एक दोन नव्हे, तर तब्बल २२ भाषा बोलते 'ही' मराठी तरुणी!

टीम ई-सकाळ
Saturday, 25 July 2020

नवीन भाषा शिकताना कोणतंही टेन्शन घेऊ नका आणि या शिक्षण प्रक्रियेचा पूर्ण आनंद घेत भाषा शिका. 'हकुना मटाटा' (म्हणजे बिनधास्त) हा कानमंत्र नवीन भाषा शिकताना लक्षात ठेवा, असंही त्यांनी सांगितलं.

सोशल मीडिया साईट्सवर किंवा सीव्हीमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या भाषांचे ज्ञान आहे, असा प्रश्न विचारला जातो, तेव्हा साधारण आपण २ ते ३ किंवा ४ भाषांचा उल्लेख करतो. आपली बोली भाषा आणि शाळेत इतर भाषा म्हणून आपण ज्या भाषा शिकलेल्या असतो, त्या भाषांचा यात समावेश असतो. पण एखादी व्यक्ती जर २२ भाषा बोलते, असं जर तुम्हाला सांगितलं, तर तुम्हाला आश्चर्याचा हलकासा धक्का नक्कीच बसेल. 

अमृता जोशी-आमडेकर या मराठमोळ्या तरुणीला तब्बल २२ परदेशी भाषा अवगत आहेत. विदेशी भाषा प्रशिक्षक, भाषांतरकार, इंटरप्रिटर एक्सचेंज प्रोग्रॅम ऑर्गनायझर अशी त्यांची थोडक्यात ओळख सांगता येईल. १५ वर्षांहून जास्त काळापासून त्या परदेशी व्यक्तींना मराठी, हिंदी, संस्कृत तर मराठी व्यक्तींना इतर परदेशी भाषा शिकवण्याचे काम करत आहेत. त्यासाठी त्यांनी 'अॅकॅडमी ऑफ फॉरेन लँग्वेज अॅण्ड कल्चर' या संस्थेची मुंबईत स्थापना केली आहे. 

याच त्या 'लेडी सिंघम' ज्यांनी आमदाराला मारली होती थप्पड!​

अमृता यांना बावीस परदेशी भाषा अवगत आहेत, ही विशेष गोष्टच त्यांचे कर्तृत्व सिद्ध करण्यास पुरेसं आहे. खूप कमी वयात आणि कमी कालावधीत त्यांनी या विविध भाषा आत्मसात केल्या आहेत. आणि त्यांच्यासारखी दुसरी व्यक्ती अपवादानेच सापडेल. मुंबईत अॅकॅडमी स्थापन केल्यानंतर त्यांनी हजारो भारतीयांना विविध भाषांचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच त्यांच्याकडे अनेक परदेशी नागरिकांनीही मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृतचे धडे गिरवले आहेत. 

मूळच्या मराठी असणाऱ्या अमृता यांना मातृभाषा मराठीसोबत संस्कृत, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषेची चांगली जाण आहे. त्याचबरोबर त्यांना फ्रेंच, जर्मन, जपानी, स्पॅनिश, इटालियन, रशियन, चीनी, पर्शियन, पोर्तुगीज, उर्दू, अरबी, डच, एस्टोनियन, स्लोव्हाक, झेक, पोलिश, स्वीडिश, आयरिश आणि एस्पेरांतो या परदेशी भाषांचे ज्ञान आहे. एवढ्या सगळ्या भाषा अवगत असूनही त्या अस्खलित मराठी बोलतात.

एक हजार वर्षांचा इतिहास असलेलं ऑक्सफर्ड; जगातल्या दिग्गजांनी घेतलंय शिक्षण​

मुंबई विद्यापीठातून भाषाशास्त्रमध्ये त्यांनी एम.ए.ची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. आजच्या डिजीटल युगात जागतिकीकरण आणि मास कम्युनिकेशनचा बोलबाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान एकतरी परदेशी भाषा शिकली पाहिजे, असं त्यांना वाटतं. भाषा शिकणं आणि त्यात करिअर करणं या दोन वेगळ्या गोष्टी असल्यातरी भविष्यात याला नक्कीच डिमांड येणार आहे. 

कारण परदेशी भाषा शिकल्यास ट्रान्सलेशन, इंटप्रीटेशन्स, टिचिंग आणि टुरिस्ट गाइड ही चार क्षेत्रं तुमच्यासाठी खुली होतात. ट्रान्सलेशन उत्तम प्रकारे येत असेल तर तुम्ही घरबसल्या ट्रान्सलेशनची कामं करू शकता. तसेच पार्टटाइम जॉब म्हणूनही ट्रान्सलेशन हा एक चांगला पर्याय आहे. दररोज १ तास किंवा तुम्हाला वाटेल तितका वेळ तुम्ही या कामी देऊ शकता. नवीन भाषा शिकताना कोणतंही टेन्शन घेऊ नका आणि या शिक्षण प्रक्रियेचा पूर्ण आनंद घेत भाषा शिका. 'हकुना मटाटा' (म्हणजे बिनधास्त) हा कानमंत्र नवीन भाषा शिकताना लक्षात ठेवा, असंही त्यांनी सांगितलं.  

तीन IAS बहिणींचा सेम प्रवास; भूषवलं एकाच राज्याचं मुख्य सचिव पद

जपान तसेच युरोपमधील अनेक देशांचे अभ्यास दौरे करणाऱ्या अमृता या बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील कर्मचारी तसेच बड्या अधिकाऱ्यांनाही परदेशी भाषा आणि संस्कृती यांविषयी मार्गदर्शन करतात. तसेच त्यांनी लिहलेल्या अनेक पुस्तकांचे प्रकाशनही विदेशात झाले आहेत. व्यावसायिक लेख लिहणे आणि विविध कार्यक्रमांद्वारे लोकांशी संवाद साधणे यातून त्यांना आनंद मिळत असल्याचे त्या सांगतात. दूरदर्शन तसेच अनेक मराठी न्यूज चॅनेल्सवर त्यांना आमंत्रितसुद्धा करण्यात आले होते. 

फक्त भाषांमध्येच त्यांना जास्त रुची आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा अंदाज चुकीचा ठरू शकतो. कारण अमृता यांनी बास्केटबॉल, बॅडमिन्टन, मलखांब, जिम्नॅस्टिक्स, अभिनय, जादूचे प्रयोग, सौंदर्यस्पर्धा आणि काव्यलेखन अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. यामुळे अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A young Marathi girl Amruta Joshi Amdekar knows 22 foreign languages