पिंपरी-चिंचवडकरांनो कोरोनाचा संसर्ग घटतोय, फक्त स्वयंसेवकांना खरी माहिती द्या

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

उद्योगनगरीत पंधरा दिवसांपासून घटताहेत रुग्ण; मृत्यू प्रमाण स्थिर 

पिंपरी : कोरोना संसर्गाचे प्रमाण गेल्या पंधरा दिवसांपासून घटले आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण स्थिर असून त्यात अन्य आजार असलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी व नातेवाइकांनी घरी आलेल्या स्वयंसेवकांनी खरी माहिती सांगून वेळीच उपचार करून घेण्याची आवश्‍यकता आहे, या बाबत स्वयंसेवकांमार्फत जनजागृती केली जात आहे. 

पिंपरी-चिंचवडकरांनो सावध राहा; कुत्र्यांचे हल्ले वाढले, पाच महिन्यांत दोन हजार 430 जणांना चावा

सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात 17 हजार 615 जणांना आणि दुसऱ्या पंधरवड्यात मंगळवारपर्यंत (ता. 29) आठ हजार 379 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. जवळपास निम्म्याने रुग्णसंख्या घटली आहे. विशेषतः 15 सप्टेंबरपासून शहरात "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम राबवली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांत 11 लाख 25 हजार नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. "लवकर रुग्ण शोधून लवकर उपचार करणे' हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, काही नागरिक चुकीची माहिती देत आहेत. संसर्ग झाल्याचे किंवा त्याची लक्षणे असल्याचे लपवून ठेवत आहेत का? या दृष्टिने कसून चौकशी केली जात आहे. रुग्णसंख्या कमी आढळत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र स्थिर आहे. त्याचा दर 1.6 ते 1.7 च्या दरम्यान स्थिर राहिला आहे. तो कमी करण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून तपासणी करून घेणे व काहीही माहिती न लपवणे, उपयुक्त ठरणार आहे. 

कुत्र्याने केला घात, दुचाकीस्वार तरुणाचा गेला नाहक बळी

"जुलै व ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. नागरिकांत मास्क वापरणे, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आदींबाबत जागृतता निर्माण झाल्याचा हा परिणाम असावा. मात्र, हृदयविकार, मधुमेह, किडनीविकार, फुफ्फुसाचा विकार, रक्तदाबाचा त्रास असलेल्या नागरिकांनी वेळीच तपासणी करून घ्यायला हवी. घरी आलेल्या स्वयंसेवकांनी खरी माहिती द्यायला हवी. यामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी होईल.'' 
- संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका 

दृष्टिक्षेपात सप्टेंबर 

  • तारीख/रुग्ण/मत्यू 
  • 1 ते 15/17615/211 
  • 16 ते 29/8329/213 
  • एकूण/25944/424 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad corona infection is declining

Tags
टॉपिकस