esakal | पिंपरी: शहरात आज ५७ केंद्रांवर लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण मोहीम

पिंपरी: शहरात आज ५७ केंद्रांवर लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना प्रतिबंधक लशीचे २७ हजार ३०० डोस महापालिकेकडे प्राप्त झाले आहेत. त्यात कोव्हिशिल्ड लशीचे २४ हजार ५०० व कोव्हॅक्सिनचे दोन हजार ८०० डोसचा समावेश आहे. ते देण्याची व्यवस्था सोमवारी (ता. ४) अनुक्रमे ४९ व आठ अशा ५७ केंद्रांवर केली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना प्राधान्य दिले जाणार आहे, असे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कळवले आहे.

हेही वाचा: आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस झालेल्यांना व कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्यांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर कोव्हिशिल्डचे पाचशे व कोव्हॅक्सिनचे साडेतीनशे डोस उपलब्ध आहेत. ईएसआय हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना चिंचवड, नेत्र रुग्णालय मासुळकर कॉलनी, जुने खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी समर्थ बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी, निळू फुले नाट्यगृह नवी सांगवी या केंद्रांवर कोव्हॅक्सिन दिली जाणार आहे. तसेच, स्तनदा माता व गर्भवतींसाठी नवीन भोसरी रुग्णालय, कुटे हॉस्पिटल आकुर्डी, उर्दू प्राथमिक शाळा काळभोर गोठा यमुनानगर, आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकारामनगर, अहिल्याबाई होळकर स्कूल सांगवी, खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय पिंपरी व जुने तालेरा रुग्णालय चिंचवड या केंद्रांवर काही डोस राखीव ठेवले आहेत.

हेही वाचा: स्थानिक भूमिपुत्रांच्या नोकऱ्यासाठी प्रयत्न करणार : उदय सामंत

अशी मिळणार लस

कोरोना प्रतिबंधक लशीचे पाच टक्के डोस ऑनलाइन नोंदणी करून वीस टक्के डोस किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेऊन आणि ७५ टक्के डोस ‘ऑन दि स्पॉट’ नोंदणी करून दिले जाणार आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी लसीकरणाची वेळ आहे. ‘कोविन ॲप’वर सकाळी आठ वाजता नोंदणी सुरू होईल. किऑक्स यंत्रणेद्वारे टोकन घेतलेल्या मात्र, लसीकरणाबाबत एसएमएस आलेल्या नागरिकांनाच लस दिली जाईल.

loading image
go to top