उत्पन्न वाढीसाठी नव्या मिळकतींचा शोध; पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे खासगी संस्थेची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

  • दीड महिन्यात 15 हजार मिळकतींचा शोध 

पिंपरी : कोरोना व लॉकडाउन काळात शहरात अनेक नवीन बांधकामे झालीत. काहींनी वाढीव बांधकामे केली असून, काहींनी बांधकामांमध्ये बदल केला आहे. अशी बांधकामे शोधून मिळकतकर वाढीचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. मिळकतींच्या सर्वेक्षणासाठी खासगी संस्थेची नियुक्ती केली असून, जानेवारी 2021 अखेरपर्यंत त्यांना मुदत दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे शहरात दोन महिने लॉकडाउन होते. त्यानंतर रुग्ण आढळलेले भाग कंटेन्मेंट झोन जाहीर केले. मनुष्यबळ कमी क्षमतेने वापरण्यात आले. काही नागरिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने महापालिकेची मिळकतकर वसुलीही थंडावली. अनेकांनी मिळकतकर भरलेले नाहीत. मात्र, कोरोनाच्या गेल्या आठ महिन्यातील कालावधीत मोठ्या प्रमाणात नवीन बांधकामे झाली आहेत. काही नागरिकांनी बांधकामांच्या रचनेमध्ये बदल केला आहे. निवासीऐवजी व्यापारी वापर सुरू केला आहे. काहींनी वाढीव बांधकामे केली आहेत. अशा मिळकती शोधून उत्पन्न वाढीचे नियोजन महापालिकेने केले आहे. यासाठी नियुक्त केलेल्या संस्थेचे व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी (ता. 19) अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्या उपस्थितीत झाली. त्यासंदर्भात पवार म्हणाले, "गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत मिळालेल्या उत्पन्नाइतके मिळकतकर उत्पन्न मिळण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. खासगी संस्थेतर्फे उपग्रहाद्वारे काढलेल्या छायाचित्रांच्या आधारे व प्रत्यक्ष बांधकामांच्या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. जानेवारी अखेरपर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे. तसेच, सोळा करसंकलन कार्यालय स्तरावर सोळा कर निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. संस्थेला केलेल्या सर्वेक्षणाची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे अधिकारी मिळकतकर वसुलीची कार्यवाही करणार आहेत.'' 

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी दिला तपासणीचा सल्ला

सर्वेक्षण, सुनावणी, आकारणी 
नवीन मिळकती शोधून क्षेत्रीय अधिकारी स्तरावर कर आकारणी केली जाणार आहे. गेल्या दीड महिन्यात पंधरा हजार नवीन मिळकत आढळल्या आहेत. मिळकत शोधल्यानंतर मिळकतधारकांना नोटीस दिली जाणार. त्यावर सुनावणी होणार. मिळकतधारकाच्या जबाबानुसार ती कधीपासून वापरात आहे, ते ठरवून कर आकारणी केली जाणार आहे. जबाब खरा असल्याची खात्री करण्यासाठी मिळकतीच्या वीज वापर व बिल तपासणार. म्हणजेच मिळकतींचे सर्वेक्षण, त्यावर सुनावणी व कर आकारणी असे धोरण महापालिकेने आखले आहे. 

सद्य:स्थिती 

  • मिळकती शोधण्याचे उद्दिष्ट : 50 हजार 
  • डिसेंबर 2019 अखेर उत्पन्न : 411 कोटी 
  • यंदा नोव्हेंबरपर्यंतची वसुली : 248 कोटी 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal corporation seeks new income to increase income