पवना धरण शंभर टक्के भरले, तरीही सोसायट्यांचा पाण्यावर हजारोंचा खर्च

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

पवना धरण शंभर टक्के भरले, तरीही विस्कळित पाणीपुरवठ्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात चक्क टॅंकरने पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. बहुतांश भागात नागरिकांचे सलग चार दिवस पाण्याविना चांगलीच तारांबळ उडाली. रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील पंपिंगचे काम सुरू असल्याने हा फटका बसला आहे. महापालिका व महावितरण यांच्या गोंधळात करदात्याच्या खिशाला कात्री बसत आहे.

पिंपरी - पवना धरण शंभर टक्के भरले, तरीही विस्कळित पाणीपुरवठ्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात चक्क टॅंकरने पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. बहुतांश भागात नागरिकांचे सलग चार दिवस पाण्याविना चांगलीच तारांबळ उडाली. रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील पंपिंगचे काम सुरू असल्याने हा फटका बसला आहे. महापालिका व महावितरण यांच्या गोंधळात करदात्याच्या खिशाला कात्री बसत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पाण्यासाठी हजारो रुपये मोजून सोसायटीधारकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचेच पाणी पळाल्याचे चित्र शहरात दिसून आले आहे.

शहरात 25 नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्राच्या वाढीव वीजभाराची कामे गुरुवारी (ता. 3) सकाळी 10 वाजता सुरू झाली. ते काम सायंकाळी साडेसहा वाजता पूर्ण झाले, असे महावितरणचे म्हणणे आहे. मात्र, शुक्रवारी रात्री 11 वाजता पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. फीडर बंद पडल्याचे सांगून महापालिकेने नागरिकांना शहरात शनिवारी व रविवारी दोन दिवस पाणी येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे महापालिका व महावितरणच्या कारभारात असमन्वय प्रकर्षाने समोर आला. चालढकल करत असलेल्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा नागरिकांना मात्र, विनाकारण त्रास सहन करावा लागला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 943 नवे रुग्ण; 24 जणांचा मृत्यू

शहरातील निमुळत्या भागात नागरिकांना अत्यल्प पाणी मिळाले. कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या भागात पाणीच मिळाले नाही. बऱ्याच ठिकाणी नागरिकांनी बोअरवेलच्या पाण्याचा आधार घेतला. मात्र, बोअरवेलला वीजपुरवठा मोठ्या प्रमाणावर लागत असल्याने नागरिक वीजबीलाने हैराण झाले आहेत.

कोरोनामुक्त झालेले नागरिक प्लाझ्मा दानासाठी पुढे येताहेत पण...

आमच्या सुखवानी ओयासिस सोसायटीत दिवसाला 80 हजार लिटर पाणी लागते. त्यासाठी आठ हजार 800 रुपये खर्चून टॅंकर मागवावे लागले. एका टॅंकरला 1100 रुपये लागले. ते पाणी दुपारीच संपले. 450 नागरिक सोसायटीत राहतात. 171 जण सोसायटीधारक आहेत. किमान दीड लाख लिटर क्षमतेच्या टाक्‍या सोसायटीत आहेत. तेवढे पाणी इतरवेळी पुरेसे होते. गतवर्षी आम्ही ऐन पावसाळ्यात तीन ते साडेतीन लाख रुपये पाण्यासाठी मोजले. बोअरवेलचा वापर केला, तर 35 ते 40 हजार वीजबिल आले.
- किसन गायकवाड, सचिव, सेक्‍टर 11, मोशी प्राधिकरण

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pavana dam is one hundred percent full society spends thousands on water