Video : घरकाम करणाऱ्या मावशींसाठी महत्वाची बातमी

सुवर्णा नवले
बुधवार, 20 मे 2020

सध्या पिंपरी-चिंचवड शहरात 17 हजार घरकाम करणाऱ्या महिला आहेत. त्यातील चार ते पाच हजार मोलकरणींना चौथ्या लॉकडाउननंतर कसेबसे धुण्या-भांड्याचे व लादी पुसण्याचे काम मिळाले आहे.

पिंपरी : दुसऱ्याचं घर आपलं समजून हक्काने राबणाऱ्या अन्‌ हातावरचं पोट असणाऱ्या घरकाम (मोलकरीण) करणाऱ्या महिलांवर लॉकडाउनमध्ये उपासमारीची वेळ आली आहे. 'आम्हीच आमचं काम करू' या निश्‍चयावर ठाम असलेल्या मालकीणींकडून मोलकरणींना विश्‍वासाची साद हवी आहे. पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल बारा हजाराच्यावर महिला सध्य स्थितीत घरकामाच्या प्रतीक्षेत आहेत.

आता मोलकरणींना कामावर जाता येणार पण...

सध्या पिंपरी-चिंचवड शहरात 17 हजार घरकाम करणाऱ्या महिला आहेत. त्यातील चार ते पाच हजार मोलकरणींना चौथ्या लॉकडाउननंतर कसेबसे धुण्या-भांड्याचे व लादी पुसण्याचे काम मिळाले आहे. यात बागकाम व मुलं सांभाळणाऱ्या महिला देखील आहेत. मात्र, स्वयंपाकाचे काम देण्यास अद्यापही बऱ्याच घरांमध्ये टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे दोन महिन्यांत या महिलांवर दारोदार फिरून उसनवारी पैशावर कुटुंब चालविण्याची वेळ आली आहे. काही घर मालकींनीने मार्च व एप्रिल महिन्याचा पगार दिला आहे. तर काही घर मालकीणींनी अद्यापपर्यंत पगारच दिलेला नाही. त्यामुळे मे महिन्यात तरी हाताला काम मिळेल की नाही अशा विवंचनेत या महिला अडकल्या आहेत. मात्र, लॉकडाउन वाढविल्यामुळे ती देखील आशा मावळली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय आहे नेमकी परिस्थिती
कामगार उपायुक्तांनी घरकाम करणाऱ्या महिलांना कामासाठी मुभा दिली आहे. मात्र हा सर्वस्वी निर्णय घरमालक व मोलकरणीवर अवलंबून आहे. मात्र, बऱ्याच घरकाम करणाऱ्या महिला झोपडपट्टी भागातील आहेत. याच भागात कोरोनाने शिरकाव केल्याने संसर्गाच्या भीतीपोटी घरकाम करणाऱ्या महिलांना सोसायटी धारकांनी ठरवून प्रवेश नाकारला आहे. काही जण संसर्गबाधित परिसरात राहत असल्याने बऱ्याच महिलांना बाहेर पडता येणे अशक्‍य झाले आहे. नोकरदार महिलांना मोलकरणींची गरज आहे, मात्र त्यांनी देखील स्वत:च काम करण्याची तयारी दर्शविली आहे. कुटुंबातील मंडळीच एकमेकांचे काम हलके करत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच चिमुकल्यांचा व ज्येष्ठांचा सांभाळ करणाऱ्या आयांचा थेट संबंध हा स्पर्शाशी असल्याने या कामासाठी पूर्णत: पाबंदी घालण्यात आली आहे.
कोथरुड-कर्वेनगरकर, आता स्वत:ला, कुटुंबाला जपणार अन् कोरोनाला हरविणार

मावशी म्हणतात...
'आम्ही सोसायटीत जाताना काळजी घेऊ. सॅनिटायझर वापरू. घर मालकीण ज्या सूचना देतील त्या नियमांचे पालन करू. ज्येष्ठ नागरिक व नोकरदार महिलांना आमची खरी गरज आहे. सध्या पतीला देखील हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. सर्वांनी सहानुभूतिपूर्वक आमचा देखील विचार करावा.'

घरकाम करणाऱ्या महिलांच्या हाताला काम हवं. त्यासाठी महापालिकेने देखील लक्ष देण्याची गरज आहे. जवळपास दोन महिने झाले यांना आम्ही जेवण पुरवीत आहोत. यामध्ये आया, स्वयंपाकी व धुणी-भांड्याचे काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठे आहे.
-आशा कांबळे, घरकाम महिला संघटना, पिंपरी-चिंचवड

आमच्या परिसरात बऱ्यापैकी महिला धुण्या-भांड्यांची कामे करत आहेत. स्वयंपाकाची कामे दिली जात नाहीत. शक्‍यतो अद्यापही नागरिक भयभीत आहेत. त्यामुळे लॉकडाउन नंतरच बहुतेक महिला मोलकरणींना कामावर बोलवतील. जवळच्या परिसरात राहत असेल तर आम्ही कामाला बोलवत आहोत.
- सुनीता कुलकर्णी, आकुर्डी प्राधिकरण, घरमालकीण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poor condition of housemaids