esakal | पिंपरी - वीजेचा अतिउच्च दाब वाढल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक
sakal

बोलून बातमी शोधा

electricity

पिंपरी शहरातील आकुर्डीगावठाण, पंचतारानगर परिसराचा 32 तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अचानक विजेचा दाब वाढल्याने घरांतील विद्युत उपकरणे जळाली आहेत. 

पिंपरी - वीजेचा अतिउच्च दाब वाढल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरातील आकुर्डीगावठाण, पंचतारानगर परिसराचा 32 तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अचानक विजेचा दाब वाढल्याने घरांतील विद्युत उपकरणे जळाली आहेत. नुकसानग्रस्तांना वीज वितरण कंपनीने भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात महावितरणच्या भोसरी विभागाकडे तक्रार केली आहे. दरम्यान, सोमवारी (ता.19) पहाटे ही घटना घडली. हा प्रकार शॉर्टसर्किटने झाला की, अतिउच्च दाबाच्या वीज प्रवाहाने झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगण्यात आले. 

परिसरात सोमवारी (ता.19) पहाटे विद्युत पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा सुरू होऊन 32 तासही होत नाही तोच मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास विजेचा अतिउच्च दाब अचानक वाढला. त्यामुळे टीव्ही, फ्रिज, एलसीडी, ट्यूबलाईट, बल्ब असे विजेवरील उपकरणे जळाली.

हे वाचा - पिंपरीकरांनो अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष निखिल दळवी म्हणाले, ""12 ग्राहकांच्या घरातील टीव्ही, फॅन, फ्रिज, चार्जर, सेटपबॉक्‍स, कॉम्प्युटर, वॉशिंग मशिन ही उपकरणे जळाली आहेत. खिडकीच्या काचाही फुटल्या आहेत. स्फोटासारखा आवाज आल्याने घरातील लोक भीतीने बाहेर पडले. तथापि उपकरणे जळून खाक झाली होती. "वर्क फ्रॉम होम' व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे, ज्यांची परीक्षा होती, त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. याला जबाबदार कोण? '' 

महावितरणच्या नाकर्तेपणामुळे आमचे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या वस्तूंचा पंचनामा करून त्या -त्या प्रमाणे त्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. मार्च महिन्याचा लॉकडाउन नंतर आपल्या विभागाने ग्राहकांना बिल दिले. असंख्य ग्राहकांना वाजवीपेक्षा अधिक वाढीव बिल देण्यात आले. बिल कमी करण्यासाठी रांगा लावण्यात येतात. अनेकांची बिले कमी झाली नसल्याने ग्राहक त्रस्त झाल्याची भावनाही परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

आणखी वाचा - 'खडसेंचे राजकारण उतारवयाचे; पक्षाला फरक पडत नाही'

याबाबत भोसरी महावितरण विभागाच्या अतिरिक्त कार्यकारी संचालक उमेश कवडे यांनी म्हटलं की, महावितरणच्या पथकाकडून संबंधित परिसराची माहिती घेतली जाईल. त्यानंतर कारवाई करण्यात येईल.