पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचा जीव पाण्याअभावी होतोय 'पाणी-पाणी'

पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचा जीव पाण्याअभावी होतोय 'पाणी-पाणी'

पिंपरी : गेल्या चार दिवसांपासून प्रखर ऊन, पितृपक्ष व सलग दोन दिवस सुट्या. यामुळे घराघरांत पाण्याची तुलनेने जास्त गरज भासू लागली. मात्र, कधी महावितरण, तर कधी महापालिका यांच्यातील तांत्रिक अडचणींमुळे सलग चार दिवस शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. यामुळे करदात्या नागरिकांवर 'पाणी-पाणी' म्हणण्याची वेळ आली आहे. 

ही आहे वस्तुस्थिती... 

  • गुरुवार (ता. 3) : रावेत अशुद्ध जलउपसा केंद्र, निगडी जलशुद्धीकरण केंद्र व शहरातील पाणी वितरण व्यवस्थेची देखभाल दुरुस्ती व विद्युत विषयक कामांसाठी महापालिकेकडून सायंकाळचा पाणीपुरवठा बंद. 
  • शुक्रवार (ता. 4) : सकाळच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम. सायंकाळचा पाणीपुरवठा दिवसाआड नियमानुसार सुरळीत. मात्र, रात्री अकराच्या सुमारास सुमारे 50 मिनिटे वीजपुरवठा खंडित झाल्याने अशुद्ध जलउपसा बंद. 
  • शनिवार (ता. 5) : सकाळच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. मात्र, सायंकाळी अर्धा तास वीज खंडित झाल्याने जलउपसा बंद. वीजपुरवठा व पंप सुरळीत होण्याच्या कालावधीत सुमारे 15 दशलक्ष लिटर कमी जलउपसा. 
  • रविवार (ता. 6) : शहरातील काही भागात कमी दाबाने पाणी मिळाले. साधारणतः चिंचवड प्रेमलोक पार्क, बिजलीनगर, दळवीनगर, उद्यमनगर, चिंचवडच्या काही भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. 

महावितरण म्हणते... 

शुक्रवारी रात्री 11 वाजता रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा तांत्रिक बिघाडामुळे खंडित झाला होता. मात्र, महावितरणने लगेचच तांत्रिक उपाययोजना करून 50 मिनिटांनी पर्यायी व्यवस्थेद्वारे या केंद्राचा वीजपुरवठा सुरळीत केला. हा 50 मिनिटांचा अपवाद वगळता महावितरणकडून रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा सुरळीत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळित होण्यासाठी महावितरण जबाबदार नाही, असे महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी कळविले आहे. 

महापालिका म्हणते... 

पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून एका तासात सरासरी 20 दशलक्ष लिटर अशुद्ध जलउपसा केला जातो. म्हणजेच शुक्रवारी एक तास वीजपुरवठा खंडित झाल्याने 20 दशलक्ष लिटर जलउपसा करू शकलो नाही. शिवाय, सर्व पंप सुरू करण्यासाठी साधारणतः अर्धा तास लागतो. यामुळे पाच दशलक्ष लिटर पाणी उपसा कमी होतो. परिणामी शहरातील पाणीपुरवठा विस्कळित, कमी दाबाने व अनियमित होण्यावर त्याचा परिणाम होतो, असे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांनी सांगितले. 

नागरिक म्हणतात... 

गेल्या नऊ-दहा महिन्यांपासून दिवसाआड पाणी मिळत आहे. पाण्याचा साठा करून ठेवावा लागत आहे. आमच्या भागात गुरुवारी सायंकाळी पाणी आले नाही. शनिवारी थोडेफार मिळाले. आज रविवारीसुद्धा नळाला पाणी आले नाही. साठवलेले पाणीसुद्धा संपले होते. त्यामुळे 30 रुपयाला एक जार या प्रमाणे दोन जार म्हणजे चाळीस लिटर पाणी विकत घ्यावे लागले, असे खासगी कंपनीत अभियंता असलेले बिजलीनगर येथील शैलेश चव्हाण यांनी सांगितले. 

वीज व जलउपशाचे गणित 

  • वीजपुरवठा एक तास खंडित झाल्यास 20 दशलक्ष लिटर कमी जलउपसा 
  • सर्व पंप सुरू होण्यास 30 मिनिटे लागत असल्याने 5 दशलक्ष लिटर कमी उपसा 
  • साधारणतः दीड तासात सुमारे 25 दशलक्ष लिटर कमी जलउपसा 
  • महापालिकेच्या नियोजनानुसार प्रतिव्यक्ती दररोज 135 लिटर पाणीपुरवठा 
  • एका कुटुंबात चार व्यक्ती गृहीत धरल्यास प्रतिकुटुंब दररोज 540 लिटर पाणी 
  • 25 दशलक्ष लिटर म्हणजे 46 हजार 296 कुटुंबांना पाणी मिळण्यास परिणाम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com