Fight With Corona : प्लाझ्मा दान करून त्यांनी ५८ जणांना दिले जीवदान!

Plasma_Donor
Plasma_Donor

पिंपरी : 'प्लाझ्मा' थेरपी म्हणजे उपचारानंतर एखाद्याला मिळालेलं नवीन आयुष्यचं. याचा प्रत्यय सध्या वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढीत येत आहे. शहरातील विविध भागांतून प्लाझ्मा दान करण्यासाठी युवक पुढे सरसावले आहेत. आतापर्यंत युवकांच्या दातृत्च भावनेमुळे ५८ जणांना जीवदान मिळाले आहे. एकमेकांचे सगेसोयरे नसतानाही जीव वाचविण्याची धडपड या युवकांमध्ये दिसली. यातील बऱ्याच जणांनी आत्तापर्यंत चार ते पाचवेळा प्लाझ्मा दान केले आहे. मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी न डगमगता रक्ताच्या नात्यापलीकडे बाधितांच्या मदतीसाठी धावून आलेले दाते हे रुग्णांसाठी खरे 'देवदूत' ठरले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात प्लाझ्मादानाची गरज चौपटीने वाढली आहे. रक्तपेढीतील डॉक्‍टरांना कोरोनाबाधित दात्यांना समुपदेशन करावे लागत आहे. १८ ते ५५ वर्षे वयापर्यंत कोणीही कोरोनाबाधित निरोगी व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकत आहे. दात्याला कोणतेही दुर्मिळ आजार तसेच उच्च रक्तदाब, साखर, ताप, कावीळ, न्युमोनिया, एचआयव्ही, मलेरिया, गुप्तरोग आणि श्‍वसनासंबंधी विकार नसणे गरजेचे आहे. कोरोनाबाधितांच्या शरीरात प्रतिकार शक्ती कमी असल्याने कोविडमधून बरा झालेला रुग्ण इतर रुग्णांना बरा करू शकतो. हे उपचार घेऊन घरी परतलेल्या व्यक्तींकडून सिद्ध झाले आहे.

सर्वांत प्रथम रक्तातील प्लाझ्मा विलग केला जात आहे. इतरांच्या शरीरातील विषाणू काढण्यासाठी ही थेरपी मदत करत आहे. रक्तातील या अँटिबॉडिज रुग्णाला वाचविण्यासाठी महत्त्वाच्या ठरत आहेत. त्यामुळे दुसऱ्या रुग्णाची ताकद वाढण्यास मदत होत आहे. तत्पूर्वी शारीरिक तपासण्या केल्या जात आहेत. दात्याच्या शरीरातील हिमोग्लाबीन, फीटनेस, वजन, रक्तगटाची तपासणी केली जात आहे. विशेष बाब म्हणजे दात्यांच्या यादीमध्ये महिला, चिमुकले आणि ज्येष्ठांचाही समावेश आहे.

सध्या रुग्णायात दाखल झालेल्या रुग्णांची गरज ओळखूनच प्लाझ्मा दिला जात आहे. अन्यथा अंत्यत अत्यवस्थ व्यक्तीला देऊनही उपयोग होत नाही. रक्तगट पाहून श्‍वसनाचा होणारा त्रास ओळखूनच त्याच्यावर प्लाझ्मा थेरपी होणे गरजेचे असल्याचे डॉ. विनायक पाटील यांनी सांगितले.

कोरोनामुळे काही जणांना अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे थेरपीसाठी पुढे येणाऱ्यांची संख्या कमी आहे. प्रतिकार करू न शकणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनाही बाधितांचे संपर्क क्रमांक दिले जात आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय प्लाझ्मा दान स्वीकारत नाही. सध्या एका व्यक्तीच्या प्लाझ्मापाठीमागे दोन व्यक्ती बऱ्या होऊन घरी जात आहेत. रुग्णांची स्थिती पाहून थेरपीचे प्रमाण वाढविले जात आहे. सध्या समाजातून मदतीचे हात पुढे येणे गरजेचे आहे.
- डॉ. तुषार पाटील, रक्तपेढी प्रमुख

काय आहे प्लाझ्मा?
- रक्तातील अत्यावश्‍यक रक्तजल वेगळा करते
- २८ दिवस कोविड कालावधी पूर्ण झालेला निरोगी व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकतो
- अफेरेसिस या स्वयंचलित मशीनमधून प्लाझ्मा घेतला जातो.
- प्लाझ्मासाठी ३० ते ४० मिनिटांचा कालावधी लागतो
- ४०० ते ५०० एमएल प्लाझ्मा एकावेळी घेता येतो
- २०० एमएलची बॅग ४०० रूपयांना विकली जाते
- एका प्लाझ्मा कीटची किंमत ८५०० रूपये आहे
- प्लाझ्माची -८० ते -३० डिग्रीला साठवणूक केली जाते
- प्लाझ्मा पिवळ्या रंगाचा आहे.

कोणत्या रुग्णालयात सुरु आहे प्लाझ्मादान
ससून, वायसीएम, बिर्ला, पुणे हॉस्पिटल, जनकल्याण

आकडे बोलतात...
- दिवसाकाठी केवळ ४ ते ५ जणांची नोंद
- एका प्लाझ्मा दानातून २ रुग्ण बरे होतात
- दिवसाकाठी शंभर ते दीडशे जणांना प्लाझ्मा दानासाठी संपर्क
- ३०० जण प्लाझ्मासाठी पात्र

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com