पिंपरीत कोरोना टेस्टिंग सेंटरमध्ये काय घडते आहे पाहा...

आशा साळवी 
बुधवार, 15 जुलै 2020

कोरोना टेस्टिंग सेंटरमध्ये रुग्णांची हेळसांड. 
तासन्‌तास रांगेत थांबूनही रिपोर्ट दुसऱ्या दिवशी. 

पिंपरी : तासन्‌तास नावनोंदणीसाठी रांगेत उभे राहायचे, मग माहिती सांगायची. स्वॅब घ्यायला जास्तीत जास्त 30 सेकंद लागतात. तरी, दुपारी परत स्वॅब घ्यायला बोलविण्यात येते. तेव्हा पुन्हा एकदा दीड तास रांगेत थांबायचे. तिथे कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग बहुतेक वेळा नसते, ही विदारक परिस्थिती आहे कोरोना टेस्टिंग सेंटरची. अवघ्या अर्ध्या तासातच कोरोनाचे निदान होणार असल्याने नागरिकांची सोय होईल, रुग्णांची हेळसांड कमी होईल, असे वाटत असतानाच प्रत्यक्षातील वस्तुस्थिती काही वेगळीच आहे.

पुण्यात पीएमपी वाहतूक सुरू करण्याबाबत महत्त्वाचा आदेश

 कोरोनाचा वाढत्या संख्येला ब्रेक लागावा, यासाठी स्वॅब तपासणीची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी, नवी दिल्लीतील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) संस्थेने रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट (चाचणी) विकसित केली आहे. या चाचणीनुसार महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयासह खासगी आठ रुग्णालयांत आणि अकरा कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची टेस्टिंग सुरू केली आहे. संशयित रुग्णाचा स्वॅब तपासणी अहवाल अवघ्या 15 ते 30 मिनिटांत मिळणे, अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात या सेंटरवर नागरिकांना फोनद्वारे दुपारी एक वाजता नावनोंदणीसाठी येण्यास सांगितले जाते. सरसकट सगळ्यांना एकाच वेळी बोलविल्यामुळे 150 जणांची गर्दी होते. नोंदणीला केवळ दहा मिनिटांच्या अवधी लागत आहे. त्यासाठी दीड तास रांगेत उभे राहावे लागत आहे, त्यानंतर स्वॅब घ्यायला जास्तीत जास्त 30 सेकंद लागतात, तरीही पुन्हा दुपारी परत स्वॅब घ्यायला बोलविण्यात येते, तेव्हा परत एकदा रांगेत तास दीड तास उभे राहण्यास सांगत असल्याचा प्रकार शाहूनगरमधील बीएसएनएलच्या कोविड सेंटरमध्ये घडला.

पुणेकरांनी एक महिना रोखली अपेक्षित रुग्णवाढ

त्या तक्रारदाराने सांगितले की, ""सेंटरच्या आवारात कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग बहुतेक वेळा नसते. जर सकाळीच ज्याच्याकडे महापालिका दवाखान्याचे पत्र आहे, त्यांची माहिती घेतानाच स्वॅब घेतला तर प्रसार खूपच थांबेल. कारण दोन वेळा नागरिकांना बोलावून दोन तास उभे करायचे, त्यात आजूबाजूला कोण पॉझिटिव्ह आहे? माहिती नसते. यापुढे जाऊन ऍन्टिजेन (antigen) टेस्टचा रिपोर्ट जास्तीत जास्त 30 मिनिटात येतो, त्यासाठीही दुसऱ्या दिवशीची वाट पाहायला लावत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यांनी सांगितले की माझ्या पत्नीची 9 जुलैला "आरटीपीसीआर' टेस्ट केली. रिपोर्ट दुसऱ्यादिवशी मिळणे अपेक्षित होते, मात्र तिचा रिपोर्ट अकरा जुलैला मिळाला. दुसरीकडे रांगेतील काही जण पॉझिटिव्ह असतील तर रिपोर्ट माहिती नसल्याने तेही म्हणून बिनधास्त फिरतच राहतात. अनेकदा नगरसेवकांचे फोन आल्यावर पक्षपातीपणे त्यांच्या लोकांची तपासणी केली जाते. रांगेतील लोकांना वेळ संपल्यावर दुसऱ्यादिवशी येण्यास सांगतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patient suffers from poor condition at corona testing center in pimpri