esakal | Pimpri : शहरातील महाविद्यालये मंगळवारपासून गजबजणार
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri colleges reopen

Pimpri : शहरातील महाविद्यालये मंगळवारपासून गजबजणार

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग सुमारे दीड वर्षांनी सुरू झाले. त्यापाठोपाठ सर्व वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास राज्य शासनाकडून परवानगी मिळाल्याने शहरातील बहुतांश महाविद्यालयांमधील वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. परिणामी, येत्या मंगळवारपासून पुन्हा ही महाविद्यालये विद्यार्थ्यांनी गजबजून जाणार आहे.

हेही वाचा: Drug case: NCB कडून शाहरुख खानच्या ड्रायव्हरची चौकशी

कोरोनामुळे शहरातील शाळा, महाविद्यालये मार्च महिन्यापासून बंद करण्यात आली होती. शहरात पुणे विद्यापीठांतर्गत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे, इतर मॅनेजमेंट शाखेचे जवळपास ७० महाविद्यालये आहेत. राज्य शासन व स्थानिक प्रशासनाच्या सुचनांच्या अनुषंगाने महाविद्यालय सुरू होत असल्याने विद्यार्थी व शिक्षक आनंदात आहेत. विद्यार्थी समोर असल्यावर शिकविण्यात मिळणारा आनंद ऑनलाइन शिकविण्यात येत नाही असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

प्राध्यापक कर्मचाऱ्यांच्या तसेच आरटीपीसीआर टेस्ट व महाविद्यालय व वस्तीगृहात विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर टेस्टनंतरच प्रवेश देण्यात येणार आहे. कोरोना नियमांचे पालन करून महाविद्यालयात ऑफलाईन वर्ग भरण्याबाबतची तयारी केली आहे.

हेही वाचा: Lakhimpur: देशव्यापी आंदोलनाची सुरूवात महाराष्ट्रातून - संजय राऊत

प्राचार्यांच्या मते,

‘‘महाविद्यालये सुरु करण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहेच. त्याद्वारे बऱ्याच मोठ्या कालावधीपासून खंडित असलेले उच्च व तंत्र शिक्षण पुन्हा सुरु होणार आहे. परंतु लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या निर्णयाबाबत पुनर्विचार व्हावा असे वाटते. कारण केवळ १८ वर्षावरील व्यक्तींनाच लस उपलब्ध असल्याने प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांवर या निर्णयाचा विपरीत परिणाम होणार आहे. या सर्वच विद्यार्थी १८ वर्ष पूर्ण झालेले नाहीत. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या निर्णयाबाबत एकसूत्रता असावी.’’

- प्राचार्य डॉ. गजानन आहेर, संघवी केशरी महाविद्यालय, चिंचवड

‘‘महाविद्यालय विविध माध्यमातून विद्यार्थ्यांशी सतत संपर्कात आहे. लसीकरणांबाबत, ज्या विद्यार्थ्यांनी दोनही डोस घेतलेले आहेत त्यांची माहिती घेतलेली आहे. यासोबत राहिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. फार्मसी सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रात्यक्षिकांचे वेगळे महत्त्व आहे, महाविद्यालयाच्या शिक्षकांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना ज्ञानदानाच्या कार्यात कुठेही खंड पडू दिलेला नव्हता. प्रयोगशाळांमध्ये प्रात्यक्षिक करून औषधनिर्माणाचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणे अत्यंत गरजेचे आहे . त्यामुळे महाविद्यालये सुरु होण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. ’’

-डॉ. सोहन चितलांगे, प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, पिंपरी

हेही वाचा: Aryan Khan Drugs Case: शाहरुखसाठी पोस्ट केल्याने जॉनी लिव्हर ट्रोल

‘‘महाराष्ट्र शासनाने महाविद्यालय सोमवार पासून सुरू होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर फक्त दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याचे ठरवले आहे. या अटीवर महाविद्यालय सुरू करणे कठीण होईल. कारण कोविड इंजेक्शन घेतलेल्या मध्ये महाविद्यालयांचे विद्यार्थी पुढाकार घेत नसून त्यांना त्या अटीवर प्रवेश द्यायचे योग्य नाही. सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्याची घाई झालेली आहे. ही अट काढून टाकावी व इतर नियमांचे पालन करून शासनाने परवानगी द्यावी.’’

-प्राचार्य, डॉ. जी. वाय. शितोळे, बालाजी कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स, ताथवडे

‘‘ विद्यार्थ्यांनी दोन डोस घेतले आहेत का याची व इतर माहिती घेण्यासाठी गुगल फॉर्म च्या माध्यमातून ही माहिती घेण्यात आली आहे. विद्यार्थी वर्गात आल्यानंतर त्याचे तापमान तपासणी करून त्याची नोंदणी केली जाईल. महाविद्यालयामध्ये विविध ठिकाणी सॅनिटायझर आणि हात धुण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. लेक्चर एकावेळी ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेतले जाणार आहे.’’

-डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य, बाबुरावजी घोलप कॉलेज, सांगवी

‘‘महाविद्यालय विद्यार्थ्यांना कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत पुरेपूर काळजी घेईल, त्याअंतर्गत मास्क चा वापर, शारीरिक अंतर पाळणे, सातत्याने हात स्वच्छ धुणे या नियमांचे पालन विद्यार्थी व शिक्षकांना बंधनकारक राहील. ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन अभ्यासाची मुलांना नितांत गरज होती. ’’

-डॉ. प्रकाश पाटील, तेलंग कॉलेज, निगडी

loading image
go to top