वीज चोरीची समस्या वाढली;महावितरण अधिकाऱ्यांकडून नाममात्र कारवाई 

वीज चोरीची समस्या वाढली;महावितरण अधिकाऱ्यांकडून नाममात्र कारवाई 

पिंपरी - पिंपरी कॅम्प बाजारपेठेतील सर्व दुकानात दिवसाही दिव्यांचा झगमगाट, ठिकठिकाणी विजेच्या खांबावर आकड्यांचे पसरलेले जाळे, हे चित्र सर्रास पाहायला मिळते. मंडईतील सर्व गाळे, भाटनगर परिसरात वीज चोरी कुठे कशी चालते, हे अधिकारी पाहताहेत. परिणामी शहरातील रोजच्या वीज चोरीचा आकडा कितीतरी लाखावर जात आहे. तरीही महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून केवळ नाममात्र कारवाई केली जात असल्याची वस्तुस्थिती आहे. 

शहर आणि विजेच्या समस्या हे सूत्र अनेक वर्षांपासून कायम आहे. भोसरी आणि पिंपरी विभागांतर्गतच्या बहुतांश सर्वच भागांमध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांचा आश्रय घेऊन थेट डीपी बॉक्‍स, खांबांवर आकडे टाकून वीज चोरी केली जाते. मात्र, महावितरण ही चोरी थांबवण्यात अपयशी ठरले आहे. भोसरी, पिंपरी बाजारपेठ, भाटनगर, आंबेडकर नगर, रिव्हर रोड, रमाबाईनगर, तळवडेतील सहयोगनगर, निगडीनाका, पीसीएमसी वसाहत, त्रिवेणीनगर आदी ठिकाणच्या खांबांवर आकडे टाकून राजरोस वीजचोरी होते. रात्रीच्या सुमारास टपऱ्या, हातगाड्यांमध्ये चोरून वीजवापर होतोय. आर्थिक लागेबांधे असल्याने अधिकारी, कर्मचारी कारवाई करत नाहीत आणि एखाद्या सामान्य ग्राहकाचे महिन्याचे बिल थकले, तरी वीज तोडण्याची कारवाई होते, असा आरोप नागरिकांचा आहे. 

उपाय ठरले व्यर्थ 
शहरात काही ठिकाणी वीजचोरीचे प्रकार वाढले होते. या भागात महावितरण कंपनीने एरिअल बंच केबल अर्थात रबरी वेष्टण असलेल्या वीजतारांचा वापर केला. मात्र, अशा ठिकाणी आता दूर अंतरावरील वीजतारांवर आकडे टाकले जातात. एरिअल बंच केबलचा शोधलेला उपायही यामुळे व्यर्थ ठरला. विजेची मेन लाइन खांबावर आणून घराजवळ मोकळ्या जागेत अर्थिंग तयार करून काही ठिकाणी जीवघेणा खेळ सुरू आहे. 

कर्मचाऱ्यांना मिळेना साथ 
काही ठिकाणी कारवाईसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना दमदाटी किंवा राजकीय बळाचा वापर करून धमक्‍याही मिळतात. वरिष्ठांकडून पोलिस संरक्षण, तसेच कायदेशीर कठोर कारवाई करण्यासाठी पाठबळ दिले जात नाही, यामुळे वर्षानुवर्षे वीजचोरीचे प्रकार सुरूच आहे. त्यामुळे शहरातील वीजगळती वाढून त्याचा त्रास आणि भुर्दंड सर्वसामान्य वीज ग्राहकांना सोसावा लागत आहे, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 

""वीजचोरी विरोधात नियमित कारवाई सुरू आहे. वीजचोरी करणे हा फौजदारी गुन्हा असल्याने प्रत्येकाने अधिकृत जोड घ्यावा. वीज चोरीच्या ठिकाणांची माहिती घेण्यात येईल. 
- निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी महावितरण विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com