esakal | Interview:‘सारथी’ची साथ आणि तहानभूक हरपून अभ्‍यास हाच मूलमंत्र
sakal

बोलून बातमी शोधा

माधुरी गरुड

मुलाखत :‘सारथी’ची साथ आणि तहानभूक हरपून अभ्‍यास हाच मूलमंत्र

sakal_logo
By
सुवर्णा गवारे- नवले

पिंपरी : ‘‘सोशल मिडियापासून पूर्ण दूर, सारथीची साथ आणि तहानभूक हरपून दहा-पंधरा तास अभ्यासावर लक्ष केंद्रित हाच माझ्या यशाचा मूलमंत्र राहिला’’, असे माधुरी गरुड हिने सांगितले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेच्या नुकत्याच लागलेल्या निकालात ती उत्तीर्ण झाली आहे. तिला ५६१ वी रँक मिळाली असून भारतीय पोलिस सेवा किंवा भारतीय राजस्व सेवा यामध्ये काम करण्याची संधी मिळेल अशी तिला अपेक्षा आहे. तिच्या या यशाबद्दल ‘सकाळ’ने तिच्याशी संवाद साधला. पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवीमध्ये ती राहते. आई संध्या या गृहिणी असून वडील भानुदास विक्रीकर विभागात नोकरीला होते.

१. ‘प्रशासकीय सेवा’ या ध्येयाच्या प्रवासाला कशी सुरुवात झाली?

अधिकारी होण्याचे स्‍वप्‍न शालेय वयापासूनच होते. दहावीमध्ये ९४ टक्‍के गुण मिळविले. अकरावीला पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये कला शाखेत मी प्रवेश घेतला. विज्ञान किंवा वाणिज्य शाखे ऐवजी कला शाखा निवडली. पदवीनंतर मानव्यशास्त्र, राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. तसेच याच महाविद्यालयातून कायद्याची पदवी मिळविली. मग स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. दिल्लीत गेले. सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) या पुणे स्थित संस्थेची शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यात यश मिळाले आणि दिल्लीत जाऊन अभ्यास आणि अभ्यासवर्ग सुरु केला. इथे माझ्या स्वप्नाचा पहिला टप्पा पूर्ण झाला.

हेही वाचा: शिरुर : ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

२. कोणती संदर्भ पुस्तके वापरली ?

जनरल स्टडीजच्या मुख्य चार विषयांसाठी सामान्य अभ्यासाची पुस्तके वापरली. पर्यायी विषयांसाठी संदर्भ पुस्तके वापरली. मी कोणत्याही नोट्सवर अवलंबून राहिले नाही. संदर्भीय पुस्तकांतून नोट्स तयार केल्या. अभ्यासासाठी अवांतर वाचनाची गरज असते. मला पहिल्यापासूनच पुस्तके वाचण्याचा छंद होता. त्याचा फायदा झाला. वाचनाच्या पद्धती समजल्या. आईला वाचनाची आवड असल्याने घरात कायम पुस्तके असायची. त्याचाही फायदा झाला. बरीच आत्मचरित्र, शैक्षणिक आणि काल्पनिक (फिक्शन) पुस्तके वाचली.

३. दररोज किती तास अभ्यास केला?

अभ्यासिका जॉईन न करता घरातच अभ्यास केला. काही दिवस तहानभूक विसरुन दिल्लीत सलग १० ते १५ तास अभ्यास केला. रात्रीचे जेवण टाळले. अभ्यासाची लिंक लागली की, जेवणासाठीही बाहेर जात नसे. नोट्स, पुस्तके, क्लासेस हे सर्व केवळ ‘सारथी’मुळे शक्य झाले. कला शाखेच्‍या निवडीचाही फायदा झाला. विशेष म्हणजे मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची तयारी कशा प्रकारे करावी, कोणती पुस्तके अभ्यासावीत, याबाबत पुण्यातील जवाद काझी यांची खूप मोठी मदत झाली. सलग दोन ते अडीच वर्ष अभ्यास केला.

हेही वाचा: सर्व क्रीडा स्पर्धांनाही परवानगी द्यावी : स्पोर्टस् असोसिएशन

४. प्रदीर्घ दिवसाच्या अभ्यास असल्याने बऱ्याच मुलांना ताण येतो. तो कसा हलका करावा?

स्‍पर्धा परीक्षांच्‍या तयारीसाठी कुटुंबाचे पाठबळ फार मोलाचे आहे. त्यासाठी आपले छंद सोडण्याची आवश्यकता नाही. मी भरतनाट्यम, झुम्बा डान्स, फिरण्यासोबतच वाचनाचा छंद जोपासला. सचिन तेंडुलकर, मिशेल ओबामा, इंद्रा नुयी, बेंजामिन फ्रॅंकलिन, हिटलर, महात्मा गांधीच्या आत्मचरित्रांमुळे प्रेरणा मिळाली. नियोजन केल्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवता येते. कोणतीही स्पर्धा परीक्षा असो. भावनिक, शारीरिक, आणि सोशल कॅपिटल बांधणी करावीच लागते. यातील एकही बाजू कमकुवत असायला नको. आयुष्यात स्थैर्य असणं गरजेचं आहे. दरवेळी निकालाची अपेक्षा न करता कठोर मेहनत आवश्यक आहे.

५. अभ्यासावेळी कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

सोशल मीडियाचा अगदी कामापुरता वापर करा. फेसबुक, व्हॉटस ॲपवरील काही गोष्टींचा मनावर विपरीत परिणाम होतो. अभ्यासापासून लक्ष विचलित होते. बाकी सोशल मीडियापासून दूर राहणेच योग्य आहे. गरजेपुरता सोशल मीडियाचा वापर केल्यास उर्वरित वेळ सत्कारणी लागेल.

६. रॅंकमधून आता कोणती पोस्ट मिळेल?

मला भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) मिळेल. ते नाही मिळाले तरी भारतीय राजस्व सेवा (इन्कमटॅक्स) मिळेल. लोकसेवाच करायची आहे. सगळीच पदे या उच्च आहेत. देशभरात कुठेही जाण्याची तयारी आहे.

loading image
go to top