पिंपरी-चिंचवड महापालिका शेतकऱ्यांसाठी बांधणार गहुंजे, शिवणेत बंधारा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

  • संकल्पचित्र तयार करणार
  • 20 कोटींची तरतूद 

पिंपरी : पवना धरणातून थेट पाइपद्वारे पिंपरी-चिंचवडला पाणी नेल्यास शेतीला मिळणार नाही, या हेतूने मावळातील शेतकऱ्यांचा जलवाहिनीला विरोध आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी पवना नदीवर शिवणे व गहुंजे गावांजवळ कोल्हापूर पद्धतीचा (केटी) बंधारा बांधण्यास महापालिकेची तयारी आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्ती व संकल्पचित्र करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. 

नॉन कोविड रुग्णांसाठी उपलब्ध होणार 50 टक्के बेड; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय  

पिंपरी-चिंचवड : ताथवडेतील रस्त्याचा डाव भाजपच्याच अंगलट

केंद्र सरकारच्या जेएनएनयुआर योजनेअंतर्गत पवना धरणातून निगडी-प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रात पाइपद्वारे पाणी आणण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम 2008 मध्ये सुरू झाले. त्याला विरोध करण्यासाठी 2011 मध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्या वेळी पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा बळी गेला. तेव्हापासून जलवाहिनीचे काम बंद आहे. दरम्यान, जलवाहिनीविरोधात भारतीय किसान संघ व अन्य संघटनांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने जलवाहिनीला मान्यता देऊन 2012 मध्ये अपील फेटाळले होते. मात्र, शेतीसाठी महापालिकेने स्वखर्चातून दोन केटी पद्धतीचे बंधारे पवना नदीवर बांधावेत, असा आदेशही दिला होता. त्यानुसार महापालिकेने गहुंजे व शिवणे गावांजवळ बंधारे बांधण्याची तयारी सुरू केली आहे. पाटबंधारे विभागाने परवानगी दिली आहे. या कामाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी सात लाख आणि भूशास्त्रीय कार्यासाठी सात लाख 70 हजार रुपये अनामत रक्कम ठेवली आहे. तसेच, कामाची निविदा काढून काम चालू करण्यास 22 सप्टेंबर रोजी पाटबंधारे विभागाने महापालिकेला कळविले आहे. 

नाशिकला होणार संकल्पचित्र 
शिवणे व गहुंजे येथे पवना नदीवर केटी बंधारे बांधण्याचे संकल्पचित्र नाशिक येथील मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेकडून तयार केले जाणार आहे. त्याचे 36 लाख चार हजार रुपये शुल्क भरण्यास पाटबंधारे विभागाने महापालिकेला कळविले आहे. ते देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तसेच, दोन्ही बंधारे बांधण्यासाठी महापालिकेने 20 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal corporation will build bund for farmers at gahunje, shivane