बोगस ठेकेदारांवर महापालिकेने कारवाई करावी; आमदार अण्णा बनसोडे यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

  • कमी दराने निविदा भरणाऱ्यांची चौकशी करा 
  • आमदार अण्णा बनसोडे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

पिंपरी : महापालिकेने मागील तीन वर्षांत राबविलेल्या निविदांवर अनेक ठेकेदारांनी 11 टक्‍क्‍यांपेक्षा कमी दराने निविदा भरलेल्या आहेत. निविदा भरताना या ठेकेदारांनी परफॉर्मन्स सिक्‍युरिटी डिपॉझिट (पीएसडी) म्हणून दिलेल्या फिक्‍स डिपॉझिट रिसिट (एफडीआर) तपासाव्यात, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. काटेकोर चौकशी झाल्यास या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस येईल, असा दावाही त्यांनी केला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरातील टपाल कार्यालयांमध्ये येतायेत 'या' अडचणी

निवेदनात म्हटले आहे, अकरा टक्‍क्‍यांपेक्षा कमी दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांनी पीएसडी म्हणून महापालिकेला दिलेले अनेक एफडीआर खोटे की खरे? या बाबत खात्रीशीर माहिती महापालिकेकडे नाही. खोटे व बोगस एफडीआर बनवून देणारी टोळी शहरात कार्यरत आहे. असे अनेक बोगस एफडीआर अनेक ठेकेदारांनी महापालिकेला दिलेले आहेत. यामध्ये मोठे रॅकेट असून, ठेकेदार व अधिकारी यांचे संगनमत असल्याने याची अद्याप वाच्यता झालेली नाही. 

अशक्तपणा आला, वजन घटलं तरी घाबरू नका; कारण... 

काम मिळविण्यासाठी ठेकेदार कमी दराने निविदा भरतात. हजारो कामांसाठी महापालिका निविदा मागवीत असते. नंतर निविदांमध्ये स्पर्धा होऊन 20, 25, 30, 32 टक्के कमी दराने निविदा भरून कामे मिळविली जातात. काम मिळाल्यानंतर पीएसडी म्हणून महापालिकेला एफडीआर देणे बंधनकारक आहे. त्यामुळे मोठ्या रक्कमा बॅंकेकडे ठेवून ठेव पावती अथवा डीडी स्वरूपात एफडीआर महापालिकेकडे जमा करावा लागतो. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जमा केलेला एफडीआर खोटा की खरा? याची खात्री अथवा तपासणी महापालिका करीत नाही. नेमका याचाच फायदा घेऊन बनावट एफडीआर तयार करून देणारी टोळी सक्रिय झाली. ठेकेदार असे बनावट एफडीआर महापालिकेकडे जमा करीत असल्याने या प्रकरणात सखोल चौकशी करायला हवी. दोषी ठेकेदारांवर महापालिकेची फसवणूक केली म्हणून गुन्हे दाखल करून काळ्या यादीत टाकण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal corporation should take action against contractors demand of mla anna bansode