा 22 वा क्रमांक आहे. 

भोसरीतील विद्युत रोहित्र स्फोटप्रकरणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची उद्या बैठक ​

आता सर्व खासगी शाळांची खुली प्रवेश प्रक्रिया संपली असून, पहिली घटक चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे आरटीईमधून प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणारे पालक अस्वस्थ झाले आहेत. शहरातील अडीच हजार पाल्य सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. आर्थिक अडचणीत असताना प्रवेश कुठे घ्यावा याविषयी पालकांमध्ये संभ्रम आहे. प्रतीक्षा यादीतील मुलांचे प्रवेश निश्‍चित करावेत. 
- हेमंत मोरे, अध्यक्ष, आरटीई पालक संघ 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतरच प्रतीक्षा यादीतील मुलांचा नंबर लागेल. 15 सप्टेंबरनंतर सगळे चित्र स्पष्ट होईल. त्या मुलांबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. 
- पराग मुंढे, सहाय्यक प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parents waiting for waiting list of school admission sms in pimpri chinchwad