पिंपरी-चिंचवड : पालिका विषय समित्यांना मिळणार नवीन कारभारी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

  • निवडणूक घेण्यास राज्य सरकारची परवानगी 

पिंपरी : मुदत संपल्यामुळे महापालिकेतील विषय समित्या बरखास्त झाल्या आहेत. लॉकडाऊन व जमावबंदीमुळे निवडणूक होऊ शकली नाही. मात्र, आता व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ऑनलाइन निवडणूक घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या सर्वसाधारण सभेत विषय समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर समिती अध्यक्षांची निवडणूक होईल. 

'पीएमआरडीए'ची उपमुख्यमंत्र्यांसोबत उद्या 'या' विषयांवर बैठक 

महापालिकेतील विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि कला-क्रीडा व सांस्कृतिक समित्यांची मुदत 14 जून रोजी संपली आहे. त्या वेळी लॉकडाउन, संचारबंदी, जमावबंदी आदेश लागू होता. त्यामुळे सर्व समित्यांवर नवीन सदस्यांची निवड न होता, त्या बरखास्त झाल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांतच शिक्षण समितीचीही मुदत संपल्याने तीही बरखास्त करण्यात आली आहे. मात्र, या समित्यांचे अधिकारी सर्वसभेकडे आहेत. 

पुणे-नाशिक महामार्गावरील 'ही' धोकादायक वाहतूक थांबणार का? स्थानिक रहिवाशांचा सवाल 

पुढील आदेश येईपर्यंत विषय समित्यांवर नवीन सदस्यांची नेमणूक करू नये, असा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता ऑनलाइन पद्धतीने निवडणूक घेण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे ऑक्‍टोबर महिन्यातील सर्वसाधारण सभेत निवडणूक होऊन विषय समित्या पुन्हा अस्तित्वात येण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर त्यांच्या अध्यक्षांची निवड होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal subject committee election