पाचवी ते आठवीची शाळा आजपासून; केवळ तीन तास शाळा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 February 2021

शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. प्रतिदिन शंभरच्या आसपासच रुग्ण आढळत आहेत. त्यातही लक्षणे नसलेल्या रुग्णांची सख्या अधिक आहे. त्यामुळे सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर आले आहेत.

पिंपरी - साधारणतः दहा महिने झालेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा बंदच होत्या. विद्यार्थी घरी होते. मात्र, नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग गेल्या महिन्यात सुरू झाले. पाठोपाठ पुणे शहरासह जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा एक फेब्रुवारीपासून सुरू झाल्या. मात्र, शाळांची साफसफाई, निर्जंतुकीकरण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शिक्षकांची कोरोना चाचणी आदी कारणांमुळे शहरातील शाळा सुरू केलेल्या नव्हत्या. त्या आता गुरुवारपासून (ता. 4) सुरू होत आहेत. केवळ तीन तासच शाळा असेल. त्यात इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांना प्राधान्य दिले जाणार आहे. 

देशातील सर्वांत युवा महिला पायलट; काश्मीरच्या आयशा अजीजचं नेत्रदिपक यश

शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. प्रतिदिन शंभरच्या आसपासच रुग्ण आढळत आहेत. त्यातही लक्षणे नसलेल्या रुग्णांची सख्या अधिक आहे. त्यामुळे सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे सरकारच्या आदेशानुसार कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने गेल्या आठवड्यात घेतला होता. मात्र, शाळांचे निर्जंतुकीकरण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी, सेवासुविधा, आसन व्यवस्था, पालकांचे संमतीपत्र अशी पूर्वतयारी करायची होती. त्यासाठी गुरुवारपासून (ता. 28) शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून ते बुधवारपर्यंत (ता. 3) सर्व व्यवस्था करायची होती. त्यानुसार महापालिका शिक्षण विभाग प्रभारी प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांनी आढावा घेऊन सर्व व्यवस्था झाली असल्याचे सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य 
राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शहरातील महापालिका व सर्व खासगी शाळांचे पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग गुरुवारपासून सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे, असे मुंढे यांनी सांगितले, ते म्हणाले, ""महापालिकेच्या 90 टक्के शाळांमध्ये थर्मलगण व ऑक्‍सिमीटर पोचवले आहेत. खासगी शाळांनी स्वतः व्यवस्था करायची आहे. विद्यार्थ्यांच्या शरिराचे तापमान व ऑक्‍सिजन प्रमाण बघूनच त्यांना वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. कोणतेही लक्षण आढळलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून माहिती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझर, हॅंडवॉशची व्यवस्था केली असून सर्वांना मास्क दिले जाणार आहेत.'' 

शेतकरी आंदोलनाच्या झळा आंतरराष्ट्रीय पातळीवर; रिहानाच्या ट्विटनंतर मोदी सरकारचं भलं मोठं उत्तर​

थर्मलगणचा तुटवडा 
महापालिकेच्या दहा टक्के शाळांमध्ये थर्मलगण व ऑक्‍सिमीटर पोचवायचे आहे. त्यासाठी भांडार विभाग व वायसीएम प्रशासनाकडे विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडे हे साहित्य नव्हते. वायसीएम प्रशासनाने भोसरी रुग्णालयाकडे विचारणा करायला सांगितले. त्यांच्याकडेही शिल्लक नव्हते. अखेर स्थायी समिती सभेत हा प्रश्‍न उपस्थित करून उपाययोजना करण्याची मागणी केली, असेही मुंढे यांनी सांगितले. 

दृष्टिक्षेपात पाचवी ते आठवी... 
शाळांची संख्या ः 647 
विद्यार्थी संख्या ः 1,32,438 
पालकांचे संमतीपत्र ः 14,062 
शिक्षकांची संख्या ः 3,311 
कोरोना टेस्ट झालेले शिक्षक ः 2,707 

शाळांची वेळ 
सकाळ सत्र ः 8 ते 11 
दुपार सत्र ः 1 ते 4 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad news Schools from 5th to 8th class from today